समरसता म्हणजे एकजीव होणे. जगताना समरसता आवश्यक आहे.
समजायला फारसं कठीण नाही. आपण चहा बनवतो. पाणी, साखर आणि चहापूड घेतो आणि उकळले कि चहा तयार! परंतु पुन्हा त्यातून साखर व चहापूड वेगळे करणे जवळजवळ अशक्यच होऊन जातं. हि समरसता. इंग्रजी मध्ये homogeneity!
या देशातील ब्राह्मणी धर्म संस्कृती गेली हजारो वर्षे या देशातील क्रांतीकारी विचारधारा संपविण्याचे काम करीत आली आहे. त्यांनी चार्वाक संपविला, बुद्ध संपविला. व्यक्ती व समाज यांच्या कल्याणाच्या ज्या ज्या विचारधारा येथे निर्माण झाल्या त्या सर्व विचारधारांना संपविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि जेव्हा संपविणे शक्य झाले नाही तेव्हा त्या विचारधारेचे ब्राह्मणीकरण करण्यात आले. ब्राह्मणी विचारधारेला कट्टरपणे नाकारणा-या बुद्धाला म्हणूनच ब्राह्मणी अवतार कांडात स्थान दिले गेले.
ब्राम्हणांनी ब्राह्मणी धर्म संस्कृतीची रचना करताना वर्ण व्यवस्था निर्माण केली. पुढे तीचे जाती व्यवस्थेमध्ये पर्यवसान झाले. आज भारतीय समाज हजारो जाती आणि उपजाती मध्ये विभागला गेला आहे. जात म्हणजे असा जनसमूह की जो दुस-या कुठल्याच जनसमूहाशी समरस होऊ शकत नाही. रोटिबंदि, लोटिबंदि, बेटिबंदि, व्यवसायबंदि व स्पर्शबंदि या तटबंदिने बंदिस्त झालेला जनसमूह म्हणजे जात! ती बदलता येत नाही. जात जन्माने मिळते आणि मेल्यानंतरही कायम रहाते. जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या जात जातजाणिवा, जात्याभिमान, जात्यंधता यामुळे माणूस माणसाला माणूस म्हणून ओळखत नाही आणि स्विकारतही नाही.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण व त्या अंतर्गत जातीसमूह यांची रचना ब्राह्मणांनी एका खाली एक अशी केली आहे. सर्वात वर ब्राह्मण, त्या खाली क्षत्रिय, त्या खाली वैश्य व त्याच्याही खाली शूद्र अशी उभी कप्पेबंद कडेकोट व्यवस्था बनवली आहे. "फोडा आणि झोडा" हे ब्राह्मणी व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेतील ब्राह्मण सोडून सर्वच जातींना या व्यवस्थेचा त्रास होतोच. जाती व्यवस्था ही सर्वंकष शोषणाची एक कुव्यवस्था आहे. परंतु या सर्वंकष शोषणाविरूद्ध गुलाम जातीसमूह सामूहिक बंड करून उठण्याची कोणतीच शक्यता नाही.
जाती व्यवस्था आणि त्यातले आपले सर्वोच्च स्थान कायम टिकविण्यासाठी ब्राह्मणांनी व्यक्ती व जातीसमूह यांची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट केली आहे. त्यासाठी देव, दैव, नियती, नशीब, ग्रह, ज्योतिष, शुभ,अशुभ, शांती, होम, हवन, आत्मा, परमात्मा, पुर्वजन्म, पुनर्जन्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, नवस, सायास, व्रत, वैकल्ये, उपास, तापास असा अविद्येच्या अडगळीचा पसारा मांडला आहे. या अविद्येमुळे व्यक्ती व समाज मतीहिन, नीतीहिन, गतीहिन, अर्थहिन झाला आहे व परिणामी सर्वार्थाने खचून गेला आहे. सामर्थ्य हरवून बसला आहे. ब्राह्मणी धर्म संस्कृती मुळे व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
अशा पतनशील विचारधारेशी ब्राह्मणी धर्म संस्कृती मधील सर्वहारा शूद्र अतिशुद्रांनी म्हणजे SC, ST व OBC यांनी समरसता कशी आणि का करावी? प्रस्थापित सनातनी शोषकांनी चालविलेल्या शोषण व्यवस्थेशी उध्वस्त झालेल्या शोषितांनी समरस का व्हावे? असे असले तरीही ब्राह्मणी धर्म संस्कृतीचे चालक, मालक व संचालक आज जोरदारपणे समरसतेचा प्रचार करीत आहेत.
1982 साली आर एस एस ने समरसता मंच ला जन्माला घातले. पुढे समरसता परिषद आली. समरसता साहित्याची निर्मिती केली गेली. नेहमीप्रमाणे शूद्र अतिशुद्रांमधिल हवसे, गवसे आणि नवसे या सर्व प्रक्रियेमध्ये समरस झाले. आपल्याच समाज बांधवांविरोधात प्रस्थापितांच्या छावणीत हुजरेगिरी अन् गद्दारी करू लागले.
याच देशात बुद्धाने अडीज हजार वर्षांपूर्वी प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या तत्वज्ञानाचा पाया घातला. प्रतित्यसमुत्पाद, अनात्मवाद व अनित्यता हे सिध्दांत मांडले. आधुनिक वैज्ञानिकतेला जन्म दिला. श्रध्देलाही बुद्धिच्या कसोटीवर तपासून घ्यायला शिकविले. यामुळे भारतात प्रचंड वैचारिक क्रांती झाली. भिक्खु संघाने ही वैचारिक क्रांती जगभर पसरवली. सम्राट अशोकाने आपले शासन, प्रशासन, सत्ता यांचे संपूर्ण योगदान या सम्यक क्रांतीसाठी दिले. परिणामी देश समृद्ध व संपन्न झाला. त्यामुळेच जगाच्या उत्पन्नात भारताचा वाटा 33% पेक्षा अधिक होऊ शकला. याच काळात अजंठा एलोरा या सारखी महान शिल्पांची निर्मिती झाली. तशा प्रकारचे बौध्दिक व मानसिक स्वातंत्र्य व सृजनशीलता बुद्धाच्या क्रांतीकारी आंदोलनाचा परिपाक आहे!
आधुनिक काळात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला अतिशय सुंदर व मौल्यवान असे संविधान दिले आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधूत्व या जीवनमुल्यांच्या पायावर सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे महान उद्दिष्ट संविधानामध्ये निश्चित करण्यात आले आहे.
या देशातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय; अभिव्यक्ती, विचार, विहार, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; सन्मान व संधी यांची समानता; व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता प्रवर्धित करणारी बंधूता यांची ग्वाही दिली आहे.
संविधान कितीही चांगले असले तरी ते कुणाच्या हाती पडते यावर त्याचे परिणाम ठरत असतात. चांगले संविधान वाईट लोकांच्या हाती पडले तर त्यातून चांगले परिणाम घडून यायची शक्यता कमीच असते. उलट एखादं खराब संविधान चांगल्या लोकांच्या हाती पडले तर त्यातून चांगले परिणाम यायची शक्यता जास्त असते. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी कशी केली जाते हे महत्त्वाचे असते. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना देशातल्या राज्यकर्त्यांची मानसिकता चांगलीच माहित होती. इथले प्रस्थापित जातीसमूह व त्यातून आलेले राज्यकर्ते यांची सनातन बुरसटलेली जडणघडण बाबासाहेबांना चांगलीच ठाऊक होती. म्हणूनच संविधानप्रणित नवराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांनी दोन क्रांतीकारी साधने भारतीयांच्या हाती दिली आहेत. अशोकविजयादशमी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी भारतीय लोकांना बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला आहे. त्यापूर्वी बरोबर 14 दिवस आधी म्हणजे 30 सप्टेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी रिपब्लिकन तत्वज्ञान व रिपब्लिकन पक्ष दिला. ज्या ज्या लोकांना या देशातील दलित पिडीत वंचित शूद्र अतिशुद्रांना म्हणजेच SC, ST, OBC यांच्या मुक्तीसाठी लढायचे आहे त्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या वरील दोन क्रांतीकारी साधनांशिवाय दुसरा पर्याय नाही! त्याशिवाय या देशातील लोकशाही टिकणार नाही हे निश्चित!
जगताना समरसता आवश्यक आहे! शोषक जातवर्गाने त्याच्या स्वार्थासाठी चालविलेल्या शोषण व्यवस्थेशी शोषितांचं समरस होणं ही फार मोठी शोकांतिका ठरेल. भूतकाळातील अशा चुकांचे दुष्परिणाम शोषित जातीसमूह आज भोगत आहे. दुःख, दारिद्र्य, अभावग्रस्तता, अनारोग्य, भय, कूपमंडूकता यामध्ये इथला शूद्र अतिशुद्र जातीसमूह भरडला जात आहे.
जगताना समरसता आवश्यक आहे! म्हणूनच समरस व्हायचेच असेल तर बुद्ध विचारांशी समरस व्हा! समरस व्हायचेच असेल तर संविधानाशी समरस व्हा!! समरस व्हायचेच असेल तर आंबेडकरी तत्वज्ञानाशी समरस व्हा!
प्रेमरत्न चौकेकर
0 टिप्पण्या