वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यास ७ जूनपासून परवानगी
मुंबई
राज्य सरकारने ३१ मे रोजी 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा करीत नियमावली जाहीर केली होती. मात्र त्यामध्ये गुरुवारी केलेल्या काही बदलानुसार आता मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे 'मुंबई एमएमआर' परिसरात सर्वसामान्यांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. शुक्रवार (५ जुन) पासून मैदानात व्यायामासाठीही बाहेर पडता येईल. बाजारपेठा आणि दुकानेही सुरू होणार आहेत. याशिवाय वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यासही ७ जूनपासून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मागील सुमारे तीन महिन्यापासून बंद असलेली वृत्तपत्रे पुन्हा एकदा वाचकांच्या हातात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्तमानपत्राशी निगडीत अनेकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागांत आता नागरिकांना परवानगीशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी मात्र अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी परवानगी घेऊनच प्रवास करता येत होता. नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास परवानगी असली तरी लांब प्रवासासाठी मात्र मनाई असेल. विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यांमध्ये शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. यात ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल.
पहाटे पाच ते रात्री सात वाजेपर्यंत लोकांना उद्यानात जाता येईल. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावले आदी प्रकारचा व्यायाम करता येणार. मात्र, कोणत्याही ग्रुप अॅक्टिव्हिटीला परवानगी नाही. खुल्या मैदानात गर्दीही करता येणार नाही. याशिवाय प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. गॅरेज, वर्कशॉप देखील सुरू करता येणार आहेत. मात्र खासगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ८ जूनपासून खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जी संख्या अधिक त्या क्षमतेने सुरू करता येतील. राज्यात लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली असली तरी ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, स्पा, सलून, स्विमिंग पूल या गोष्टी बंद राहणार आहेत. या दरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ अशी संचारबंदीही असेल.
0 टिप्पण्या