रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसाह्य द्या
प्रहार रिक्षा टॅक्सी युनियनची मागणी
ठाणे
देशात, राज्यात कोरोना विषाणूची महामारी जोरात फैलावत आहे. आपल्या आवाहना नुसार महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे.राज्यात महाराष्ट्र सरकारने संचारबंदी, लाँकडाऊन सारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणूचा प्रभाव, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलांत आणल्या आहेत. मात्र, त्याचा फटका हातावर पोट असणार्या रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याने रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणी प्रहार रिक्षा टॅक्सी युनियनचे ठाणे शहराध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणारा रिक्षा चालक चांगलाच होरपळून निघाला आहे. गेल्या सतरा दिवसापासून त्याची रोजीरोटी बंद झाली आहे.त्याची रोजची परिस्थिती म्हणजे रोज कमवील तरच रोज खाईल अशी आहे.आणि येणारा पुढील काळ किती दिवस,वेळ खाईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाही. त्यामुळे रोजंदारीवर व्यवसाय करणारा रिक्षा चालक हतबल झाला आहे.त्याच्यापुढे आर्थिक संकट उभे राहीले आहे.बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक रिक्षा चालकांचे कमीतकमी चार ते पाच जणांचे कुटूंब आहे.त्यांची सध्या उपासमार होत आहे.आर्थिक कोंडी झाली आहे.त्यामुळे रिक्षा चालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी. जेणे करून कोरोनाचे संकट जो पर्यंत जात नाही टळत नाही तो पर्यंत त्याला एक प्रकारचा आधार मिळेल; अन्यथा, रिक्षाचालकांवरही आत्महत्येची वेळ येईल, असेही दयानंद गायकवाड यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या