Top Post Ad

राजकीय हस्तक्षेपामुळे ठा्ण्यात कम्युनिटी किचन योजनेचा बोजवारा

ठा्ण्यात कम्युनिटी किचन योजनेचा बोजवारा


आता अनेक ठिकाणी कम्युनिटी किचन बंद 


राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या संस्थांनी केले काम बंद


मानपाडा परिसरात लोकांचे चेहरे पाहून अन्नधान्य वाटप केले जात असल्याचा आरोप


लोकप्रतिनिधींनी घेतली स्वत:च्याच संस्थांच्या नावावर मदत


ठाणे


कोरोनाच्या महामारीत मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून ठाण्यात कम्युनिटी किचनचा प्रयोग सुरु करण्यात आला. परंतु  कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच सामाजिक संस्थांद्वारे पत्रव्यवहार करुन शेकडो टन किराणा सामान उचलले आहे. त्यामुळे ज्यांना त्याची खरी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहचत नसल्याची माहिती आता समोर येत आहे. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे किचन कम्युनिटी योजनेचा पार बोजवारा उडाला आहे. ज्या सामाजिक संस्था या जनहिताच्या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने योगदान देत होत्या, त्या संस्थांनाही या मंडळीनी हद्दपार केले आहे. राजकीय त्रासामुळे या सामाजिक संस्थांनी काम बंद केल्याने ज्यांना गरज आहे, अशा अवघ्या २० टक्के नागरिकांपर्यंतच ही मदत पोहोचत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. उर्वरित मदत नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांना अर्थात त्यांच्या संभाव्य मतदारांना दिली आहे.


मुंब्यात एकाच नगरसेवकाने स्वत:च्या संस्थेच्या नावाखाली हजारो टन किराणा साहित्य उचलल्याने इतर नगरसेवकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत चक्क ठिय्याही मांडला.आपल्याकडून मदत पोहोचली नाही, तर नागरिक आपल्याला मतदान करणार नाही, असा सूरही या नगरसेवकाने आळवला.


कोरोनाची महामारी गरीब, मजुर, कष्टकरी वर्गाच्या पथ्यावर पडली तर लोकप्रतिनिधींना ती संधी म्हणून उपलब्ध झाली असल्याचे सर्वत्र दिसत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. यामुळे प्रत्येकजण आपआपल्या घरात बंदीस्त झाला.  प्रशासन या सर्व गोरगरीब जनतेच्या जेवणाची सोय करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लॉकडाउन झाल्यानंतर सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून रोज कमावून रोज खाणाऱ्या आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी अन्न-धान्य आणि किराणा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यामध्ये काही सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली.  परंतु कोरोनाला संधीप्रमाणे बघून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाण्यात लोकप्रतिनिधींच्या मार्फत सुरु झाला असल्याचा आरोप ठाणेकरांनी केला आहे.



शासकीय मदत पोहोचण्याच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून ही योजना पुढे सुरु ठेवावी, असे सांगण्यात आले. परंतु मधल्या काळात अन्नधान्याऐवजी हातावरील पोट असणाऱ्यांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण देण्यात यावे, अशी संकल्पना पुढे आली. महापालिकेकडे हा उपक्रम आल्यानंतर ही योजनेचे तीनतेरा झाले.  अनेक राजकीय मंडळी, बड्या नगरसेवकांनी शेकडो टन तांदूळ, दाळ, तेल, मीठ उचलले. दोन ते तीन दिवस काहींनी हे किचन शासनाच्या पथकाला दाखवले. परंतु आता अनेक ठिकाणी हे किचन बंद झाले असून, अनेक राजकीय मंडळींनी शासनाच्या किराणा साहित्यावर डल्ला मारला असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.


गोरगरीबांसाठी येणारी मदत शासनामार्फत होत असताना राजकीय मंडळी लोकप्रतिनिधी ही मदत आपण करीत असल्याचे प्रभागातील नागरिकांना भासवत आहेत. तसेच तयार जेवण देण्याऐवजी अन्नधान्य आपापल्या प्रभागांमध्ये वाटण्याचे काम सुरू झाले आहे. काहींनी तर या साहित्याच्या पाकिटांवर आपल्या प्रचाराचे लेबल लावले असल्याची धक्कादायक माहितीही पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर केवळ आपल्याच जवळच्या लोकांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही मदत कशी पोहोचेल यावरच अधिक भर दिला जात आहे. मानपाडा परिसरात लोकांचे चेहरे पाहून अन्नधान्य वाटप केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.  


विशेष म्हणजे शासनाकडून आलेल्या या मदतीसाठी शासनाकडून त्यात्या भागात फलकही लावले जात आहेत. मार्केटींग करणाऱ्या नगरसेवकांनी शासनाची मदत घेतल्यानंतर असे फलक लावण्यास मज्जाव केला आहे. काहींनी तर शासनाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन, तुमचे फलक लावले तर आम्ही परत निवडून येऊ शकणार नाही, असे म्हणत फलक लावण्यास विरोध करत आहेत. 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com