वेळेकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल- शिवसेना

वेळेकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल - शिवसेना


   मुंबई


राजभवनातून समांतर सरकार चालवणे योग्य नव्हे असं म्हणतांना 'सामना'च्या अग्रलेखाने राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. "आपल्या राज्यपालांना कामाची आवड आहे. ते राजभवनात आज आले असले तरीही कालपर्यंत ते संघाचे प्रचारक आणि भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आजही कदाचित ते कार्यकर्त्याच्या मानसिकतेतच असावेत. वेळेकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी सोहळ्याने महाराष्ट्राने अनुभवले आहे," असे म्हणत कोश्यारी यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 


"महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्याने ताकदीचा आहे, पण सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद 'कोरोना'विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. पण उठसूठ सरकारवर टीका करायची आणि राजभवनात जाऊन तक्रारीच्या काड्या घालायच्या हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नाहीत, तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत , याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे," असे म्हणत सत्ताधारी शिवसेनेने भाजपाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.


"राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी ते जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मला वाटते," असं पवार यांनी ट्विट करून लिहिलं.


 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लॉकडाऊननंतर परप्रांतातल्या मजूरांना रहिवास आणि अन्न मिळण्याबद्दल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची वेगळी बैठक घेतली होती आणि काही आदेश दिले होते. राज्यातल्या विविध विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं त्यांनी कुलगुरुंची बैठक घेऊन विद्यापीठांच्या परिक्षांविषयीही चर्चा केली होती. महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या काळात राज्यपालांच्या भूमिकांवरून तत्कालीन विरोधी पक्षांनी, जे आता सत्तेत आहेत, प्रश्नही विचारले होते. त्यावेळेच्या वक्तव्यांची पार्श्वभूमीही महाराष्ट्रात आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल कोश्यारी नुकतीच भेट घेतली होती. शिधापत्रिकांवर मिळणारं धान्य व्यवस्थितरित्या राज्यात मिळत नाही अशी तक्रार करत त्यांनी राज्यपालांना यात लक्ष घालण्याची विनंती केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad