आठवडी बाजार बंद, उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने आदिवासी हवालदील
ठाणे
ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, तर पालघर जिल्ह्य़ातील वाडा, मोखाडा या तालुक्यांतील महत्त्वाचे बाजार बंद असल्याने फिरते व्यापारी, दुकानदार, छोटे उपाहारगृह यांची आर्थिक विवंचना होत आहे. आर्थिक चक्र थांबल्याने भविष्याचे नियोजन करायचे कसे, असा सवाल छोटय़ा व्यापाऱ्यांसमोर आहे. पावसाळय़ापूर्वी करायच्या दुरुस्ती, शेती अवजारे, अन्न-धान्य खरेदी बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनाही पुढचे चार महिने कसे काढायचे, असा प्रश्न पडला आहे.
आठवडी बाजारांच्या निमित्ताने तालुक्यातील फिरते व्यापारी, शेतकरी, दुकानदार आणि विक्रेते यांचा व्यवसाय होतो. या बाजारांमध्ये भाजीपाला, फळे यांच्यासह कडधान्य, कपडे, सुकी मासळी, गावठी कोंबडी, बाबूंच्या टोपल्या, लाकडय़ाच्या वस्तू, शेती अवजारे आणि हंगामी वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत होती. पावसाळ्यापूर्वी करायच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक लोखंडी, लाकडी अवजारे, नाल, पागा, नांगर दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी हे आठवडी बाजार महत्त्वाचे ठरत होते. पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्ती, छप्पर दुरुस्तीच्या कामांसाठीची आवश्यक साधनसामग्री मिळण्यासाठीही आठवडी बाजारांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक बाजारांत गाई, म्हशी, बैल आणि बकऱ्यांची खरेदी-विक्रीही होत होती. आठवडी बाजार बंद पडल्याने या खरेदी-विक्रीला मोठा फटका बसला आहे.
टाळेबंदीमुळे गाव, शहरांपासून दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासींच्या हाताला रोजगार नाही. दारिद्रय़ाचा सामना करत असताना आलेल्या टाळेबंदीमुळे हाती असलेले काम, आठवडी बाजारही बंद असल्याचा ताण आता आदिवासी वस्त्यांमध्ये दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत काही लोकप्रतिनिधींनी काही दिवसांचा शिधा देऊन डझनवारी छायाचित्रे काढून घेतली. शिधा दुकानदारांनी फक्त तांदूळ दिला. मग अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला जगवायचे कसे, असा सवाल मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसमोर आ वासून उभा आहे. शासनाने वाटलेला शिधा किती दिवस पुरेल माहीत नाही. नियोजनशून्य राजव्यवस्थेने मारल्यानंतर अखेर आदिवासींना त्यांच्या हक्काच्या निसर्गाने तारल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. तुटपुंजी मदत, अपुरा शिधा आणि हाती नसलेला पैसा यांमुळे आदिवासींना जंगलातील कंदमुळे, रानकेळी खाऊ न गुजराण करावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, नाणे घाट आणि दाऱ्या घाटाच्या भागात सध्या हे चित्र मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे. करोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना निसर्गाने मात्र आदिवासींना साथ दिली आहे. रानमेवा, मासे, मध, डिंक विकून, थोडीफार मोलमजुरी करून त्यांची गुजराण होत होती. करोना काळात सर्व गोष्टी बंद असल्याने आणि घरातील शिधा संपल्याने या आदिवासींवर कंदमुळे खाण्याची वेळ आली आहे. त्याचसोबत रानकेळी अर्थात कौदर हेही या आदिवासींचे प्रमुख अन्न बनले आहे. केळीच्या खोडातील कंद आणि गाभा याचा वापर जेवणात सुरू केला आहे.
0 टिप्पण्या