Top Post Ad

... आणि देशाला एक राज्यघटना सुद्धा आहे याची आठवण झाली

समाजात सदैव विकृती पसरविणाऱ्या भिडे यांच्या धारकरी वगैरे असलेल्या अनंत कुरमुसे, या कार्यकर्त्याला कुणीतरी जमून चोप दिला. त्याबाबतीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ते होतच असतात. विशेषतः आतले सत्य बहुधा बाहेर येत नाही. क्रिया प्रतिक्रिया मात्र सुरू असतात. पण महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समोर आणि त्यांच्याच बंगल्यावर पोलिसांनी त्याला मारलं अशा प्रकारचा आरोप केला जातो. या उलट दुसरी बाजू देखील मांडली जाते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एवढ्या तत्परतेने कुरमुसे यांच्या मदतीला धावून गेलेत, की जणूकाही घटना कधी घडते याची ते वाटच बघत असावेत. या निमित्ताने त्यांना या देशात लोकशाही आहे, देशाला एक राज्यघटना सुद्धा आहे आणि ती मनु, भिडे किंवा शाह यांनी लिहिली नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे, याचीही आठवण झाली, ही चांगली गोष्ट आहे.-
अर्थात, नेहमीप्रमाणे विचारवंतांनी, संपादक, पत्रकार, लेखक, पुरोगामी मंडळींनी कायदा हातात घेण्याच्या या कृतीचा स्पष्ट शब्दात निषेध केला. तो करायलाच हवा. पण त्यात काहींनी आव्हाड यांनी असे करायला नको होते, असा सूर लावला. त्यात मला वाटते, आव्हाड यांच्यावर अन्याय झाला. कारण हे कृत्य आव्हाड यांनी स्वतः किंवा स्वतःच्या समोर केले नसणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.-
पण या निमित्तानं एका मोठ्या विषयाला तोंड फुटले हे बरे झाले. २०१४ नंतर देशात अतिशय खालच्या पातळीवरील राजकारणाला प्रतिष्ठा मिळाली. मोदी, शहा, योगी यासारख्या लोकांच्या उन्मादी, विकृत आणि विवेकशून्य राजकारणाला जनतेचा जो पाठिंबा मिळत गेला, त्याची परिणती अत्यंत खालच्या भाषेत विरोधकांची निंदानालस्ती करण्यात झाली. संतापजनक अशी गलिच्छ भाषा लेखक, बुद्धिजीवी, विचारवंत, पुरोगामी, विरोधी नेते, महिला, लेखिका, कार्यकर्त्या यांच्याबद्दल वापरण्यात प्रतिष्ठा समजणारे कळप भाजपाने पद्धतशीरपणे या काळात पोसले, वाढवले. त्यांचे मोठे मोठे नेतेही अशी भाषा विरोधकाबद्दल सर्रास वापरू लागले. महात्मा गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, पंडित जवहरलाल नेहरू यांच्या बद्धल, पुरुषांच्या तर सोडाच पण अनेक धर्मांध आणि भाजपाप्रेमी महिलांच्या वॉलवर देखील अत्यंत अश्लील आणि धादांत खोट्या पोस्ट फिरवल्या जात होत्या. मुस्लिम समाजाला सरळ सरळ टार्गेट करणे, आरक्षणाच्या नावाने मागास वर्गीय समाजाची टवाळी करणे, कमरेखालची भाषा वापरणे, कुणाच्याही वालवर जावून अद्वातद्वा आरोप, शिवीगाळ करणे, हा देश आता आमच्या बापाचाच आहे, अशा गुर्मीत इतरांना देशद्रोही म्हणून हेटाळणी करणे, मुस्लिमाची औलाद आहात म्हणून मोदी विरोधकांची टवाळी करणे, हिंदुत्वाच्या नावाने ओबीसी नेत्यांची ऐशीतैशी करणे, हे प्रकार फार वाढले होते. निदान महाराष्ट्रात तरी असे व्हायला नको होते. काही झाले तरी फडणवीस आणि आदित्यनाथ यांच्यामध्ये निश्चित फरक आहे. पण सत्ता येताच हा फरक पार मिटून गेला. सुटाबुटातले नागपूर मेड आदित्यनाथ.. अशीच फडणवीस यांची वागणूक होती. निदान भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी तरी ह्या प्रकाराला आळा घालायला हवा होता. पण त्यांनीही तसा प्रयत्न केलेला दिसला नाही किंवा त्यांचे कुणी ऐकत नसावे.
-
याचा परिणाम असा झाला की भक्त शेफारत गेले. उन्माद वाढत गेला. बाप भुंकतो, माय भुंकते.. म्हटल्यावर मग टीचभर पिलांचीही तीच संस्कृती झाली. सारा मीडिया व सत्ता हातात असल्यामुळे आणि मोदी शहा यांचा दिव्य इतिहास माहीत असल्यामुळे अल्पसंख्यांक, दलित, ओबीसी, आदिवासी सारा समाज घाबरून गेला. वातावरणात एक प्रकारची दहशत पसरली. त्यामुळे भक्त लोकांची हिम्मत आणखीच वाढत गेली. मग अल्पसंख्यांक लोकांवर सरेआम हल्ले करणे, समूहाने मिळून राजरोस हत्या करणे, खुलेआम गोळीबार, विचारवंताच्या सभा उधळणे, वक्त्यांना बोलू न देणे, न्यायालयात थेट वकिलांनी कन्हैय्या कुमारवर हमला करणे, हल्लेखोरांचे भाजपा नेत्यांनी कौतुक करणे, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या आतंकवादी म्हणून जेलमध्ये जाऊन आलेल्या व्यक्तीला खासदार करणे.. या व अशा असंख्य घटना ओळीने देशभर घडत राहिल्या. पण त्यावर काहीही कारवाई होत नाही, उलट त्यांचा सन्मान होतो, कौतुक होते, हे लक्षात आल्यामुळे .. अशी प्रवृत्ती आणखीच मोकाट झाली. माजत गेली. भाजपाच्या लोकांनाही आनंदाच्या उकळ्या फुटत गेल्या.
-
मग त्याच उन्मादात सीएए, एनपीआर, एनआरसी च्या नावाने अमित शहा यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हम करे सो कायदा ही मोदी आणि शहा यांची प्रवृत्ती आणि उर्मटपणा लोकांना झोंबत होता, असह्य होत होता, पण कुणीच बोलत नव्हते. कारण जज लोया खून प्रकरण.. ते निदर्शन करणाऱ्या लोकांवर डायरेक्ट फायरींग.. आणि पोलिसांची अप्रत्यक्ष साथ हे सारे अनुभव लोकांना आलेलेच होते.
-
पण याचा एक चांगला परिणाम असा झाला की भाजपाच्या विकृती विरुद्ध दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी, बहुजन हा समाज कळत नकळत जवळ यायची प्रक्रिया सुरू झाली. साऱ्या देशाला मुस्लिमांच्या विरोधात उभे करण्याच्या कुटील कारस्थाना मागची भूमिका सोशल मीडिया मुळे जनतेला उशिरा का होईना पण माहीत झाली. आणि मग भाजपा समर्थित विविध संघटनाच्या बद्दल जनतेच्या मनात प्रचंड खदखद वाढू लागली. आव्हाड यांच्या समर्थकांनी जो चोप भिडे यांच्या धारकऱ्याला दिला, त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात ऐकायला येत आहेत..! समाज आता मुकाट्याने सहन करण्याऐवजी सरळ हिशेब करण्याच्या मानसिकतेमध्ये येतो आहे. हे एक चांगले लक्षण आहे. मुर्दाड समाज तसाही लोकशाहीसाठी काही कामाचा नसतो.
-
गुंड कितीही मोठा असू द्या, पण पुन्हा पुन्हा अंगावर यायला लागला की एक दिवस सारा गाव त्याच्या विरोधात उभा झाल्याशिवाय राहात नाही. जिथं इंग्रजांसारख्या बलाढ्य सत्तेचा टिकाव लागला नाही, तिथे एखादी टोळी किती टिकाव धरणार ? पण हे सत्य भाजपाचे लोक पार विसरून गेले होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्याची आठवण करून दिली, हा या प्रकरणाचा सरळ सामाजिक अर्थ आहे. भाजपाच्या दृष्टीने मात्र तो अनर्थ आहे.. अन् ही जेमतेम सुरुवात आहे. हे लोक जर शहाणे झाले नाहीत, तर असेच आणखी प्रयोग पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील, यात शंका नाही.
-
विशेष म्हणजे, कायदा जरी हातात घेतला तरी त्यामागील उद्देश काय, हे बघणे गरजेचे आहे. भाजपाच्या लोकांनी नेहमी विशिष्ट समाज आणि विरोधक यांच्यावर दहशत पसरविणे, विकृती पसरविणे यासाठी कायदा हातात घेतला आहे. तर आव्हाड समर्थकांनी मात्र त्या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी हा प्रयोग केला आहे. मी तुलना करणार नाही.. पण महात्मा गांधी यांच्यावर गोडसेनं चालवलेली गोळी आणि शहीद भगतसिंग यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर चालवलेली गोळी, ह्यातला फरक समाजाला नक्कीच समजतो. वेळप्रसंगी हे काम कुणीतरी तरी समोर येवुन करत असतोच.
-
सुरुवातीला शुल्लक वाटणारी एखादी घटना अचानक नवा इतिहास निर्माण करण्याचा मुहूर्त ठरून जाते. या निमित्तानं त्याला सुरुवात झालेली आहे. मुस्लिम द्वेष, आरक्षण विरोध, ओबीसी विरोध, घटनेची पायमल्ली असली पापं करून देशाला विनाशाच्या उंबरठ्यावर या लोकांनी उभे केले आहे. अशावेळी देश उध्वस्त होऊ द्यायचा का ? घटना उध्वस्त होऊ द्यायची का ? विकृती आणि उन्माद असाच वाढू द्यायचा का..? या देशाचे पुन्हा विभाजन होऊ द्यायचे का..? हे गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. तुम्ही आम्ही कायदा कायदा करत घरात बसलो आहोत आणि धर्मांध लोक मोकाट सुटले आहेत. तेव्हा.. लोकशाही वाचवण्यासाठी कायदा हातात घेणारा कुणी पुढे आलाच तर.. त्याचा तांत्रिक कारण कुरवाळत निषेध करत बसणार.. की त्याला समर्थन देणार.. हा विचार तुम्हा आम्हाला करायची वेळ आली आहे. ह्या घटनेकडे वैयक्तिक पातळीवरून न पाहता, व्यापक समाज हिताच्या नजरेतून पाहणे आवश्यक आहे. शेवटी लातोके भूत बातोसे नही मानते, हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल..!
-
खरं तर, हिंसा ही समर्थनीय नाहीच. पण आत्मरक्षणासाठी वेळ आलीच तर.. ती अनिवार्य सुद्धा ठरते. आणि इथे तर सारा समाज धोक्यात आहे. मात्र अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत. ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण याची काळजी फडणवीस यांनी घेण्याची गरज आहे. तुम्ही जी द्वेषाची बीजं पेरलीत, ती आता उगवत आहेत. त्याचा बंदोबस्त सर्वांनी मिळूनच करायला हवा. या कामी नितीन गडकरी यांनी मनावर घेतले, तर निदान महाराष्ट्राचे राजकारण तरी शुद्ध व्हायला मदत होईल, असे वाटते !
आशावादी राहू या..!

तूर्तास एवढंच..
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष -  लोकजागर अभियान............ संपर्क - 9004397917 / 9545025189 / 9822278988

-------------------------------------------

 

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून..

काळ सोकावण्याआधी बोललं तर पाहिजेच.. कुणीही शोध घ्या. आता प्रत्यक्षात जितेंद्र आव्हाड यांनीच शिक्षा दिलीय की अजून काही घडलंय हे तपास यंत्रणा पाहून घेईल. मी जाणीवपूर्वक 'शिक्षा' असा शब्द वापरला आहे. कारण चूक करणार्‍याला शिक्षाच केली जाते. मात्र ही शिक्षा कायदेशीर मार्गाने व्हायला हवी होती.

"ह्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचं चुकलंच." असं म्हणणारे अनेक पुरोगामी तुम्हाला आढळतील. पण, अनंत करमुसे यांच्या विकृतीचा निषेध करणारा एकही अंधभक्त नावाला गवसणार नाही. यालाच म्हणतात खल प्रवृत्ती..

जितेंद्र आव्हाड यांनी सहा वर्षे राखलेल्या संयमाचा आदर आहे. मात्र कोणत्याही हिंसक मार्गाचे कुणीही समर्थन करू शकत नाही. मग ती हिंसा आव्हाडांनी केलेली असो अथवा अन्य कुणी केलेली असो.

गेले दोन दिवस ढिगाने पोस्ट पडल्या आहे. कशासाठी तर अनंत करमुसे या व्यक्तीला 'पाठबळ' देण्यासाठी. मग त्यासाठी रेखाचित्र, व्यंगचित्र असं सगळंच आलं. एकूण एक भक्ताने आव्हाडच कसे चुकीचे हे दाखवताना करमुसेला कसल्या कसल्या महान उपमा दिल्या आहेत. शिवाजीचा मावळा, प्रतापराव गुजर आणखी काय काय..

मी बराच शोध घेतला. पण, महाराजांच्या कोणत्याही मावळ्याने किंवा खुद्द प्रतापराव गुजर यांनी कुणाही स्त्रीच्या विरोधात कधीही कोणतीही अश्लाघ्य, अश्लील भाषा वापरलेली नाहीय. जर हा खरंच मावळा असता, तर महाराजांनी ह्या विकृतीचे समर्थन केले असते का? शत्रूच्या बाजूकडील स्त्रीला सुद्धा माता, भगिनी म्हणण्याची परंपरा जपतो. तोच स्वतःला मावळा म्हणवून घेऊ शकतो.

जितेंद्र आव्हाडांच्या नावाने आरोळ्या ठोकताना, टाहो फोडताना करमुसेने स्वतः काय दिवे लावले आहेत, हे प्रत्येक भक्त शिताफीने लपवत आहे. काही माता, भगीनी तर अनंत करमुसे 'दादा' वगैरे संबोधन वापरत आहेत. त्यांनी विवेकाने उत्तर द्यावं. "जर तो तुमचा दादा आहे. तर बाकीच्यांच्या बहिणींबाबत तो जी भाषा आजवर वापरत आलाय, ती योग्य आहे का?"

एक पोस्ट तर अशी आहे त्या गाण्याच्या ओळींचा अपमान केला म्हणून निषेधच गेला पाहिजे. काय म्हणे तर, "लाख संकटं झेलुन घेईन, अशी पहाडी छाती.. देव देस अन् धर्मासाठी प्राण घेतलं हाती" आणि सोबत करमुसेचे फोटो?.. हा असा सरदार नकोय देशाला.. जो विकृत मार्गाने वर्तन करतो आहे.

रामलीला मैदानावर जाळलेले संविधान यांना आता अचानक आपलं वाटू लागलं आहे. गांधी चूक आणि गोडसे देव म्हणविणारे आता अहिंसेचे गोडवे गाऊ लागले आहेत. भीमा कोरेगांव प्रकरणात मराठ्यांना खलनायक ठरविणार्‍यांना आता अचानक मराठ्यांचा पुळका कशामुळे येऊ लागलाय?.. ही पण, सोयीची पाठराखण आहे. (अनंत करमुसे ही व्यक्ती मराठा आहे की नाही. मला माहीत नाही. आडनाव वाचून जातीचा बोध होण्याची कला सुदैवाने मला अवगत नाहीय.)

किरण माने, यांची एक कॉमेंट इथे आवर्जून देतोय..
------------------------------------------------------------
हिंसा अहिंसेचे खूप ढोबळ अर्थ करून ठेवलेत आपल्याकडे. एखाद्याची आईबहीण काढणं ही खरी 'हिंसा'... त्याला ठोके टाकणं ही 'शिक्षा' ! ठोके टाकताना रक्तही येऊ न देणं, फक्त लक्षात रहातील आणि आयाबहिणींची इज्जत ठेवली जाईल असे वळ उठवणं, ही 'अहिंसा' !!!

मारणं = हिंसा, आईबहिणींची इज्जत चव्हाट्यावर आणली तरी मान खाली घालून बसणं = अहिंसा.. असले उथळ, बिन्डोक अर्थ काढणार्‍यांनी सावध व्हावे आतातरी. भले तरी देऊ..-Kiran Mane
------------------------------------------------------------

(तुकारामांचा मूळ अभंग जसाच्या तसा देतोय..)

भले तरी देऊ । गांडीची लंगोटी ।
नाठ्याळाचे काठी । देऊ माथा ।।

दुर्दैव इतकंच की, जितक्या प्रमाणत करमुसेच्या समर्थनाच्या पोस्ट भक्तांनी लाईक आणि शेयर केल्या.. तेवढ्या प्रमाणात ह्यामागचे 'सत्य' दाखविणार्‍या पोस्ट पसरल्या नाहीत.

जनार्दन केशव- अवाम यांच्या फेसबूक वरून

 

 
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com