मनसेच्या पाठपुराव्यानंतर रेशनिंग अधिकाऱ्यांना आली जाग
ठाणे
ठाण्यातील लोकमान्यनगरच्या मैत्री पार्क येथील रेशनिंग दुकानदाराच्या गैरव्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत गोरगरीबांच्या तोंडी जाणारा हक्काचा घास हिरावून घेणार्या रेशन दुकानांना आज शिधावाटप पथकाने भेट दिली. यावेळी येथील नागरीकांच्या तक्रारी पथकाने ऐकून घेतल्या. यासोबतच अशा दोषी दुकानांवर कारवाईचा कठोर बडगा उगारुन या दुकानदारांना धडा शिकवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या धान्यामध्ये गैरव्यवहार करणार्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सहा.शिधावाटप अधिकारी पटेल व विभागीय इन्स्पेक्टर परांदे यांच्या पथकाने या शिधावाटप दुकानाला भेट दिली. तसेच नागरिकांचे जबाब नोंदीवले. याअगोदर मागील आठवड्यात या दुकानाची पथकाने तपासणी करुन दुकानदाराचा जबाब नोंदवून घेतला होता. या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल वरिष्ठांना सुपूर्द करुन लवकरच योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन पटेल यांनी मनविसे शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणात अधिकार्यांची मिलिबघत असल्यामुळेच कारवाईत दिरंगाई होत आहे. या पध्दतीने कासवगतीने कारवाई होत असेल. तर मनसे त्यांच्या पध्दतीने या दुकानदारांना ताळ्यावर आणेल, असे मत उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले.
याबाबत मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे व शहर अध्यक्ष किरण पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिधावाटप अधिकारी गायकवाड व सहा. शिधावाटप अधिकारी पटेल यांची भेट घेत दुकानदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. दुकानदार धान्यवाटपात जो गैरव्यवहार करत होता. तसेच रेशन कार्ड वरील 'आर सी' नंबर मध्ये देखील फेरफार करत होता. त्याचे पुरावेही अधिकार्यांना दिले होते. यासंदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास मनसे आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला होता. यामध्ये उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, ओवळा माजीवडा विभाग सचिव मयूर तळेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष मंदार पाष्टे, सागर वर्तक, शाखाध्यक्ष संदीप शेळके, निखिल येवले व कार्यकर्ते यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या