कोरानाविरूद्धच्या लढाईत शिजवलेला चिकनयुक्त आहार घेतला पाहिजे : डॉ. लहाने
पुणे
कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांशी लढताना प्रोटिन्सचे सेवन गरजेचे असते. चिकनमधून अव्वल प्रतिचे प्रोटिन्स मिळतात. म्हणून, कोरानाविरूद्धच्या लढाईत शिजवलेला चिकनयुक्त आहार घेतला पाहिजे, असे सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे. डॉ. लहान राज्याच्या वैद्यकिय शिक्षण विभागाचे संचालक देखिल आहेत. कोरोना – समज गैरसमजाबाबत एका वृत्तवाहिनीशी त्यांनी नुकताच संवाद साधला.
फेब्रुवारीत कोरोनाच्या संसर्गाच्या बातम्या सुरू झाल्यानंतर काही घटकांनी सोशल माध्यमात चिकनबाबत गैरसमज निर्माण केले. एकूणच चिकनसंदर्भात उलटसूलट चर्चा सुरू झाली. पोल्ट्री उद्योगाची मोठी वाताहत झाली. या पार्श्वभूमीवर चिकनविषयक गैरसमजाबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. लहाने म्हणाले, “वटवाघूळाचे सूप घेतल्यानंतर कोरोनाचा माणसात शिरकाव झाल्याची थेअरी आहे. कोंबडी ही काही वटवाघळाच्या कॅटेगिरीत येत नाही. 50 डिग्रीच्यावर तापमान गेले तर त्यात विषाणू जीवंत राहत नाही. आपण (भारतीय) पूर्ण शिजवूनच चिकन किंवा मटण खातो. चांगले प्रोटिन्स आपल्याला चिकन, मटण आणि दूधातून मिळतात. जर आपण एकट्या दूधावरच अवलंबून राहिलो, तर पुरेसे प्रोटिन्स मिळणार नाहीत. कोरोनाशी लढायचे असेल तर चिकन खाल्ले पाहिजे.” कोरोनाविरोधात लढण्याच्या प्राधान्यक्रमात आहाराला महत्त्व आहे आणि आहारात प्रोटिन्सचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी चिकनकडे पाठ न फिरवता व्यवस्थित शिजवून चिकन खावे, असे डॉ. लहाने यांनी सूचित केले.
सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. अतुल बिनिवाले यांनी देखिल आहारात प्रथिनांचे महत्त्व यावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीत उद्बोधक माहिती दिलीय. डॉ. बिनिवाले सांगतात, “आपले शरीर आहारातून जे पोषक तत्त्वे घेते, त्यातून आपली इम्युन सिस्टिम राखली जाते. आपण कार्बोहायड्रेड घेतो, त्यातून केवळ कॅलरीज मिळतात. तथापि, प्रतिकार शक्ती राखण्यासाठी प्रोटिन्स अधिक उपयुक्त ठरतात. मानवी शरीराला दैनंदिन आहारात प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते. त्यानुसार तेवढे ग्रॅम प्रोटिन्स घ्यायला हवेत. शरीरात प्रोटिन्स साठवता येत नाही. त्यामुळे ते दररोज घेतले पाहिजे. शाकाहारात कडधान्ये, दूध, पनीर चिज, तर मांसाहारात चिकन, अंडी यांच्यातून प्रथिने मिळतात. त्यांचे योग्यप्रमाणात व संतुलित सेवन गरजेचे आहे. अशाप्रकारे आहाराबरोबरच योग्यप्रकारे व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे देखिल प्रतिकारशक्ती चांगली राहते.”
-----------
गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर कोरोना या विषाणूचा ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून, शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले.
“सध्या समाज माध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद भारतात नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत, ” असे डॉ. रानडे यांनी सांगितले. “भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे 100 डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. शिवाय, भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत,” असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. “ग्राहकांनी व्हॉट्सअप वा फेसबुक आदी माध्यमांतील विपर्यास केलेल्या पोस्ट्सवर विश्वास ठेवू नये. भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहे. अनेकदा कुक्कुटपालन व्यवसायासंबधीच्या आकसातून वा गैरसमजातून ठराविक मंडळींकडून अशा प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल केल्या जातात. त्या प्रमाण मानू नयेत, ” असे आवाहनही त्यांनी केले.
0 टिप्पण्या