आजही घराघरात अमावस्येच्या दिवशी नारळ फोडण्याची प्रथा आहे. एखादं नवीन काम विशेषतः बांधकाम सुरू करण्यापूर्वी पायाभरणी करण्याच्या जागेवर नारळ फोडण्याची परंपरा हिंदूस्तानी जनतेत फार पूर्वीपासून रूढ आहे. त्या प्रकाराला नारळ वाढवणे असे म्हणतात. पुजेच्या वेळेस नारळ फोडल्यानंतर पुजारी ब्राह्मणाकडून मस्त सुरस भाषेत कथा ऐकवली जाते नारळ वाढवण्याबद्दलची. अमावास्येला मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात. नारळ फोडल्याने पॉझिटिव एनर्जीचा संचार अधिक होतो म्हणून नारळ फोडले जाते. घरभरणीला लाल कापडात तंत्र फुकून नारळ लाल कापडात बांधून वर कुठेतरी लटकवले जाते. वर्षानुवर्षे ते नारळ तसेच राहते.
जेजुरीला लंगर तोडताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. घरची चौकट बांधून झाली की चौकटीला दरवाजा लावण्याआधी घरातल्या कर्त्या पुरूषाकडून नारळ चौकटीवर फोडून घेण्याची प्रथा आहे. यात नारळ उभा फुटावा यासाठी मिस्त्रीकडून आग्रह धरला जातो. असो.. बरंच काही आहे.
नारळच का फोडतात..
नारळा हा गोलाकार, वर शेंडा, केसांची रचना. नारळाला दोन डोळे असतात. त्यात पाणी असतं.
मनूस्मृतीचं राज्य अंमलात आणल्यापासून नरबळीचा प्रकार रुढ झाला. मला आता या घडीला मनूस्मृतीतील तो श्लोक आठवत नाही. पण नव्या बांधकामाच्या ठिकाणी महाराचं डोकं आपटून फोडलं जाई. त्याच्या कवटीतून निघालेल्या रक्तानं पायाभरणीची जमीन ओली केली जाई. चौथऱ्यावर रक्त शिंपडलं जाई. देवाच्या पुढे पशुचा बळी देण्यात येत असे,कारण देवाला प्रसन्न करण्यासाठी लाल रक्त हवेच असा समज मनुवादी व्यवस्थेने रुढ केला होता. मग देवाला लाल रक्त दाखवण्यापेक्षा दगडाला शेंदुर फासला व नारळाचे पाणी त्यावरती शिंपडले तेव्हापासून शेंदूर फासलेले दगड आपण मंदिर परिसरात पाहतो व त्याचवेळेपासून देवापुढे नारळ फोडण्याची प्रथा रुजू झाली.
विधू विनोद चोप्राचा एकलव्य नावाचा सिनेमा आहे. त्यात संजय दत्तला एक डायलॉग आहे.
"जैसे तुम लोग अपनी घर की सुरक्षा के लिए नारियल फोडते हो ना.. वैसे ही राजा लोग अपने महलो के लिए अछुतो का सिर फोडकर अपना गुडलक बनवाते थे। इस हवेली की दिवारो में अछुतो को दफनाया जाता था।
इंग्रज येईपर्यंत ही प्रथा राजरोसपणे सुरूच होती. पहिला सुरूंग लागला तो 1830 साली. १८३० मध्ये इंग्रजांनी नरबळी प्रथा बंदी घातली. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हण शुद्र स्ञी-पुरूषांना मंदिराच्या ठिकाणी डोके आपटुन त्यांचा बळी घेतला जायचा. ती प्रथा कायद्याने बंद केली. त्यानंतर १८६३ मध्ये इंग्रजांनी एक कायदा बनवून चरक पुजा करण्यावर प्रतिबंध घातला. आलिशान वास्तू किंवा पूल तयार करताना शुद्रांना पकडून जिवंत गाडले जात असे. असे केल्यास वास्तू आणि पूल खूप वर्षांपर्यंत टिकून राहतात अशी समजूत होती.
मनूस्मृतीच्या ठिकाणी कायद्याचे राज्य आल्यानंतर ब्राह्मणी सत्तेने धर्मसत्ता टिकवण्यासाठी नारळाचा वापर सुरू केला. आजही नारळ अर्पण होणाऱ्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी धर्मसत्ता आणि आर्थिक सत्ता ताब्यात ठेवण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणच्या मंदिरात विविध भाकडकथा रचून नारळ अर्पण करण्याऐवजी फोडण्याच्या प्रथा सुरू केली.
जेजुरीला खोबरं अन् हळद खाण्याची प्रथा आहे. ही प्रथा खंडेरायाच्या कालावधीत सुरू झाली. जेजुरीच्या परिसरात राहणारी रयत सर्दी, खोकल्यानं बेजार होती. त्यावर उपाय म्हणून सैनिकांनी जेजुरीच्या गडावरून भंडारा उधळला. आणि रयतेला खोबरं खाण्यास सांगितले. अँटीबायोटिक असणाऱ्या हळद आणि खोबऱ्यानं मेळ साधला. नंतर ती प्रथा रुढ झाली ती आजवर कायम आहे.
मी पहिली दुसरीत असेल तेव्हा आजीला विचारलं होतं.. नारळ फोडताना नाव घेतात ते कुणाचं असतं.. आज्जी सांगायची.. जागेवाल्या बाबाच्या नावानं नारळं फोडतात. आपण ज्या जागेवर राहतो त्या जागेवाल्या बाबाच्या नावानं. कुप्रथा वरच्या थरातून सुरू होतात. खालच्या थरांत अंधाधुंद पाळल्या जातात.
लोक म्हणतात प्रसाद म्हणून फोडलेल्या नारळाचं खोबरं नको खाऊ. पदार्थ म्हणून खा. मी तो ही नारळ खातो. काही वाईट वाटत नाही. स्मशानात ही मुद्दाम नारळ खातो. भले ते भयंकर जळालेलं असेल तरी तेव्हा तिथल्या उपस्थितांच्या भयावह नजरा पाहताना मला मजा येते. तीनशे डिग्रीपेक्षा जास्त जळाल्यावर जंतू जीवंत राहतात होय तिथं. तर असो.. (हा प्रयोग अनिस नेहमी राबवते.)
म्हणून भाषेतही आजवर नारळ वाढवला. शुभमंगल हो. जागेवाल्या बाबाच्या नावानं सारखे प्रकार ठरवून टाळतो. कुणी लिहीलेलं असेल तर ते वाचणंच नाकारतो. ठरवून कराव्या लागतात ह्या गोष्टी.
नरबळी अजूनही संपलेली नाही. ती प्रतिकात्मक स्वरूपात अजूनही जीवंत आहेच. आजही गणपतीला पाच नारळांचं.. दहा नारळांचं तोरण लावलेलं असतं नाट्यगृहात शिरतो तर पडद्याच्या मधोमध एक नारळ फोडून ठेवलेला असतो. सिनेमाचं शुटिंग सुरू करण्यापूर्वी नारळ फोडून मुहूरत शॉट दिला जातो. तेव्हा तिथल्या नारळाच्या तोरणांत मला मला रायनाक महाराच्या पूर्वजांच्या कवट्या तिथं त्या तोरणाला लागलेल्या दिसतात. आणि दोरीला शेठजींच्या पैंशांच्या माळा.
- मनोहर शांताराम खंदारे - पनवेल
0 टिप्पण्या