आक्षेपार्ह पोस्ट मारहाण प्रकरणी आरोपींना जामिन मंजुर
ठाणे
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या इसमाला झालेल्या मारहाण प्रकरणातील सहाही आरोपींची तत्वतः जामीनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी दोघा कोरोनाग्रस्तांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित चौघांना भाइंदर पाडा येथील ठाणे महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती बुधवारी पोलीस सूत्रांनी दिली.
मारहाण प्रकरणामध्ये आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांना वर्तकनगर पोलिसांनी सुरुवातीला ९ एप्रिल रोजी अटक केली होती. तर सहावा आरोपी ११ एप्रिल रोजी त्याच्या स्कॉर्पिओसह शरण आला होता. अटक होण्यापूर्वीच या सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल १२ एप्रिल रोजी आला.
या सर्वांना १३ आगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. दोघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मात्र वर्तकनगर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाणे न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिल्यानंतर न्यायालयानेही सोमवारीच या सर्वांना काही अटी शर्थीवर तत्वत: जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यातील दोघांना घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर उर्वरित चौघेही त्या दोघांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा हायरिस्क'मध्ये समावेश झाला आहे. त्यांनाही विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा सल्ला ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. याच आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरण केंद्रात तर आठ पोलिसांना होम कॉरंटाईन अर्थात घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा आरोपी पकडण्यासाठी किंवा त्याला अटक करतांनाही पोलिसांना यापुढे मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
0 टिप्पण्या