Top Post Ad

मानवतेचे दर्शन आणि बाबुराव बागूल 

मानवतेचे दर्शन आणि बाबुराव बागूल 

 

          संपादक ऍड. नाना रामचंद्र अहिरे.... ! 

        

           

 लॉक डाऊन मुळे कधी नव्हे तो प्रत्येक माणूस काय करावे या विवंचनेत दिसत आहे. अनेक मित्रांचे सारखे फोन येत आहेत की, घरात खूप बोर झालो आहे. अजिबात करमत नाही, वेळ जात नाहीये. सारख्या सारख्या त्याचं त्या बातम्या पाहून मानसिकता खराब झाली आहे. बाहेर पडायला भीती वाटते. त्यांना वाचन कर, गेम खेळ, आपला आवडीचा छन्द जोपास असे सारखे सांगावे लागत आहे.     ज्या लोकांकडे आज पुस्तकांचा खजिना आहे ते लोक मात्र लोकडाऊन पाळून घरातच उत्तम वेळ घालवीत आहेत. आपत्ती ही त्यांच्यासाठी तरी इस्तापत्ती ठरली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

 काल लायब्ररी मध्ये नवीन राहिलेले पुस्तकशोधत असतांना वरील पुस्तक हातात आले. बाबुराव बागूल आणि माझा परिचय साधारण 1985/86 पासूनचा. पुढे नाशिकला बीएड साठी गेलो आणि सारख्या भेटी होत गेल्या. कधी कधी आबा नाशिक जिल्हा परिषदेतही भेटले. मित्रवर्य जयवंत खडताळे, सुरेश अहिरे, विक्रम गायकवाड, अशा काही लोकांसोबत अनेक वेळा साहित्यिक गप्पा होत. त्यांच्या कथा आवडत असल्यामुळे कधी कधी विहितगावला सायकलवर जात असे. त्यांचे जावई नानासाहेब अहिरे आणि कास्ट्राईब संघटनेचे नेते एकनाथ मोरे, मी, औरंगाबाद येथे शिकलेलो असल्यामुळे अधिकच जवळीकता वाढत गेली. 

 

    ऍड. नानासाहेब अहिरे यांनी संपादित केलेले, बाबुराव बागूल यांच्या साहित्यावर प्रकाश झोत टाकणारे मानवतेचे दर्शन आणि बाबुराव बागूल हे पुस्तक वाचून काढले. डॉ. प्रा. दिलीप चित्रे यांचा संवादिनी मध्ये बाबुराव बागूल यांच्यावर लिहिलेल्या लेखाचेच टायटल पुस्तकाला दिले आहे. त्यात त्यांनी बाबुराव बागुलांच्या समग्र साहित्याचा धांडोळा घेतला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाजाचे जे पुनरुत्थान अभिप्रेत होते, त्याच प्रकारच्या साहित्याची निर्मिती बाबुराव बागूल यांनी केली असा अभिप्राय त्यांनी नोंदविलेला आहे. तसेच जुन्या पिढीतील लेखिका शिरीष पै यांचा जुना लेख, "जेव्हा मी जात चोरली होती "यामधून घेतलेला आहे. 

 

     मला बाबुराव बागूल यांची "वेदाआधी तू होतास... !"ही कविता प्रचंड आवडते. माझ्या मुलाच्या लग्न प्रसंगी, पत्रिकेत बाबुराव बागूल यांच्या फोटोसह ती कविता छापली होती. या पुस्तकात, प्रा. डॉ. कमलाकर कांबळे यांचा एक प्रचंड ताकदीचा लेख छापण्यात आला आहे. "तत्त्वद्न्य बाबुराव बागूल " म्हणून आबांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, बाबुराव बागूल यांच्या साहित्याची प्रेरणा ही त्यांनीच आपल्या एका मुलाखती मध्ये सांगितली आहे. त्यांच्या विचारांचे अधिष्ठान बुद्ध, फुले, मार्क्स, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच राहिलेले आहे. मात्र याही पुढे जाऊन बाबुराव बागूल यांनी मार्क्सवादाच्या उणिवा देखिल दाखविल्या आहेत. आणि मार्क्स हा जरी जात धर्म यांच्या बाजूने नव्हता तरी तो समविचारी मित्र होऊ शकतो हेही नोंदवून ठेवले आहे. येथिल समाजव्यवस्था ब्राम्हण आणि क्षत्रिय यांच्यासाठी कुरणं आहेत पण अस्पृश्य आणि श्रमिकांसाठी मात्र ते कोंडवाडे आहेत, वर्ग बंद झाला की, तो जात होतो आणि जात खुली झाली की, तो वर्ग होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर लक्ष केंद्रित केले असता, येथिल कम्युनिस्ट लोकांनी डोळ्यावर आणि कानावर हात ठेवले होते. असे सांगण्यासही ते विसरलेले नाही. 

        

       वैश्विक साहित्य मांडणी करणारे लेखक बाबुराव बागूल असा प्रा. डॉ. बबन भाग्यवंत यांचा लेख यात असून, लेखाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात की, हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य असे आहे की, भारतीय समाज सतत युद्धमान आणि भयग्रस्तच असला पाहिजे. तशीच तरतूद या संस्कृतीमध्ये केली आहे. त्यामुळे दलितांच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने आणि क्रांतिकारी विचाराने या व्यवस्थेला उध्वस्त करण्याचे सामर्थ्य इथल्या माणसात निर्माण केलं आणि गुलामगिरीच्या श्रुंखला तुटून पडल्या. दलित मनामनात स्वाभिमान, अस्मिता, रुजविली त्यामुळे या समाजाला जीवन प्रतिष्ठा प्राप्त झाली. धर्मासाठी माणूस ही पुरातन संस्कृती दलित साहित्याने बदलून टाकली. मानवता हे मूल्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. जगातील शोषित माणसाची जात एकच असते. हे सिद्ध करून नवीन जीवन वादी जाणीव रुजविली. 

 

बाबुराव बागूल यांच्या साहित्यामधून पदोपदी हा अनुभव वाचकाला मिळतो. असा दावा बबन भाग्यवंत यांनी केला आहे. 

  भारतीय समाज सतत युद्धमान आणि भयग्रस्त असला पाहिजे त्यांच्या या विचारांची प्रचिती आज देखील संपूर्ण भारत अनुभवत आहे. विविध घाबरविणारे फॉरवडेड मेसेज, रस्त्यावर होणारी गर्दी, भुकेमुळे क्षीण होणारे प्रश्न, बेकारी, अगतिकता, स्त्रियांवर होणारे अत्याचार, खून, दरोडे, अंधश्रद्धा, टीव्ही वरील खोट्या बातम्या यामुळे संपूर्ण देश आज भयग्रस्त झाला आहे कोणीच कोणाला आधार देतांना दिसत नाही. सामान्य माणसाच्या वाट्याला आलेलं दुःख, प्रक्षोभ, चीड, नकार, विद्रोह, प्रेम, क्रोध, हा अनुभव प्रत्येक भारतीय माणसाला आजरोजी येत आहे. 

बाबुराव बागूल यांच्या काळोखाचे कैदी, गुंड, बोव्हाडा, वाटेवरची, दसऱ्याचा रेडा, वानर, पेसुक, स्पर्धा, विद्रोही, जेव्हा मी जात चोरली होती, याचे वाचन केले असता पुन्हा पुन्हा वरील माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्या विषयी वाचकाला अनुभव येतो. मानवी स्वभावाचे किती बारकाईने बाबुराव बागूल यांनी निरीक्षण केले आहे हे लक्षात येते. 

 

नाशिक जिल्याचे मालेगाव येथिल प्रा. डॉ. दीपक कापडे यांचा बाबुराव बागूल यांचे क्रांती विज्ञान, असा लेख या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. त्यांनी आपल्या या लेखात बाबुराव बागूल यांच्या अगोदर लिहिणाऱ्या पिढीचा धांडोळा घेतला आहे. जनता, प्रबुद्ध भारत यातून लिहिणारे यादवराव गांगुर्डे, अप्पासाहेब रणपिसे, अप्पा बावस्कर, टी. पी. अडसूळ, बंधुमाधव, डी. एस. गायकवाड नामदेव गोदाजी भालेराव यांचा उल्लेख करून बाबुराव बागूल यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी लिहिलेली समीक्षा, वैचारिक लेख, विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, मुलाखती, दिलेली भाषणे याबाबत लेखात चर्चा केली आहे. दलित साहित्य हे तर माणसाचे साहित्य, काळोखाच्या कैद्यांची क्रांतिमान कैफियत, भारतात फॅशिझमची बीजेआहेत, मराठवाडा जातीय दंगल एक शोध, हिंदू साहित्य व जातीवाद, ढासळते किल्ले, यावर लिहिले आहे. मात्र या लेखात त्यांनी बाबुराव बागूल यांनी फारसे कवितेच्या प्रांतात फारसे लेखन केले नाही असे विधान केले आहे ते मात्र खटकलं. त्यांनी जेवढ्या कविता लिहिलेल्या आहेत त्यामात्र वाचकाला डोक्यावर घेऊन नाचाव्यात अशा आहेत. त्यांची "वेदा आधी तू होतास " हीच कविता भाषांतरित केली तर जागतिक पातळीवर देखील साहित्यिक विश्वाला तिची दखल घ्यावी लागेल इतक्या उंचीची ती कविता आहे. अनेक लोकांनी या कवितेचे पोस्टर करून, किंवा दिवाणखान्यात संगमरवरी दगडावर कोरून लावलेली आहे. अनुस्टुभ मासिकाचे संपादक गो. तू.  पाटील, डॉ. संजय जाधव यांचे हॉस्पिटल च्या  व्हरांड्यात इतकेच माझ्यासोबत, विक्रम गायकवाड यांनी तर या कवितेचे हजारो पोस्टर बनवून महाराष्ट्र भर वाटले आहेत. मी तर प्रत्येक कवितेच्या स्पर्धेत ही कविता पाठांतर करून विदयार्थ्यांना सहभाग घ्यायला लावला आहे. चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी ही कविता म्हणजे आपले पसायदान आहे असे म्हटले आहे.   माणूस हा देश, धर्म, परमेश्वर, आणि पुराणमतवादी ग्रंथांपेक्षा मोठा आहे हेच या कवितेत त्यांनी मांडले आहे. कोळीवाडयातील कस्टमेळा, महाकवी ज्योतिराव फुले, दवाखाना, डॉ. आंबेडकर, याही कविता खूपच दमदार आहेत. दवाखाना या कवितेत ते म्हणतात, 

 

  देशभक्त गांधीजी म्हणाले 

डॉ. आंबेडकर उघडा तुमचा दवाखाना 

पराभव पाहणारा हा आपला आजारी देश दुरुस्त करा 

देशाचे संविधान डॉ. आंबेडकरांचा दवाखाना.... 

किंवा बुद्धा नंतर सारख्या कविता वाचल्यानंतर बाबुराव बागूल यांचे कवीतेबाबतचे चिंतन लक्षात येते. त्यांनी थोडया कविता लिहिल्या असतील परंतू भाराभर कविता संग्रह काढणाऱ्या कवींचे कविता संग्रह आपण जेव्हा आपण वाचतो तेव्हा उगीचच यांनी कागदं खराब केले असे वाटतं.... !!

   या सोबतच बाबुराव बागूल यांचे कथालेखन, हा प्रा. आशुतोष रमेश पाटील यांचा लेख वाचनीय आहे. तसेच प्रा. शुददोधन कांबळे यांनी दलित कवितेचे सुवर्ण युग -विद्रोहाच्या कविता यामध्ये बाबुराव बागूल यांची आठवण सांगितली आहे की, मी हजारेक कविता लिहिल्या असतील घरातील विविध कागदांवर शोधल्या तर पाचशे तरी कविता सहज उपलब्ध होतील. त्यातील पन्नास जरी कवितांचा संग्रह आला तर खूप झाले. यानिमित्तानं ऍड. नानासाहेब अहिरे आणि या पुस्तकाच्या प्रकाशिका नंदाताई बागूल /अहिरे यांना विनंती करू यात. 

     यासोबतच आबांच्या आठवणी दाटतात तेव्हा, हा ऍड. नानासाहेब यांचा लेख, देव धर्मापेक्षाही माणूसरुपी महाकाव्य श्रेष्ठ ही संजय वाघ यांनी घेतलेली मुलाखत, तसेच पापलाल पवार यांच्या मुलाखतीचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. मुखपृष्ठ दिक्षा अहिरे आणि ऍड. किरण कांबळे यांनी केले असून पुस्तक वाचनीय झाले आहे. 

पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रा. डॉ.शुद्धोधन कांबळे, प्रा. कमलाकर कांबळे, प्रा. गौतम गायकवाड, डॉ. अनंत राऊत आणि डॉ. बबन भाग्यवंत यांचे लेख पुन्हा पुन्हा वाचावेत असे आहेत

 

         नानासाहेब दशरथराव पटाईत 

 

       धम्मदीप निवास, हिमांशू पार्क, मोरे वस्ती, येवला 

 

       9423478226 / 7888221827 / 7350650404

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com