व्हॉटसअॅपवरून व्हायरल होणारे पाचपैकी चार मेसेज हे खोटे - शरद पवार
मुंबई:
व्हॉटसअॅपवरून व्हायरल होणारे पाचपैकी चार मेसेज हे खोटे आहेत. हे मेसेज संभ्रम निर्माण करणारे आणि दिशाभूल करणारे आहेत. असे मेसेज पाठवण्यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? अशी शंका येते, असं सांगतानाच दिल्लीतील मरकजच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची गरज आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असंही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं.
शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ११ मार्च रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानाचा दिवा लावूयात असं आवाहन केलं आहे. “११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यामुळे ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे”. शरद पवारांनी यावेळी १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही एक दिवा संविधानाचा लावून साजरी करुयात असं आवाहन केलं.
“१४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. पण यावेळी आपण एक दिवा संविधानाचा लावून त्यांची जयंती साजरी करुयात. जयंतीला उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात. गर्दी टाळूया तसंच एकमेकांमध्ये किमान अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बाबासाहेबांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही”. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. माणसानं चिकित्सक असं पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी यावेळी मुस्लीम समाजालाही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं.
0 टिप्पण्या