Top Post Ad

करोना’चा परिणाम महापालिका निव़डणुकींवर 

करोना’चा परिणाम महापालिका निव़डणुकींवर 



नवी मुंबई 
करोना विषाणू संसर्गामुळे केंद्र सरकारने सर्व देशातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले असल्याने  पुढील महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई व औरंगाबाद पालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता अधिकारी वर्गात व्यक्त केली जात आहे. करोना विषाणू प्रतिबंधासाठी महापालिका स्तरावर शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. करोना व्हायरस संसर्ग नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा, तसेच बाहेरगावी जाणारा प्रवास टाळावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
नवी मुंबई पालिकेच्या नगरसेवक सभागृहाची मुदत नऊ मे रोजी संपत आहे. तोपर्यंत पालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. सध्या प्रभागनिहाय मतदारांची यादी प्रसारित करण्यात आली असून त्यावर हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. प्रभाग कार्यालयात ठेवण्यात आलेल्या या मतदार यादींमुळे सध्या हरकती नोंदवण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड प्रभाग कार्यालयात आहे. शहरात सर्वत्र निवडणुकीचा माहोल असल्याने हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांचा तर बार उडविला जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची आतापर्यंत आचारसंहिता लागू न झाल्याने आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचे फावले आहे. केवळ निवडणुका असल्यामुळे नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात नागरी कामांचा शुभारंभ सुरू असून देशातील या संकटांची फारशी चिंता न करता इच्छुक उमेदवारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीमुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक एकत्र येण्याची अहमहमिका लागलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद पालिकेच्या निवडणुका देशावरील करोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत पुढे ढकलण्याची चर्चा निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील वेगवेगळ्या टुर्स-ट्रॅव्हल्स एजन्सींनी पर्यटनासाठी परदेशात जाण्याऱ्या सर्व सहली रद्द कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. नवी मुंबईतून पर्यटनासाठी कोण बाहेरील देशांत गेले आहे, याची माहिती गोळा करण्यात येणार असून ते त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व माता बाल रुग्णालय, बेलापूर या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णखाटात वाढ करण्यात येणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com