Trending

6/recent/ticker-posts

राजशिष्टाचारांचा भंग पेण प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्याची पनवेल संघर्ष समितीची मागणी 

प्रांताधिकाऱ्यांच्या  खुर्चीत आमदार  


राजशिष्टाचारांचा भंग करून घेतल्याने पेण प्रांताधिकारी पुदलवाड यांना निलंबित करण्याची पनवेल संघर्ष समितीची मागणी 


पनवेलकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी समन्वय राखण्यासाठी बोलविलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेले भाजपाचे पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांना पुदलवाड यांनी राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचे आसन दिले. दंडाधिकारी यांच्या खुर्चीत मग पाटील आसनस्थ झाले. त्यामुळे पदाचा आणि राजशिष्टाचाराचे भान न ठेवणाऱ्या पुदलवाड यांना त्वरित निलंबित करावे, अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.


भाजपाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या मागणीवरून प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी काल त्यांच्या कार्यालयात बैठक बोलविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रशासनामध्ये समन्वय राखण्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी ही बैठक होती. बैठकीला उपस्थित राहिलेले आमदार रवीशेठ पाटील यांनी थेट प्रांताधिकारी पुदलवाड यांच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि प्रांताधिकारी, तहसीलदार, पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना संबोधित केले. 
प्रांताधिकारी हे पद उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी दर्जाचे आहे. तशी पाटी खुर्चीच्या मागील भिंतीवर ठळक अक्षरात असतानाही पदाचा भान विसरलेल्या पुदलवाड यांनी आमदारांना त्यांची खुर्ची देणे कायदा आणि राजशिष्टाचाराचा भंग कारणारे आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो.


पुदलवाड यांनी राज्य शासनाच्या वर्तन आणि शिस्तीबाबतच्या 1991 च्या अध्यादेशाला काळीमा फासल्याने त्यांच्यासह बैठकीला उपस्थित असलेल्या तहसीलदार अरुणा जाधव, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या तक्रार अर्जाच्या प्रती त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव अजॉय मेहता, महसूलचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाचे अप्पर सचिव नंदकुमार, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आदींना पाठवल्या आहेत.


Post a Comment

0 Comments