Top Post Ad

असमानतेच्या रोगाचा समानतेने उपचार करणारे डॉक्टर म्हणजे राष्ट्रपिता जोतीराव फुले

 

 
जोतीराव फुले यांचे मूळ गाव साताऱ्या मधील कटगुण होते.त्यांचे पूर्वज उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी गावी राहण्यास आले होते.त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते.फुलांचा व्यवसाय केल्यामुळे त्यांचे आडनाव गोऱ्हे नावाऐवजी फुले हे आडनाव रूढ झाले. गोविंद शेटीबा फुले यांना राणोजी आणि कृष्णा असे दोन भाऊ होते.फुलांच्या व्यसायतील नावलौकीक झाल्यामुळे राणोजी,कृष्णा आणि गोविंद या भावंडांची नावे रावबाजी पेशवे यांच्या कानी गेल्यामुळे त्यांनी त्यांना फुलांचे आणि फुलबागेच्या कामाची कामगिरी दिली.त्यांनी पुरवलेल्या उत्कृष्ठ सेवेमुळे पेशव्यांनी त्यांना जमीन इनाम दिली.पुढे रावबाजीची अन्यायी जुलमी विषमतावादी पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली.त्यामुळे घर घर झालेले फुले कुटुंबातील अंतर्गत वादामुळे ते विभक्त होऊन कामधंदा करू लागले.यात पुण्यात गोविंदरावांचे भाजीपाल्याचे दुकान चांगले चालले.या सुमारास पुण्याजवळील धनकवडी गावातील झगडे पाटील यांची कन्या चिमणाबाई यांच्याशी ते विवाह बंधनात अडकले.पुढे या उभयतांना दोन मुले जन्मास आली पहिल्या मुलाचे नाव राजाराम तर दुसऱ्याचे नाव जोतीराव (जन्म ११ एप्रिल १८२७) होते.जोतीराव म्हणजेच आपले राष्ट्रपिता जोतीराव फुले होय.जोतीरावांच्या लहानपणी त्यांच्या आईचे निधन झाले.गोविंदरावांनी दुसरा विवाह न करता स्वतःलक्ष घालून जोतीरावांचा सांभाळ केला.

.शिक्षण हे माणसाचे आयुष्य घडवणारा महत्त्वाचा भाग आहे.शैक्षणिक ज्ञानाने मानवाची प्रगती होते. इंग्रजी सरकारने १८१३ मध्ये भारतात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. शिक्षणाची नवी पहाट सुरू झाली.१८२४ मध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी पुण्यात शाळा काढल्या १८३५ साली इंग्रज सरकारने (लॉर्ड बेटींग) युरोपियन वाड:मय आणि शास्त्र यांचा प्रचार करण्याचा उद्देश व्यक्त केला तर २ फेब्रुवारी १८३५ मध्ये इंग्रज शासनातील पहिले विधीमंत्री तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष थॉमस मेकॉले यांनी इंग्रजी भाषेत पाश्चिमात्य शिक्षण देण्याचा निर्णय दिला.इंग्रजी भाषा ही आज पाहतो तर ती जागतिक भाषा आहे.या इंग्रजी माध्यमाने पूर्ण जग जवळ आले आहे. या सर्वघडामोडींमुळे भारतात नव शिक्षणाची पहाट उजाडली.

शिक्षण घेणे ही एका ठराविक समाजाची आणि भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली.जुनी प्रचलित कालबाह्य शिक्षण व्यवस्था मागे पडली.बाहेरील जगाचे प्रगत ज्ञान मानवतावादी विचार आचार कृती इ.ज्ञान भारतीयांसाठी मिळण्यास मदत झाली.शिक्षणाचे महत्त्व गोविंदरावांनी ओळखल्यामुळे त्यांनी आपला मुलगा जोतीरावांना १८३४ मध्ये शाळेत घातले. प्राथमिक शिक्षण झाल्यावर जोतीरावांना शाळेतून काढले.सावित्रीमाई (वय वर्षे ८)यांच्याशी जोतीरावांचा(वय वर्षे १४) विवाह करण्यात आला.१८४१ मध्ये गोविंद रावांनी परत जोतीरावांची शैक्षणिक तळमळ पाहून परत स्कॉस्टिश मिशनरीच्या शाळेत घातले यामुळे जोतीरावांच्या ज्ञानात प्रचंड भर पडली.थोर महापुरुष यांचे विचार आणि आत्मचरित्रे यावेळी त्यांनी पुस्तकातून वाचून काढली.विविध चर्चा आणि वैचारिक साहित्यातून त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली.जोतीरावांच्या वैचारिकता वाढली. शारीरिक संपत्ती आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व ओळखून याकाळात जोतीरावांनी लहुजी बुवा मांग यांच्याकडून शस्त्रांचे शिक्षण आणि व्यायामाचे धडे घेतले.
 
समाजसेवा करण्यासाठी जोतीरावांच्या आयुष्याला वेगळे वळण :-जोतीराव एका ब्राम्हण मित्राच्या लग्नात त्यांना आमंत्रण मिळाल्यामुळे गेले.तेथे लग्नाच्या मिरवणुकीत ते ब्राम्हणांसोबत चालू लागले ते शूद्र असल्याचे काही सनातन ब्राम्हणांस समजल्याने त्यांनी त्यांचा हीनता बोध अपमान करून जाब विचारला.हा अपमान जोतीरावांच्या जिव्हारी लागला.ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र या चार वर्णांच्या नावाने हिंदू धर्मात अन्याय अत्याचार होत आहे.जात आणि वर्ण व्यवस्थेने मानवतेला पायदळी तुडवले आहे.ब्राह्मणांची ही मक्तेदारी चुकीची आहे.याचा राग जोतीरावांना आला.या अन्यायी वर्ण आणि धर्म संकटावर हल्लाबोल करण्याचा निर्धार जोतीरावांनी केला.या प्रसंगातून समाज क्रांतीच्या अजिंक्य योध्याचा जन्म झाला. आपल्या जोतीनावाप्रमाणे जोतीरावांनी माणसांच्या समानतेची मशाल हातात घेऊन ज्योत पेटवली आणि कित्येक वर्षे पिढ्यान पिढ्या काळोखात असणाऱ्या भारतीय समाजातील अंधार दूर करण्यास प्रकाशाची मशाल ज्योत हातात घेतली. भूतकाळ, वर्तमान,आणि भविष्य काळाचा अभ्यास करून त्यांनी मौलिक विचार मांडला आणि त्या विचाराला व कल्पनेला कृतीची जोड देऊन सामाजिक क्रांती या क्रांतीवीराने सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात घडून आणला!

|| विद्येविना मती गेली    मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली    गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले     इतका अनर्थ एका अविद्येने केले||
विद्येचे महत्व ओळखणाऱ्या महात्मा  जोतीरावांनी सारा इतिहास बदलवण्यास सुरुवात केली.
 
१) शैक्षणिक काम :-भारताच्या इतिहासात तीन हजार वर्षाच्या काळखंडानंतर प्रथम मनु व्यवस्थेला फाट्यावर मारून ज्ञानाची कवाडे स्त्रियांना आणि शूद्रांना उघडे करून देण्याचे त्यांनी ठरवले.१८४८ मध्ये पुण्यात बुधवार पेठेत भिडे वाड्यात जोतीरावांनी भारतातील स्वतंत्र पहिली मुलींची शाळा उघडली.या शाळेत अस्पृश्य समाजातील मुलींना शाळेत प्रवेश दिला.हा भारतातील स्त्री मुक्तिचा पहिला दिवस होता.स्त्रियांना भारतीय मनुवादी परंपरेमध्ये दुय्यम स्थान दिले होते.शूद्रांप्रमाणे हीन वागणूक दिली होती.शूद्रांनी वेदपठण केले तर त्यांच्या कानात काढलेले शिसे ओतले जायचे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.विविध रूढी परंपरेत स्त्रियांना बांधलेले होते. अस्पृश्यांना गळ्यात मडके आणि पाठीमागे खराटा अशी अमानवी वागणूक दिली होती. एका विशिष्ट (ब्राम्हण)समाजाला सर्व अधिकार होते.मनू संस्कृतीच्या हीन विचारास उडवून लावणारे जोतीराव पहिले भारतीय होते.मनूच्या बालेकिल्ल्यात ज्ञानदानाच्या कार्याचा हा फार मोठा कृतीशील वैचारिक हल्ला होता.या हल्ल्याने मनूच्या विचारसरणीच्या लोकांना हादरा बसला.सुरुवातीला जोतीराव या शाळेत शिकवत असत.पुढे जोतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीमाई यांना शिकवले,त्या त्या शाळेत मुलींना भारतातील पहिली शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या,जाता येता सावित्री माई यांच्या अंगावरती शेण,गोळे सनातनी लोकं मारत आणि वेडे वाकडे सनातनी लोक बोलत.

ही शाळा बंद पडावी म्हणून सनातनी ब्राम्हण आणि स्वजातीय समाजाने जोतीराव आणि गोविंदरावांवर दबाव आणला.समाज बहिष्कृत करण्याच्या धमक्या दिल्या यातून वडिलांनी जोतिरावांनी समजावून सांगितले परंतु जोतीराव ऐकले नाहीत यामुळे त्यांना त्यांच्या घरातून १८४९ मध्ये घराबाहेर जावे लागले.स्वतःवर आलेल्या संकटातून निघण्यासाठी जोतीरावांना काम धंदा करावा लागला म्हणून ही शाळा बंद झाली. जोतीरावांचा आर्थिक जम बसल्यावर जोतीरावांनी परत सदाशिव गोवंडे यांनी उपलब्ध केलेल्या जागेत जुना गंजपेठेत पुण्यात परत शाळा सुरू केली.शाळेत मुलींची संख्या वाढल्या मुळे जोतीरावांना दुसरी जागा भाड्याने घ्यायची होती. स्व:धर्मातील लोकांनी जागा शाळेसाठी भाड्याने न दिल्यामुळे एका मुस्लिम समाजातील व्यक्तीची जागा भाड्याने घेण्यात आली.पुढे ३ जुलै १८५१ रोजी आण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बुधवार पेठेत पुण्यात दुसरी मुलींची शाळा सुरू केली आणि तिसरी शाळा १७ सप्टेंबर १८५१ रोजी वेताळ पेठेत मुलींची शाळा काढली.मे कॅडी यांच्या अध्यक्षतेखालील शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्या कडून जोतीरावांचा शाल देऊन सत्कार १६ नोव्हेंबर १८५२ रोजी करण्यात आला.

२) सामाजिक सुधारणा:-त्याकाळातील विधवा आणि कुमारी मातांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि बालहत्या या अशा मातांची आत्महत्या रोखण्यासाठी  जोतीरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना १८६३ मध्ये केली.या बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्माला आलेल्या मुलांची अनाथ आश्रमात जोतिरावांनी संगोपन केले. अशाच एका मुलाला जोतिरावांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले आणि पुढे त्याला समाजाची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनविले.केशवपन, पुनर्विवाह निषेध,स्त्रियांचे नानाप्रकारे होणारे अन्याय, अत्याचार,त्यांचे निरीक्षण करून इत्यादीवर जोतीरावांनी आवाज उठवला त्यांचे प्रश्न जगापुढे व समाजापुढे मांडले.स्त्रियांना शुद्रांदिशुद्रांना ज्ञानदानाचे काम केले. १८६८ मध्ये अस्पृश्य समाजाला घरातील पाण्याचा हौद पिण्यासाठी मोकळा करून दिला.या वेळी ही त्यांना जाती बहिष्कृत करण्याच्या धमक्या देण्यात आल्या पण या धमक्यांना त्यांनी भीक घातली नाही.

३) साहित्य लेखन:-जोतीराव हे फार मोठे संशोधक,विचारवंत,साहित्यिक होते.या आदर्श शिक्षक,समाजसेवकाचे साहित्य त्याकाळी आजही आणि पुढेही वैचारिक आणि जगण्याची प्रेरक शक्ती म्हणून बहुजनांना उपयोग ठरणार आहे.माणसांच्या सद्सद बुद्धीला विचार करावयास लावणारे त्यांचे लिखाण होते.सत्याचा शोध घेणारे आणि वास्तव लिखाण करणारे माणसांच्या आर्त दुःखाच्या तळाचा शोध लावून समानतेचे लिखाण करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध शत्रूंच्या बालेकिल्ल्यातही हल्लाबोल करण्याचे त्याचे लिखाण खूप धाडसाचे होते.त्यांच्या लिखाणातून आजही स्फुर्ती,ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.त्यांच्या लिखाणामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली.स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून कृतीशील उपाययोजना त्यांनी केल्या तर अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान जागृत करणे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक प्रश्नांना वाट मोकळी विविध लेखननिर्मिती द्वारे ही त्यांनी केले.

तमाम भारतीयांचे शोषणाची कारणे,समतेचा नारा,शोषित, पीडित,वंचित,बहिष्कृत यांचे सज्ञान आणि जाणीव जागृती करणे हे त्यांचे महान कार्य आहे,हे त्यांच्या लिखाणाचे केंद्रबिंदू होते.मानवी हक्क, मानवी समानता ही त्यांच्या लिखाणातून मिळणारी प्रेरक शक्ती आहे.त्यांचे सर्वांगीण कृषी,धार्मिक,शैक्षणिक, ग्रामविकास,राजकीय इ. विचार त्यांच्या लिखाणा तून,आणि कार्यातून जन माणसात आले आहे.ते आता सर्व दूर रुजले आहे.ते विचार आजही समाजिक विचारास मार्गदर्शक आहे.त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आजही महत्वपूर्ण आहेत. अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक आजही झाली नाही.त्यामुळे त्यांनी लिहून ठेवलेले लिखाण आजही जिवंत आहे.सर्व सामान्यांचा आवाज म्हणून जनतेपुढे उभे ठाकले आहे.जोतीरावांचे गद्यलेखन,पद्यलेखन, कविता,अभंग,पोवाडे,अखंडवादी काव्य,पत्रव्यवहार इ.काळाची पावले ओळखून लिहिले गेले आहेत.
यामध्ये..
१)तृतीय रत्न नाटक - १८५५
२) छ.शिवाजी भोसले यांचा पोवाडा - १८६९
३) ब्राह्मणांचे कसब - १८६९
४) गुलामगिरी - १८७३
५) शेतकऱ्यांचा आसूड - १८८३
६) सत्सर अंक
७) अस्पृश्यांची कैफियत - १८८४
८) इशारा - १८८५
९) अखंडवादी काव्यरचना - १८९१
१०) त्यांचा पत्रव्यवहार इ.
हे लिखाण फार मोठे आहे. 

साहित्य वाचून विचार केल्यास जाणवते की त्यांचे सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय इ.विविध अंगाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी समतेसाठी उचललेल्या लेखणीची ज्योत सर्व सामान्यांना ज्ञानाचा प्रकाश देऊन जाते.मानवता शिकवते.मनूच्या हीन विचारावर हल्लाबोल करते.अंधश्रद्धेच्या अनिष्ठ रूढी परंपरेचा बुरखा फाडते.चार चौघात या व्यवस्थेला चौकात नागवी करते.सडलेल्या गुलामगिरी तील मेंदूना नवचैतन्य देते आणि स्वाभिमान शिकवते. ब्रम्हाच्या मुखातून ब्राम्हण, बाहुतून क्षत्रिय,जांघे मधून वैश्य,आणि पायातून शूद्र उत्पन्न झाले.असे सांगणाऱ्या अनेक दंत कथांना त्यांनी हास्यस्पद ठेवून वैज्ञानिक विचार करण्यास लावणारे प्रश्न उपस्थित करून या मनुवादी विचारांचे थोतांड उघडे पाडले आहे.शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिणारे ते पहिले शिवशाहीर ठरतात.दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांना छत्रपती यांच्या कार्याचे श्रेय दिलेले नाकारतात.बळीराजाचा पराक्रम सांगतात आर्य आणि अनार्य (इथल्या भूमीपुत्रांचा) यांचा संघर्ष सांगता.अखंड वादी लिखाणातून विविध विषयाला हात घालतात. ब्राम्हण विविध मार्गाने शोषण कसे करतात याचा भांडाफोड करतात.चार वर्णाच्या नावाने समाजात विषमता पेरून येथे वर्षानुवर्षे राज्य केले आहे सांगतात.
 
आर्यांनी हा देश आपल्या वर्चस्वाखालील आणला होता."इथल्या विषमतेचे मूळ हे राजकीय वर्चस्वात नसून त्यांनी उभारलेल्या आर्थिक, सामाजिक,धार्मिक दास्य व वंचित असल्यामुळे केवळ राजकीय सत्तांतर घडण्यातून इथल्या विषमता नष्ट होणार नाहीत तर त्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक मन्वंतरच घडून यावे लागेल.असा निर्वाळा जोतीरावांनी दिला आहे.''(संदर्भ:पान नंबर ५८-भारतीय साहित्याचे निर्माते महात्मा जोतीराव फुले,लेखक-भास्कर लक्ष्मण भोळे प्रकाशन-:साहित्य अकादमी)
 
दिनांक २८ नोव्हेंबर १८९० साली जोतीराव फुले यांचे निधन झाले.बहुजन वर्ग पोरका झाला,त्यांचे विचार,कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले हे दुःख करत बसल्या नाहीत तर सामाजिक विचार परिवर्तनाची लढाई त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढली.मानवाला जडलेल्या असमानतेच्या रोगाचा समानतेने उपचार करणारे डॉक्टर म्हणजे राष्ट्रपिता जोतीराव फुले होय.असे मला वाटते आहे!प्रज्ञावंत, राष्ट्रपिता,क्रांतिसूर्य,महात्मा जोतीरावांच्या मार्मिक आणि प्रतिभा संपन्न लिखाणातून ऊर्जा घेऊन समानतेच्या वाटा प्रकाशमय झाल्या.!
 
 नवनाथजी रणखांबे
इंडियन टॅलेंट बुक ऑफ  रेकॉर्ड विजेता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com