शहापूरात लाँकडाऊनमुळे अनेक विवाह सोहळ्यांचे बुकींग रद्द 

शहापूरात लाँकडाऊनमुळे अनेक विवाह सोहळ्यांचे बुकींग रद्द शहापूर 


 शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात घराच्या मंडपामध्येही विवाह सोहळे पार पाडले जातात. भावकी, गावकी यांच्या मदतीने हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडले जाते. ग्रामीण भागातील बहुसंख्य विवाह सोहळे अलिकडे उन्हाळ्यापूर्वीच म्हणजे पाणीटंचाईची झळ बसू नये म्हणून मार्च, एप्रिलमध्ये पार पाडले जातात. अशा या विवाह सोहळ्यांवर गेले काही दिवस कोरोनाचे संकट उभे ठाकलेले दिसून येत आहे. त्यामुळे रद्द झालेल्या विवाह सोहळ्यांमुळे अनेक यजमानांनाही याचा फटका बसला आहे. साखरपुडा झाल्यानंतर विवाहाची निमंत्रण पत्रिका छापली जाते. या पत्रिका वाटण्यासाठी व फिरण्यासाठी दोन महिने तरी यजमान व त्यांच्या कुटुंबियाना लागतात. अनेकांनी विवाहाच्या पत्रिका छापल्याही आहेत. मात्र, कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे. पत्रिकांचा खर्चही वाया गेला आहे. काहींनी विवाह सोहळे रद्द करुन ते पुढेही ढकलले आहेत. अद्यापही त्यांनी विवाहाच्या तारखाही निश्चित केलेल्या नाहीत. अनेकांनी अगोदरच ठरविलेल्या बेन्जो पार्टी, वाजंत्री, भटजी यांची सुपारी रद्द केली आहे. 


कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशभरात लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे खरेदी-विक्रीपासून सर्व आस्थापनांवर गडांतर आलेले आहे. विशेष म्हणजे यावर्षी बोहल्ल्यावर चढणाऱ्या अनेक वधू-वरांनांही शुभमंगलऐवजी कोरोनापासून सावधान म्हणण्याची वेळ आलेली आहे.  ग्रामीण भागात होणाऱ्या मंडपातील विवाहापासून ते अगदी लहान-मोठ्या शहरांमध्ये बुकींग करण्यात आलेल्या मंगल कार्यालयांनाही याची झळ बसलेली असल्याने यजमानांसह हाँल मालकांना याचा मोठा फटका बसलेला दिसून येत आहे. अनेकांनी विवाह मुहूर्त एप्रिल महिन्यातच धरले होते मात्र, कोरोनामुळे लाँक डाऊन वाढल्यामुळे अनेकांनी एप्रिलमधील बुकींग केलेल्या विवाह मुहूर्तावर पाणी सोडले आहे. मे महिन्यात एकूण १०  विवाह मुहूर्त तर जून महिन्यात ६  मुहूर्त आहेत मात्र, मे महिन्यात अधिक तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईची झळ तर जूनमध्ये पावसाची सुरुवात अशा कात्रीत यजमान सापडले असून त्यांना विवाह मुहूर्त ठरविणे कठीण जात असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. सध्या तरी फक्त सर्वत्र शहापूर तालुक्यातील वासिंद  ,किन्हवली ,डोळखांब खर्डी ,कसारा या भागातील ग्रामीण भागात सर्वत्र कोरोना सावधान असं म्हणायची दुर्दैवी वेळ लोकांवर आली आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA