Top Post Ad

मीडियाचा भूलभुलैया......

मीडियाचा भूलभुलैया आणि बहकणारे समाजमन 


पत्रकारितेत एक गोष्ट आवर्जून शिकवली जाते. बातमी, स्टेटमेंट यांत नीट फरक करायला शिकलं पाहीजे. शब्द जपून वापरले पाहीजेत. कुणाचंही स्टेटमेंट ही सत्य बातमी म्हणून प्रेझेंट करणं हे एथिक्सच्या विरोधात असते. ते एथिक्स प्रत्येक पत्रकाराने पाळलेच पाहीजेत हे अलिखित संकेत असतात. पण, ते संकेत पाळलेच जातात असे नाही.


वाचणारा माणूस हा प्रगल्भ असतो, शिकलेला माणूस निश्चित संवेदनशील असतो या प्रबोधन युगापासून चालत आलेल्या गृहितकांना आपण एकविसाव्या शतकात जोरकसपणे छेद दिला आहे. बुद्धी ही केवळ अफवा वाटावी आणि बुद्धीचा भ्रमच आपल्यापाशी एकमेव सत्य असावं या रिएलिटीत उतरलोय की काय? की, कोणत्या दुसऱ्या इल्यूजन मध्ये आपण जगतोय याची स्वतःशीच खातरजमा करता येईना झाली आहे. पत्रकारितेचे तेच झालेले आहे. यात शिकलेल्या परंतू स्वजातीय आणि स्वधर्मीय अंडरकरंट्स खुप स्ट्राँग ठेऊन आलेल्या या नव्या पीढीने प्रोपेगेंडा थेअरी जी आजवर फक्त पुस्तकांत वाचून होतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 
कोरोनाच्या आगमनापासून भरपूर बातम्या आल्या. या बातम्यांत कनिका कपूरच्या पार्टीपासून, तीचं कॅरियर बनून फिरणं, संसर्ग अगदी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण होणं आपण पाहीलं. त्यात संबंधित आलेले कितीतरी वीआयपी लोक आज गायबच आहेत. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या त्या वीआयपींचा या आणीबाणीत कुठेही पत्ता नाही. ते क्वारंटाईन आहेत का याबाबत पत्ता नाही. माहीती नाही. यानंतर कनिका कपूरने डॉक्टर आणि मेडिकल स्टाफशी गैरवर्तन केल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या. तरीही या प्रकरणात कनिका कपूरचा धर्म, जात किंवा पंथ काढून कोरोनाचं नामकरण करण्याच्या बातम्या देणं हे पत्रकारितेच्या एथिक्सविरोधात आहे. हेच एथिक्स लोकांनीही पाळलं. कर्नाटकात जमावबंदीचे आदेश असतानाही भाजप आमदाराच्या मुलीचे लग्न झाले. 3000 लोक जमले होते. तेव्हाही कुणी या मूर्खपणाला धर्माशी जोडून पाहीले नाही. तसे करणे अनैतिक ठरले असते. उल्हासनगरात 1500 लोकांच्या सत्संगमध्ये पॉझीटीव कॅरियर महिला होती. त्यानंतर शहरभर पसरलेली दहशत पाहीली आहे. त्या मूर्खपणासही कोणत्याही जातीचे अथवा समुहाचे नाव देऊन कोरोनाचे नामकरण केलेले नाही. किंवा केले नव्हते.


डोंबिवलीत लग्न आणि हळद समारंभात अगदी अलीकडे पॉजीटीव्ह कॅरियर नाचला. अनेकांना संसर्ग झाला. म्हणून त्यापैकी कुणाच्या धर्माचा, पंथाचा आधार घेऊन कोरोनाचे नामकरण केले गेले नव्हते. लोक थाळ्या वाजवत, शंख फुंकत, गरबा खेळत रस्त्यावर नाचले तेव्हा ना भाषेचे, ना धर्माचे, ना परिसराचे लेबल लावून कोरोनाचे नामकरण केले गेले. मूर्खपणा हा मूर्खपणाच असतो. म्हणून इतरांनी तो केला नाही. आपण मरकज च्या निमित्ताने तेच केलं. अगदी कालपरवापर्यंत देशातील अनेक धार्मिक स्थळांत आजही भरपूर गर्दी आहे. काही मशीदीही अपवाद नाहीत. त्या सर्वांवर कारवाई करायला हवी. 
तबलिघी जमातीचे मौलाना असोत किंवा संभाजी भिडे सारखे लोक हे दोन्ही मूर्खांसारखे स्टेटमेंट करत होते. मशीदीत लोक लपवले जातात तर मंदिरात लोक अडकले जातात अश्या शब्दछल असलेल्या बातम्या वाचून लोकांची डोकी न फिरली तर नवल. तब्लिघी जमात अति अवैज्ञानिक पायावर उभी असलेली जमात आहे. जिचे सायंटिफिक टेंपरामेंट जपणाऱ्या संवैधानिक भूमित काहीच काम असायला नको. लक्षात घ्या. या जमातीचं जे इंस्टीट्यूशन आहे ते बॅन करायला पाहीजे होतं. पण ते झालं नाही. किंवा ते केलं गेलं नाही. तब्लिघी सारख्या संस्था, प्रत्येक वेळ पोलराईजेशन होईल असे फतवे काढणारे मौलवी असणे ही संघाची गरज आहे. जर समोर शत्रु नसेल तर त्यांचे राजकारण उभे तरी राहील कसे.


फेसबुकवर ट्विटरचे किती तरी स्क्रीन शॉट फिरत आहेत. त्यातील 90 टक्के स्क्रीनशॉट फेक आहेत. ते अगदी सप्रमाण पुरावे देऊन सिद्ध करता येऊ शकते. अगदी त्यातील पाच ते दहा स्क्रीनशॉट तर मी स्वतः तपासून पाहीलेत. पण, प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीची त्याच त्याच मार्गाने सत्यापन करून पाहणे हे सामान्य बुद्धिमत्तेच्या आणि सीमीत आवाक्याच्या माणसाच्या लायक गोष्ट नाही. तो चिडतो आणि लगेच रिएक्ट होतो. आपण एखादी गोष्ट, पोस्ट, लेखन, फोटो, व्हिडीओ वाचून, पाहून अथवा ऐकून तात्काळ आपल्या जातीय, धर्मीय, पंथीय, राजकीय अथवा आपल्या लाडक्या नेतृत्वाप्रती संवेदनशील होऊन चिकित्सक न होता थेट हिंसेवर उतरतो तेव्हा तो दोष आपला खरंच नसतो. कारण ते समजून घेऊन प्रतिक्रिया देण्याची वृत्ती आपल्यात कधी नव्हतीच. ती बुद्धी आपल्या ठाई नव्हतीच हे त्याचक्षणी अधोरेखित होऊन जाते. दूर्दैवाने भारतात आता तेच चालू आहे.


आजपासून चार दिवसांपूर्वी मॅक्स महाराष्ट्रवर किरण सोनावणे यांनी एक रिपोर्ट केला आहे. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेवर तीच्या संकुलातील लोकांनी थुंकलं. कारण काय तर ती हॉस्पीटलमध्ये काम करून घरी येते आणि कोरोना पसरवते. दोघेही जे थुंकले आणि ज्यांनी थुंकी झेलली ते दोघेही मुसलमान नाहीत. अगदी त्याचप्रमाणे देशातील वेगवेगळ्या शहरांत डॉक्टर आणि नर्सेसना घराबाहेर काढलं गेलं. अर्थात त्याच्या राहत्या (भाड्याच्या) घरातून. दोन ठिकाणी डॉक्टरांना घर सोडले नाही तर बलात्काराच्या धमक्या दिल्या होत्या. हे धमक्या देणारे, घरातून बाहेर काढणारे आणि काढलेले दोघेदी ना मुस्लिम होते ना मागासवर्गीय हिंदू, ते सवर्ण होते. पण त्यांच्या जाती, त्यांची नावे, त्यांचे धर्म घेऊन राजकारण करण्याची घाणेरडी गोष्ट प्रागतिक कार्य़कर्त्यांना सुचू शकत नाही. ते तसे करू धजणारही नाहीत.


सोलापूर येथील मिरवणूकीत दगडफेक झाली. त्याचेही मोठे राजकारण करता आले असते. पण ते राजकारण करणार कोण? त्याने कुणाचा फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो. सध्या देशभरात नर्सेस ठिकठिकाणी जॉब रिजाईन करत आहेत. तसे नोटीफिकेशन निघत आहेत. डॉक्टर्स पॉजीटिव होत आहेत. नर्सेस, स्वच्छता कर्मचारी पॉजीटिव होत आहेत. डॉक्टर, पॅरामेडीक यांना विशेष सुविधा आणि संरक्षण करणारे पीपीई किट यांचा तुटवडा आहे. मजूर, रोजंदारीवरील लोक, स्थलांतरीत मजूर रस्त्याने पायपीट करत चाललेले आहेत. एक ना अनेक प्रश्नांचा भाडीमार चालू होता. त्यात पीएम केअरचा घोटाळा लोक स्वतः प्रश्न विचारू लागले. गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर शंका घेऊ लागले. ते सर्व चुटकीसरशी गायब करण्यात हिंदू मुस्लिम प्रश्नाने यश मिळवले. म्हणून मरकजने कोरोना वाढवला नाहीतर इतक्यात कोरोना संपुष्टात आला असता असे म्हणण्याची थेट संधी मंत्रालयाकडे म्हणून येते. मरकजचे राजकारण प्रशासनाला ठाऊक होते म्हणून महाराष्ट्रात परवानगी नाकारली. पण दिल्लीत केंद्र सरकारकडून का नाकारण्यात आली नाही किंवा केंद्र सरकारने तात्काळ पोलिस पाचारण करून का म्हणून वेळीच आवरतं घेतलं नाही. कट्टर मुस्लिम राजकारण्यांच्या कोणत्याही राजकारणाला, कृतीला कधीच समर्थन नाही. उलट मुस्लिमांच्या प्रथा, त्यांच्या स्वतःहून डिफरंटी आयडेंटीफाय होण्याच्या सवयींचा मी कडवा विरोधक राहीलेलो आहे. हे अनेक मुस्लिम गटांत जाहीर बोललेलो आहे. माझ्यासारखे हजारोंनी सापडतील जे दार ऊल हरब आणि दार ऊल इस्लाम वर इस्लाम आणि त्याच्या भारतातील राजकारणाची कठोर चिकित्सा आणि टिका करत असतात. पण ते सोयीनं हिंदू होणाऱ्यांना कळणार नाही.


भारतासारख्या देशात तुम्हाला कोणताही धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. पण, भारतीय संविधानाच्या नजरेत तुम्ही धर्मनिरपेक्ष राज्याचे नागरिक आहात. भारतीय संविधान धर्म रेकग्नाईज करत नाही. वन वोट वन व्हॅल्यू इतकीच तुमची आमची भारतीय संविधानात किंमत आहे.


त्यामुळे सुधरा. बँड वॅगन इफेक्टसारखं माझ्या बाजूवाला बोलला आहे, म्हणून मला बोलावंच लागेल. तो नेमका आपल्यावरच बोलला आहे, म्हणून जर मी बोललो नाही तर उद्या मला स्विकारलं जाईल का, या इनसिक्यूरीटीच्या भावनेतून येणाऱ्या पीअर प्रेशरला बळी पडू नका. हिंदूस्तानचं स्वप्न पाहणाऱ्यांना हिंदू बनणं आणि ते स्वप्न साकार होत आहे म्हणून मुस्लिमांना कट्टर मुस्लिम बनणं जास्त सोप्पं आहे. भारतीय बनवणं कठिण आहे. स्वतःचे मत ठोकून सांगणं कठिण असलं तरी खुप गरजेचं आहे. नाहीतर, आज मुस्लिम जात्यात आहेत. उद्या सुपात असलेले मागासवर्गीय आणि नंतर आजच्या संघाचे फुटसोल्जर असलेले इतर मागासवर्गीय सुपातून जात्यात येणारच आहेत. एकेका स्टेटमेंटला मीडीया चूकीच्या पद्धतीने प्रेझेंट करून दंगली घडवेल. आता मरकज होतं. ज्याचा पुरावा नाही पण कुणीतरी स्टेटमेंट दिलंय म्हणून सगळ्यांनी खरं मानलंय. उद्या ऊठून कुणीतरी स्टेटमेंट देईल बौद्धांनी सामुहिकपणे येऊन जयंती केली आणि कोरोना पसरवला मग आहेत बौद्ध लाईनीत. त्यानंतर अन्य कुणी... हा सिलसिला चालू राहील. त्यावर पांघरूण म्हणून मेणबत्त्या पेटवल्या जातील. पण कुणी विचारणार नाही. बजेटचं काय झालं, मेडिकल फॅसिलीटीचं काय झालं...


अल्ट न्यूज आणि टाईम्स ने खोटी बातमी उघड केली. मोदींनी जी 20 देशांचं नेतृत्व करावं ही इंग्रजी बातमी फेक असल्याचे समोर आलं. लोक थुंकतायेत याचा आकांत केलेली श्वेता सिंग 2000 च्या नोटेत चिप असल्याचे छाटी ठोक सांगत होती. भारत के वीर जवान चा फंड कुठे गेला हे सांगता न आलेले लोक आता खोटे स्क्रीनशॉट फिरवत आहेत. कोरोनाला धर्म लावत आहेत. उद्या जातही लावतील. पण ज्या दिवशी या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश होऊन सत्यता समोर येईल ... तेव्हा तुम्ही आम्ही एकच विचार करत बसू.. जर या बातम्यांवर विश्वास ठेवला नसता तर आज आपण आपला देश आणि माणसं दोन्ही वाचवू शकलो असतो...


आता येणारे संकट कसे सांभाळतायेत आपले तज्ञ ते पाहणे खुप भीतीदायक आहे. पाहू काय होतंय..● Vaibhav Chhaya.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com