आकाश तर पांघरले आहे पण झोप उडाली आहे, लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत- मुख्यमंत्री

आकाश तर पांघरले आहे पण झोप उडाली आहे, लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत- मुख्यमंत्री


     मुंबई


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहेत ही चिंतेची बाब असली तरी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. किमान ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्याबाबत १४ तारखेला नियम काय असतील ते सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले’ हे गाणे आठवत आहे. आकाश तर पांघरले आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘मी २ ते ३ दिवसातून तुमच्यासमोर येत आहे. आज येण्याचा कोणताही विचार नव्हता. लॉकडाऊन संपण्याच्या दिवशी रविवारीच तुमच्याशी बोलण्याचा विचार होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्स झाली. यात पंतप्रधानांसोबत आमच्या सर्वांच्या तोंडावर पट्ट्या (मास्क) बांधलेल्या होत्या. आमच्या तोंडावर पट्ट्या बांधणे कुणालाही शक्य झाले नाही, मात्र कोरोना विषाणूने ते केले. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या येण्यापेक्षा मीच या बैठकीचे तपशील तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला.


आपण आता कोरोना रुग्ण समोरुन येऊन चाचणी करण्याची वाट पाहत नाही, तर त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्यात. केवळ मुंबईत १९ हजार चाचणी झाल्या आहेत. त्यापैकी १००० रुग्ण आढळले. मात्र, या रुग्णांमध्ये सूक्ष्म ते अतिसूक्ष्म लक्षणे आहेत.ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्यात ६० वर्षांहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना कोरोना संसर्गाव्यतिरिक्त इतरही मोठे आजार होते. काही प्रकरणांमध्ये हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात आल्याचे लक्षात आले.


आपण कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितले आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार आहे.


मुंबई, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला आणि जगाला दिशा दाखवत आला आहे. या कोरोनाच्या स्थितीत देखील आपण देशाला आणि जगाला दिशा दाखवणार आहोत. हे किती दिवस चालणार असे अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेल की जितकी आपण शिस्त पाळाल तितका तो लवकर संपेल. ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहिले. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचे आहे या सूचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलेन.


सर्व देशात वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत, मात्र ते एकत्र येऊन कोरोनाशी लढत आहेत. पंतप्रधान मोदी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहे. यात राजकारण नको. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजले आहे. मात्र, या स्थितीत राजकारण नको. पक्षीय राजकारणाला येथे जागा नाही. यातून बाहेर पडून नक्कीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो.ज्याला ज्याला वर्क फ्रॉम करणे शक्य आहे त्याने त्याने वर्क फ्रॉम सुरु करा. आपल्याला १४ एप्रिलपासून किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. किमान या शब्दावर मी मुद्दाम जोर देतो आहे. या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील. हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आम्ही हे युद्ध जिंकणारच, कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध जिंकता येत नाही. त्यामुळे हे युद्ध आपण जिंकणारच यासह मी पुन्हा तुम्हाला शिस्त पाळण्याचे आवाहन करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad