रहिवाशांच्या सर्तकतेमुळे कोपरी भाग ग्रीन झोन
ठाणे
ठाण्यातील अनेक भागांत कोरोनाचा रुग्ण आढळून येत असला, तरी कोपरी त्यापासून दूर आहे. यासाठी पोलिस दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तसेच नागरिकांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालनही केले जात आहे. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवरदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
शहराच्या पूर्व भागात म्हणजेच कोपरीत राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील रहिवाशांनी दाखवलेली सर्तकता यामुळेच आता हा पॅटर्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवांसाठी येथील नागरिकांना घराबाहेर पडावे लागत नाही, कारण प्रत्येक गल्लीत जवळच्या दुकानदारांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना घरपोच सेवा मिळत आहे.
राजस्थानमधील भिलवाडा भागातही एकाच दिवशी कोरोनाचे 14 रुग्ण आढळल्यानंतर "रॅपिड ऍक्शन' घेत विविध उपाय योजले होते. त्यानंतर 2 एप्रिलनंतर या भागात नवा कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. भिलवाडाचा हाच पॅटर्न आता कोपरीतही राबवला जात आहे. नागरिकांनी दाखवलेल्या सजगतेमुळे हा पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे.
0 टिप्पण्या