लॉक़डाऊन असतानाही  नगरसेवकाची पार्टी

लॉक़डाऊन असतानाही  नगरसेवकाची पार्टी


  पनवेल: 
एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. मात्र या काळातही  काल रात्री तक्का येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अजय बहिरा यांनी सामाजिक संवेदना आणि कायदा पायदळी तुडवून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. शहर पोलिसांनी नगरसेवकांसह अन्य दहा जणांना पोलिस ठाण्यात नेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक वीसचे भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांचा काल वाढदिवस होता. देशात सगळीकडे कोरोनाचे ग्रहण लागले आहे. संचारबंदी आणि साथीरोग कायद्याची नाईलाजास्तव सगळीकडे अंमलबजावणी करावी लागली असताना काही नगरसेवक असंवेदनशीलतेचे दर्शन करीत आहेत. दुर्दैवाने हे सगळं पनवेलकरांच्या नशिबी आले आहे.
तक्का येथील नगरसेवक अजय बहिरा यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर जंगी पार्टीचे आयोजन करून मित्रांना आमंत्रण दिले होते. पोलिस आयुक्तांनी घोषित केलेला जमाव बंदीचा 144 कलम आणि राज्य शासनाने सक्तीने केलेला साथी रोग कायद्याची चिरफाड करत या महाभागाने खास पार्टी आयोजित करून सत्तेची मस्ती कशी माणसाला राक्षस बनवते ते दाखवून दिले. 
विशेष म्हणजे कालच महापालिका क्षेत्रातील खारघर येथील 33 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला असताना, असा उत्सव केल्याने सगळीकडून छी थू होत आहे. या पार्टीसाठी खास वीस किलो कोळंबीचा जेवणात बेत केला होता आणि ओली पार्टीही केल्याची माहिती समोर आली आहे. 
शहर पोलिस ठाण्याचे कडक शिस्तीचे धाडसी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकाने बहिरा यांच्या सोहळ्याचे व्हिडिओ चित्रण केले आहे. त्यानंतर भक्कम पुराव्यांसह 11 जणांना फरफटत नेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचे सावट असताना नगरसेवकांनी निर्लज्जपणे वाढदिवसाचे मोठे फलक लावून अकलेचे धिंडवडे काढले होते. त्यात शेकापही आघाडीवर होता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या कोरोनाचे 21 रुग्ण पनवेलमध्ये असताना बेपत्ता आहेत. पण त्यांच्या वाढदिवसामुळे पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी त्यांना इथे फलकबाजीतून चमकवले आहे.
त्याच दरम्यान भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खास मर्जीतील घोटाळेबाज युवानेता मयुरेश नेटकर याच्या वाढदिवसाच्या फलकांनी पनवेल ग्रासले होते. फलकांचा खर्च गटनेते परेश ठाकुर यांनी केल्याची चर्चा होती. इतकी असंवेदनशीलता असलेले राजकीय नेतृत्व पनवेलला लाभल्याने 'हेची फळ काय मम तपाला' अशी कपाळावर हात मारण्याची परिस्थिती पनवेलकरांवर आली आहे. काही नगरसेवकांनी बुद्धी चातुर्य वापरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे व्हिडिओ, फलक सोशल मिडियावर टाकून चमकण्याची हौस भागवून घेतली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad