Trending

6/recent/ticker-posts

आव्हाड प्रकरणी पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी

आव्हाड प्रकरणी पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजीमुंबई -


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. सदर प्रकरणात राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत उत्तर द्यावे असंही न्यायलयाने म्हटलं आहे.


स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने या प्रकरणामध्ये उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे) द्यावा अशी मागणी या करमुसे याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी यांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता  दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं.  आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत या आवाहनाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनंत करमुसेने त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलीस करमुसेच्या घरी आले आणि पोलीस स्टेशनला जायचं आहे असं सांगून त्याला घेऊन गेले. मात्र पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी करमुसेला त्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. आव्हाड यांच्या बंगल्यावर गेल्यानंतर काही लोकांनी करमुसेला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते असा दावा करमुसेने केला आहे. त्यानंतर करमुसेला त्याने केलेली ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती करमुसेने दिली.


या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, अंगरक्षकांसह काही जणांनी त्यांच्या बंगल्यात नेऊन आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करमुसेने केला आहे. आव्हाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. उच्च न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.


Post a Comment

0 Comments