आमदार, खासदार, नगरसेवकांचा मदतनिधी पक्षाच्या आपदा निधीत कशासाठी? - सचिन सावंत
मुंबई,
सर्व जग सध्या कोरोना विषाणूच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. भारतातही कोरोनाने थैमान मांडले असून अशा संकटावेळी राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे, कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्य लोक, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट कलाकारांसह अनेकजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल, भाजपा व त्यांच्या नेत्यांची भूमिका दुर्दैवाने असंवेदनशील आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत पुढे म्हणाले की, प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपाने कोरोनाच्या गंभीर संकटातही असंवेदनशीलता कळस गाठला आहे. गरिब, कामगार, कष्टकरी तसेच हातावर पोट असलेले लोक या संकटात होरपळले जात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. हजारो हात मदताठी पुढे आले आहेत परंतु भाजपा अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरिब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी ‘मोदीकीट’ बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे. राष्ट्रीय संकटाच्या मदतकार्यातही असे व्यक्तीस्तोम माजवण्याचा व राजकीय प्रचार करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे.
भाजपाचे काही नेते तर कोरोनावर मात करण्यासाठी अनेक अशास्त्रीय उपाय सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. गाईचे शेण व गोमुत्राने कोरोना बरा होऊ शकतो असे तारेही त्यांनी तोडले आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कळसच गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री जयंत पाटील यांनी कोरोना संकटावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्यापद्धतीने देश लॉकडाऊन केला त्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. पाटील यांनी मोदींवर टीका केली म्हणूनच इस्लापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शिक्षा झाली असे असंबंध व बेताल वक्तव्य वाघ यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा मुकाबला अत्यंत उत्तमरितीने करत असताना उगाचच विरोधास विरोध म्हणून राज्य सरकारवर टीका करणे, मदतीमध्ये स्वतःचे अस्तित्व दाखवून श्रेय लाटणे असे उद्योग करणे म्हणजे भाजपाला या परिस्थीतीचे गांभीर्य नसल्याचेच प्रतिक आहे, असेही सावंत म्हणाले.
0 टिप्पण्या