Top Post Ad

घरी सडून मरण्यापेक्षा लढुन मरा


        तुमचे आदर्श कोण आहेत...? म्हटल्यावर डोळ्यासमोर दिसतात गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज. बरोबर ना..! मग ह्या लोकांनी कधी घरादाराचा, परिवाराचा, नातेवाईकांचा विचार केला का...?  राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढला असता पण राजसुखाचा त्याग करून राजघराणे का बरं सोडले असावे....? त्यांना स्वतःच्या परिवाराबद्दल प्रेम, आपुलकी नव्हती का.? पण सिद्धार्थ राजघराण्याच्या मोहात असते तर कदाचित इंग्लडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या १० हजार वर्षातील आणि जगातील १०० टॉप महामानवाच्या यादीत प्रथम स्थानावर सिद्धार्थापासून तयार झालेले "गौतम बुद्ध" आम्हाला दिसले नसते. राजसुखाचा लाभ घेतला असता तर जगाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिला नसता. २५०० वर्षाचा काळ लोटला तरी आजही संपूर्ण जग त्यांच्या विचारांवर चालत आहे..कारण "तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!"

          मूठभर मावळे घेऊन महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे हृद्यसम्राट छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या परिवारात गुंतले होते का..? परिवाराच्या अडचणी सोडवत बसले का...? नाही, कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आपल्या राज्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यामुळेच जगात महाराजांचे  नाव अभिमानाने घेतले जाते. आज करोडो मावळे महाराजांच्या कार्यावर स्तुतीसुमने वाहतांना थकत नाही.."शिवाजी महाराज की" म्हटल्याबरोबर 'जय' हा शब्द आपोआपच मुखात येतो कारण महाराजांचे कार्य हे समाजाच्या कल्याणासाठी होते. म्हणूनच आज आमचे ते आदर्श आहेत...
            स्त्री शिक्षणाची दारे उघडे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना गोविंदरावाने घराबाहेर काढले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वाटत नव्हते का..? की आपल्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नाही मग आपण समाजासाठी कशाला वेळ द्यायचा. पण नाही, जर त्यावेळी त्यांनी तसा स्वार्थी विचार केला असता तर आज दीडशे वर्षानंतर ते आमचे आदर्श झाले नसते. "चूल आणि मूल" या कचाट्यातुन महिला बाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या अस्तित्वाचा पताका फडकविला नसता. त्यांच्या नावाने चळवळी सुरु झाल्या नसत्या पण आज अभिमानाने त्यांचे नाव घेतले जाते कारण ते घरादाराच्या बंधनापासून अलिप्त होते. 
              बाबासाहेब विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांचा मुलगा  मरण पावला पण बाबासाहेब घरी आलेच नाही. का..? त्यांना वाटले नसेल का की माझा मुलगा मरण पावला, पत्नी एकटीच घरी आहे. तिला जाऊन आधार द्यावा. पण बाबासाहेबांनी त्या दुःखी प्रसंगी आपल्या परिवाराचा विचार केला नाही तर समाजाचा विचार केला म्हणून आज ते आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवित आहेत. आणि हो आमच्या माय-बापाने तर फक्त आम्हाला जन्म दिला. पण खरे उपकार बाबासाहेबांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि कष्टाचे आमच्यावर आहेत.. कारण आमच्या हक्कासाठी स्वतःच्या परिवारातील लोकांचा विचार न समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाईट रूढी, परंपरेला मातीत गाडून आम्हाला स्वातंत्र्याची चव चाखायला दिली...म्हणूनच ते आमचे आदर्श आहेत.
                  दिवसभर गावातील कचरा साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे, आणि ज्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी जगातला विद्वान माणूस (बाबासाहेब आंबेडकर )  खाली बसायचे ते वैराग्यमूर्ती गाडगे महाराज एकदा कीर्तन करत असतांना त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची वार्ता सांगितली पण मुलाच्या निधनाची वार्ता ऐकताच रडत न बसता गाडगे महाराज म्हणतात, "असे गेले कोट्यान कोटी कशाला रडू मी एकट्यासाठी'.... त्यावेळी कीर्तन जाऊदे म्हणून गाडगेबाबा घरी गेले असते तर अशिक्षित असलेल्या गाडगे महाराज यांचे नाव आज अमरावती विद्यापीठाला मिळाले नसते. 
              वरील सर्व महापुरुषांचे नाव आणि त्यांचे कार्य आम्हाला का माहित आहेत..? कारण ते कधीही स्वतःपुरते आणि घरापुरते विचार न करता समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्याच पुण्याईने आम्ही आज सन्मानाचे जीवन जगत आहोत..त्यांच्याच विचाराचा प्रभाव आमच्यावर पडला आहे. पण वांदा असा आहे की, जरी वरील सर्व आमचे आदर्श असले तरीही त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आम्ही लढा देतांना दिसत नाही हि भयंकर शोकांतिका आहे.....
           तुम्हाला साधा प्रश्न केला की तुमच्या आज्याच्या आज्याच नाव काय आहे..? फुस्स्स....माहित नाही. तुम्हाला तुमच्या पिढीमधील लोकांचे नाव माहित नाही पण २५०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तीचे नुसते नावच माहित नाही तर त्यांचे विचार आणि शिकवण आजही तुमच्या आचरणात आहे....  मग जरा विचार करा, तुम्हाला आज्याच्या आज्याच नाव नाही माहित कारण ते घराच्या बंधनातून कधी बाहेर पडले नाहीत पण आमचे महापुरुष हे स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले तेच आज आमच्या आदर्शच्या पंक्तीत विराजमान होते, आहेत आणि राहणारच....म्हणून घरी सडून मरण्यापेक्षा समाजात/चळवळीत येऊन लढून मरा..आणि असं स्वतःचे अस्तित्व निर्माण करा की येणाऱ्या शंभर पिढीत तुमचे नाव अभिमानाने घेतले जावे....

तूर्तास एवढेच...

-- प्रशांत चव्हाण 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com