‘कोविड-19’च्या टाळेबंदीदरम्यान लहान मुलांच्या सुरक्षिततेला मोठा धोका
‘आयसीपीएफ’चे निरीक्षण
ठाणे
ठाणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये बाल अश्लील सामग्री (ज्याला 'बाल लैंगिक अत्याचार सामग्री' असेही म्हटले जाते) प्रचंड प्रमाणात पाहत असल्याचे एका निरीक्षणात म्हटले आहे. ‘कोविड-19’मुळे लागू झालेल्या सध्याच्या टाळेबंदीच्या काळात त्यामुळे या शहरांतील लहान मुलांच्या जीवाला व सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) म्हटले आहे.
देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाईल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असा ‘ऑनलाईन डाटा मॉनिटरींग वेबसाईट्स’चा अहवाल आहे. ‘पोर्नहब’ या जगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, टाळेबंदीपूर्वी चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने 24 ते 26 मार्च 2020 दरम्यान 95 टक्क्यांनी वाढले आहे. हे निरीक्षण ‘आयसीपीएफ’ने मांडले आहे.
लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन असणाऱे लाखो लोक सध्या ऑनलाईन पद्धतीने आपली विकृती भागवीत आहेत. त्यामुळे मुलांसाठी इंटरनेट हे माध्यम अत्यंत असुरक्षित बनले आहे. यावर कठोर कारवाई न झाल्यास, मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि आपल्या राष्ट्रीय धोरणाचे हे उल्लंघन आहे. पोर्नोग्राफिक वेबसाइट्स त्यांच्या वेबसाइटची यूआरएल बदलून भारतीय कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवीत आहेत. भारत सरकारने तातडीने बाल अश्लीलतेवर कारवाई केली पाहिजे, तसेच बाल-लैंगिक अत्याचार सामग्रीविरूद्ध आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी सर्व देशांशी चर्चा करायला पाहिजे,’’ असे प्रतिपादन ‘आयसीपीएफ’च्या प्रवक्त्या निवेदिता आहुजा यांनी केले आहे.
जिओ आणि एअरटेल यांसारखे इंटरनेट सेवा पुरवठादार आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून बाल अत्याचारासंबंधी वेबसाईट्स प्रदर्शित झाल्यास, या कंपन्यांना त्याकरीता जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभा समितीने केली आहे. या शिफारसी तातडीने लागू करण्याची गरज ‘आयसीपीएफ’ने व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदूर यांसारख्या 100 शहरांमध्ये ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठी किती मागणी आहे, या बाबतचे संशोधन ‘आयसीपीएफ’ने‘ केले आहे. भारतातील बाल लैंगिक अत्याचार सामग्री ’या नावाचा हा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर 2019 मध्ये 100 शहरांमध्ये सार्वजनिक ‘वेब’वर ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठी सरासरी 50 लाख इतकी दरमहा मागणी होती, ती आता वाढली आहे. या अहवालानुसार, मुले गुदमरणे, त्यांना रक्तस्राव होणे आणि त्यांचा छळ होणे, या स्वरुपाच्या हिंसक सामग्रीच्या मागणीत 200 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यावरून हे सूचित होते, की ‘भारतीय पुरुष सर्वसाधारण चाईल्ड पोर्नोग्राफीत समाधान मानत नाहीत, त्यांना हिंसक आणि शोषक स्वरुपाच्या फिल्म पाहायच्या असतात.’ डिसेंबरमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ही मेट्रो शहरे, तसेच मध्यम स्वरुपाची व राज्यांच्या राजधानी असलेली शहरे ही ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठीची ‘हॉटस्पॉट’ म्हणून गणली गेली आहेत. याच शहरांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या शहरांमध्ये बालशोषणाची प्रकरणे होऊ नये, म्हणून ऑनलाईन दक्षता वाढविण्यासाठी संस्थेने सरकारी अधिकाऱ्यांना विनवणी केली आहे.
‘आयसीपीएफ’ने आपल्या अहवालात ‘युरोपोल’, ‘युनायटेड नेशन्स’, ‘ईसीपीएटी’ यांच्या अहवालांचा हवाला दिला आहे. लहान मुलांवर अत्याचार होण्यात आता ऑनलाइन पद्दतीमुळे वाढ झाली आहे. ‘चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइन’च्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तातडीची मदत व संरक्षण मागणारे 92,000 हून अधिक कॉल्स टाळेबंदीनंतरच्या 11 दिवसांत या हेल्पलाइनला आलेले आहेत. यावरून, टाळेबंदीच्या काळात लहान मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे भीषण सत्य समोर येते. ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’सारख्या लैंगिक अत्याचार सामग्रीला मागणी मोठ्या प्रमाणात वाढले, यातून मुले लैंगिक अत्याचारास बळी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे, असे ‘आयसीपीएफ’ने अहवालात नमूद केले आहे.
‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ची ‘हॉटस्पॉट्स’
- साधारण स्वरुपाच्या ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’च्या सामग्रीची मागणी भुवनेश्वर आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक आहे.
- विशिष्ट व्यक्ती, वयोगट, स्थाने इत्यादींशी संबंधित सामग्रीची मागणी कोलकाता, सिलीगुडी, हावडा, चंदीगड, गुवाहाटी, इंदूर, भुवनेश्वर आणि चेन्नई या शहरांमध्ये सर्वात जास्त आहे.
- उत्तरेकडील नवी दिल्ली, लुधियाना, रायपुरा, लखनऊ, चंदीगड, आग्रा आणि सिमला येथे, मध्य भारतात रायपूर, रांची आणि इंदूरमध्ये, पश्चिमेतील मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदाबाद; पूर्वेस इम्फाळ, गुवाहाटी, कोलकाता, हावडा आणि शिलॉंग; तसेच दक्षिण भारतात बंगळूर, कोची आणि तिरुअनंतपुरम येथे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ला सर्वाधिक मागणी आहे.
0 टिप्पण्या