नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध आता कडक मोहीम
ठाणे - कोरोना विषाणूचे संकट पाहता राज्यात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात तसेच देशात सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेडीकल इमर्जन्सी सारख्या कारणाशिवाय घरातून बाहेर न निघण्याचे आदेश नागरिकांना प्रशासनाकडून दिले जात आहेत. परंतु त्याला हरताळ फासण्याचे काम अनेकजण करत आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना असे पाऊल उचलावे लागत आहे.
विनाकारण घराबाहेर पडलेल्या अनेकांना पोलिसांच्या दंडुक्याचे फटके मिळाले आहेत. तर अनेकांना रस्त्यातच उठाबशा काढायला लागत आहेत. राज्यात नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध आता पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. आनंदनगर इस्टर्न एक्प्रेस हायवेवर कोपरी पोलिसांच्या वतीने गस्त घातली जात असताना विनाकारण बाहेर फिरणारे अनेकजण पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्या सर्वांना बाजारातच चक्क उठाबशा काढायला लावल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे तरी लोकं विनाकारण घरातून बाहेर पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस आणि नागरिक करत आहेत.
नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत की, त्यांनी घरात रहावे. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल व संक्रमणाचा धोका कमी होईल. परंतु नागरिक याला न जुमानता रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पडवी यांनी दिली. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सहकार्यानेच हे संकट दूर होण्यास मदत होईल, त्यामुळे सर्वांनी घरीच रहावे व प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन नीता पडवी यांनी केले आहे.
0 टिप्पण्या