५० टक्के मालमत्ता करमाफीची निरंजन डावखरेंची मागणी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
ठाणे
कोविड-१९ मुळे राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला. आतापर्यंत चार महिने आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले. त्यात वीज बिल वाढीचीही कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने नागरिकांना दिलासा म्हणून मालमत्ता करामध्ये ५० टक्के सवलत द्यायला हवी. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये मालमत्ता करमाफी करण्याबाबत राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मालमत्ता करात सवलत दिल्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न घटणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मालमत्ता कराची रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदान करावी, अशी विनंतीही आमदार डावखरे यांनी केली आहे.
ठाण्यातील नागरिकांनी १५ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण वर्षभराचा मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्याबाबत विचार करावा. त्याचबरोबर पैसे भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणीही आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
0 टिप्पण्या