माध्यमे व राजकीय व्यक्तींचा पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न निंदणीय

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा बैठक संपन्न


माध्यमे व राजकीय व्यक्तींचा पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न निंदणीय


मुंबई


महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा आयोजित बैठक नुकतीच संपली. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, खासदार कुमार केतकर, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री नसीम खान, मंत्रीमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर मंत्री आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.


‘पालघर मध्ये घडलेल्या दोन साधूंसह तीन जणांच्या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध करतो. हे अत्यंत दुख:द आणि अमानवीय कृत्य आहे. मात्र सदर घटनेत कोणताही धार्मिक विद्वेषाचा दृष्टीकोन नाही, असे असतांनाही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशाचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.
समाजात जातीय आणि धार्मिक विद्वेषाची भावना पसरविण्यासाठी काही माध्यमे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी याने अशाच पद्धतीने सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या टिप्पणी करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सोबतच कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या संदर्भातही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर घृणास्पद टिप्पणी केली आहे. आम्ही सर्वजन याचा जाहीर निषेध करतो. या प्रकाराला पत्रकारिता म्हणता येणार नाही.
बंधुभावाचा संदेश देणाऱ्या आपल्या देशात सामाजिक विद्वेष पसरविणे कदापि मान्य होणार नाही. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी ते घातक राहील. त्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अर्णब गोस्वामी व त्यांच्या रिपब्लिक भारत या वृत्त वाहिनीवर कारवाई करण्याची विनंती संयुक्तरीत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत असल्याचे  सर्वानुमते निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. सदर  निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सहीने प्रकाशित करण्यात आले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad