Top Post Ad

हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागते

हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागते. 


- अभिषेक देशपांडेसध्या एकच विषय चर्चेचा आहे, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाशी कस लढायचं ? अजूनही या संसर्गजन्य रोगावर इलाज सापडलेला नाही. चीनपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र हजारो लोक या रोगाने मेले आहेत. रोज लाखो रुग्ण सापडत आहेत. या रोगावर सध्याचा इलाज असलेलं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन चा पुरवठा भारताने अमेरिकेला करावा म्हणून तिथले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकप्रकारे धमकीच दिली. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे औषध जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत उपलब्ध नाही पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय ?


याच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावे लागेल १९२४ मध्ये. पारतंत्र्याचा काळ. सरकारी नोकरीत असलेल्या सुखवस्तू कुटुंबातील एक मुलगा शिकून बॅरिस्टर बनवण्यासाठी फॉरेनला निघाला होता. त्याला इंग्लंडला पाठवण्याच स्वप्न वडिलांनी पाहिलेलं. पैसे जमवले. पण पोराला रसायनशास्त्रात रस होता. वडिलांनी इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात याला बसवलं पण पठ्ठ्याने नकळत जहाज बदललं आणि पोहचला जर्मनीला. त्या बंडखोर मुलाचं नाव होतं, ख्वाजा अब्दुल हमीद म्हणजेच के.ए.हमीद 


जर्मनी त्याकाळी केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात आघाडीवर होती. रसायनशास्त्रातील जगभरातील सर्वोत्तम शिक्षण , संशोधन तिथे चालत होते. के.ए.हमीद यांनी बर्लिनच्या हंबोल्ट विद्यापीठात प्रवेश मिळवला. फार्मासिटीकल मध्ये उच्च पदवी मिळवली. याच काळात ते तिथल्याच एका मुलीच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न देखील केलं. ती ज्यू होती आणि कम्युनिस्ट विचारांची होती. पण याच काळात जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला होता.  कट्टर वंशवादी असलेल्या हिटलरचा ज्यू आणि कम्युनिस्ट या दोन्ही लोकांवर प्रचंड राग होता. हळूहळू हिटलरने जर्मनीची सत्ता काबीज केली आणि ज्यूंचा सर्व नाश सुरू केला.


के.ए. हमीद यांनी आपल्या बायकोमुलांसह भारतात पळून येण्यात यशस्वी झाले पण त्यांचे सासू सासरे मात्र नाझी छळछावणीचे बळी ठरले. भारतात के.ए.हमीद हे औषध कंपनी निर्मितीसाठी हातपाय मारत होते. आपल्या पत्नीच्या मदतीने त्यांनी मुंबईत एका औषध कंपनीची स्थापना केली होती, तीच नाव - केमिकल इंडस्ट्रीयल फार्मासिटीकल लॅबोरेटरी उर्फ सिप्ला


'सिप्ला'ची स्थापना १९३५ साली झाली. त्याच भांडवल होत २ लाख रुपये. दोनच वर्षात त्यांनी कारखाना टाकून स्वतःची औषधनिर्मिती सुरू केली. भारतात अजून शेकडो गावात गावठी औषधे हाच सहारा होता त्याकाळात सिप्लामध्ये जागतिक दर्जाची अत्याधुनिक औषध निर्मिती करण्यास सुरुवात झाली.  के.ए.हमीद फक्त भारतातच नाहीत तर जगभरात औषधशास्त्राचे स्कॉलर समजले जात होते.  अनेक विद्यापीठे त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत. मुंबई विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, इंग्लंडची रॉयल केमिकल सोसायटी येथे मानाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी त्यांचा जवळून संबंध आला. विशेषतः महात्मा गांधींना ते आपले गुरू मानायचे. कॉलेजमध्ये असतानाच असहकार आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्यांना जेल झाली होती. गांधीजींच्या प्रभावामुळे नफ्यापेक्षा आपली औषधे अगदी गरीबातील गरीब व्यक्तीला वाजवी दरात मिळेल याची काळजी हमीद घ्यायचे. खुद्द महात्मा गांधींनी त्यांच्या कारखान्याला भेट दिली होती.  मुस्लिम लीगने त्यांना अनेकदा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण हमीद यांचा धर्मधारीत राजकारणाचा तिटकारा असल्यामुळे त्यांनी मोहम्मद अली जिना यांना नकार कळवला. याच कारणामुळे ते फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाहीत तर भारतात थांबून नवंराष्ट्र निर्मितीमध्ये साहाय्य केले.  राष्ट्रपातळीवर रसायनशास्त्राच्या मूलभूत संशोधनासाठी त्यांनी पुण्यात 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरी' स्थापन करण्यास पुढाकार घेतला. 'कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च'ची (CSIR) स्थापना सुद्धा त्यांनीच केली.


त्यांचा वारसा चालवला त्यांच्या मुलाने म्हणजेच युसुफ हमीद यांनी. युसूफ हमीद हे केंब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्रातील पीएचडी धारक. अगदी कमी वयात त्यांच्या खांद्यावर सिप्लाची जबाबदारी पडली. त्यांच्या वडिलांनी कंपनी चालवण्यासाठी त्यांना एकच सूत्र सांगितला होता, "युसूफ, आपल्या औषधांचा वापर गोरगरिब जनतेला लुटण्यासाठी नाही तर त्यांना बरं करण्यासाठी करायचा आहे. हे आयुष्यभर लक्षात ठेव."


त्याकाळी ICI नावाच्या अमेरिकन औषध कंपनीने propranolol नावाचे उच्च रक्तदाबावरील औषध बनवले होते. पण हे औषध अतिशय महागड्या किंमतीचे होते. सर्वसामान्य भारतीयांना हे औषध परवडत नसे. युसूफ यांनी अभ्यास केल्यावर लक्षात आलं की हे औषध अतिशय कमी खर्चात बनू शकते. त्यांनी रिव्हर्स इंजिनियरिंग करून हे औषध बनवलं आणि 'सिप्ला'मध्ये त्याची निर्मिती सुरू केली. पाश्चात्य औषध कंपन्याना याचा सुगावा लागल्यावर त्यांनी पेटंट कायद्याचा दाखला देऊन भारत सरकारवर दबाव आणण्यास सुरवात केली. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी युसुफ हमीद याना भेटायला बोलावले. अवघ्या ३४ वर्षांचे युसूफ हमीद यांनी इंदिराजींना स्पष्ट सांगितलं की, “करोडो भारतीयांचं आयुष्य वाचवणारे औषध त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. फक्त हे औषध बनवणारे महागडा नफा कमवण्यासाठी त्यांना त्यापासून वंचीत ठेवू शकत नाहीत."


इंदिरा गांधींना हे पटलं. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला झुगारून दिले आणि भारतीय संसदेत 'पेटंट कायदा १९७०' आणला. या कायद्यानुसार औषध आणि रसायनांवरील उत्पादन पेटंट्स रद्द करून फक्त प्रक्रिया पेटंट्स देऊ केली, सक्तीच्या परवान्याची तरतूद केली.  याचाच परिणाम जगातील औषध कंपन्याच्या तुलनेत अगदी एक चतुर्थांश दरात भारतीयांना औषधे मिळू लागली. पुढे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे भारत सरकारला आपल्या पेटंट कायद्यात बदल करावे लागले मात्र तेव्हा इंदिरा गांधींच्या धाडसी निर्णयामुळे फक्त सिप्लाच नाही तर भारतातील सर्व औषध कंपन्यांना फायदा झाला. 


भारतात मेडिसिन इंडस्ट्री दमदारपणे उभी राहिली. म्हणूनच आजही आपल्याला कधी औषधांसाठी इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाही आणि  अमेरिकेला देखील कोरोनासाठी भारतापुढे  हात पसरावे लागतात.  आजही जगभरातील गरीब देशामध्ये एड्स सारख्या दुर्धर रोगावर सिप्ला अत्यन्त मामुली दरात औषधे पुरवते.  जगातील सर्व नफेखोर औषध कंपन्या त्यांना शत्रू मानतात पण प्रत्येक गरीब रुग्णासाठी युसूफ हमीद हे आधुनिक रॉबिनहूड आहेत.  भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला आहे तर संयुक्त राष्ट्राने त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरोग्य व तंत्रज्ञान मंडळावर त्यांची नियुक्ती केली आहे.


आता कोरोनाचे संकट आल्यावरही सिप्लाने त्यावर औषध शोधण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या काही दिवसात अतिशय कमी खर्चात त्यांनी कोरोनावरची लस शोधून काढली तर आश्चर्य वाटायला नको....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com