Top Post Ad

राजरत्न आंबेडकर यांची केरूमाता बौद्ध लेणी परिसराला भेट

२० मार्च चवदार तळे आंदोलनाच्या स्मृती कायम ठेऊन  आज नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळ परिसरातील केरुमाता बौद्ध लेणी पाहण्यासाठी मा राजरत्न आंबेडकर आणि सहकारी यांनी भेट देऊन आंदोलनास चेतविले.  यावेळी बौद्ध लेणी बचाव आंदोलनाचे प्रणेते राजाराम पाटील यांनी या लेण्यांबद्दल माहिती दिली.



 


नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त  लढा  केरुमाता बौद्ध  लेण्यांमध्ये का केंद्रित झाला? 
    
     नवी मुंबई विमानतळ प्रकल्प ही जनतेची फार मोठी फसवणूक आहे. केंद्रातील आणि राज्यातील मुरब्बी राजकीय नेते आणि gvk अर्थात विमानतळ चालविणाऱ्या खाजगी उद्योजकांचा हा डाव आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी यात हजारो कोटींची दलाली घेतली आहे! 
रायगड जिल्ह्यात खूप  आधीच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी समाज सुधारक नारायण नागु पाटील यांनी शेतकरी कुळांचे शोषणकर्ते उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा, वैश्य खोत सावकार यांच्या विरोधात खोती विरोधात लढा उभारून, शत्रू ओळखण्याची नजर  येथील आगरी कोळी कराडी, कुणबी, भंडारी, आदिवासी व इतर बारा बलुतेदार आणि शूद्रातिशूद्र जातीसमूहांना दिली होती. आगरी कोळी सागरपुत्र हिंदू धर्मात मागासवर्गीय आहेत हे समजविण्याचे खूपच धोकादायक काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते!त्यामुळेच आगरी कोळी कराडी सावकार खोत यांच्या धार्मिक अजगरी विळख्यातून सुटले. यातून पुढील पिढीला दोन लोकनायक मिळाले. एक ॲड दत्ता पाटील, अलिबाग ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहभाग बालपणातच लाभला होता. दुसरे उरण पनवेलचे आमदार आणि खासदार राहिलेले ॲड दि बा पाटील साहेब! केवळ पुरोगामीच नाही तर बुद्ध फुले आंबेडकर यांना आदर्श मानणाऱ्या या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष पदी राहून महाराष्ट्रात आंबेडकरी विचार गौरवाने जपला. झेंडा कम्युनिस्टांचा असला तर विचार बुद्ध बाबासाहेब यांचाच होता! दि बा पाटील यांनी आगरी समाज हॉलचे नाव महात्मा जोतिबा फुले असे ठेवले तर दत्ता पाटील यांनी आपल्या नातवंडांची नावे सिद्धार्थ आणि गौतम यांची ओळख सांगणारी ठेवली. परंतु या नेतृत्वाशी जवळीक साधणारे नवे नेते निर्माण झाले नाहीत! त्यातही आगरी समाजाचे सख्खे भाऊ असलेल्या कराडी कोळी समाजातून असे नेते आजही निर्माण होऊ शकले नाहीत. हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे इतिहासाच्या शहाणपणाने आगरी समाज काही प्रमाणात प्रस्थापीत जातींना सामोरे जाताना किमान हुशारी बाळगून होता. परंतु हीच हुशारी दि बा पाटील आणि दत्ता पाटील यांच्या नन्तर लाचारीत रूपांतरित होऊन मराठा ब्राह्मण नेत्यांसाठी फायद्याची ठरली.  त्यातूनच "साडेबारा टक्केची" गौरवशाली लढ्याची परंपरा संपून "साडे बावीस" टक्क्यांची फसवी योजना नवी मुबंई विमानतळात संजय भाटिया या भामट्या सिडको अधिकाऱ्याने आगरी कोळी कराडी समाजाच्या माथी मारली आहे. यातील फसवणूक समजण्यासाठी दैववादाच्या पलीकडे नेणारा एकविरा पुत्र बुद्ध यांचा निसर्गन्याय सांगणारा बुद्धिनिष्ठ विचार हवा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखा  कायद्यावर बोट ठेऊन संघर्ष करणारा नेता हवाय. आज केवळ जन्माने धर्म स्वीकारून आणि वारस होऊन बुद्ध बाबासाहेब यांचा विचार समजून येईल एवढे हे सोपे काम नाही. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये. यात मुख्य विषय हा समुद्रावर शंभर टक्के अवलंबून असणाऱ्या मच्छिमार कोळी कराडी बांधवांचा आहे. आगरी समाजाला राजकीय, शैक्षणिक आणि कायदेशीर नेतृत्वामुळे अर्धा एकर जमीन हाताशी मिळाली, दहावी बारावी पर्यंत शिक्षणही मिळाले. काही प्रमाणात सरकारी नोकऱ्याही मिळाल्या. परंतु कोळी कराडी बाधवांकडे आगरी समाजाचे ऐतिहासिक दुर्लक्ष झाले आहे. ही सामाजिक चूक ओबीसी विचारांचा नेता म्हणून मी मान्य करून ती सुधारण्याचे वचनही देतो. नवी मुबंई विमानतळ प्रकल्पाच्या नेतृत्वात मला बोलायलाही द्यायचे नाही ही माजी आमदार विवेक पाटील साहेब यांची भूमिका मला सुरुवातीस समजलीही नाही. ते शेतकऱ्यांची बाजू मांडताना मी नेहमीच पाहिले आहे. ते सत्यही आहे. परंतु विमानतळात फसवणूक होणार होती मच्छिमार बांधवांची. साडेबाविस टक्के धोरणात ज्याचा सातबारा त्यास पुनर्वसन हे धोरण आहे. ऐकायला कुणालाही छानच वाटेल, परंतु शेतमजूर भूमिहीन नेते दादासाहेब गायकवाड यांचे जगप्रसिद्ध वाक्य येथे आठवते. "कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय?" माझे डाव्या चळवळीतीळ मित्र उरणचे संजय ठाकूर यांनी मला दादासाहेब गायकवाड यांचे माहितीचे एक पुस्तक भेट दिले होते. खरंय ज्याचा सातबारा नाही घरपट्टी नाही त्याचे काय??? नवी मुबंई विमानताळात जी कल्पकता पूर्वीच्या खोत सावकार यांनी दाखविली होती तीच बनवेगिरी सिडको, आमचे राजकीय नेते आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठा वैश्य या उच्चवर्णीय नेत्यांनी दाखविली!सातबारा घरपट्टी नसेल त्याला पुनर्वसन नाही. हा कायदा म्हणजे सिडकोचे "साडेबाविस टक्के "जगातील सर्वोत्तम आदर्श पॅकेज अर्थात मनुस्मृतीच्या नव्या रूपाची सिडको!यात सर्वात अत्याचार झालाय तो मच्छिमार बांधव, आणि भटके विमुक्त दगडखाण  कामगार अर्थात sc, st, vjnt या धनगर, मातंग, बौद्ध, आदिवासी या भूमिहीन भावा बहिणींवर!
    मच्छिमार बांधवांची अवस्था पाहिल्यानंतर मी डोक्यात कोळी टोपी घालण्यास सुरुवात केली. माहीम कोळीवड्यातील माझे मावस भाऊ जयेश आकरे यांनी जय महाराष्ट्र या tv चॅनलवर बोलताना प्रथमतः ही मानाची टोपी माझ्या डोक्यात घातली. आणि आरक्षण, कोळीवाडा गावठाण, समुद्रपुनर्वसन हे प्रश्न मिडियासमोर कोळी टोपीच्या माध्यमातून पुढे येऊ लागले! पुढे हा प्रवास आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार असुरुद्दीन ओवेसी असा  राष्ट्रीय नेतृत्वाच्या मस्तकांवरून कल्याण ते शिवाजी पार्क असा झाला. यामध्य कोळी बांधवांचे प्रश्न पुढे यावेत हा मूळ हेतू होता! तशी मच्छीमारी आणि कोळी टोपी ही माझ्या आजोबांची बाळू पाटील यांची देणगी आहे! आज माझ्या नावावर मच्छिमार बोटही आहे. जरी मी आगरी आहे!बंधू भगिनींनो आम्ही कोलीय वंश म्हणून आगरी कोळी कराडी भंडारी, ईस्ट इंडियन हे सख्खे भाऊच! एकाच मातृसत्ताक एकविरा आईची लेकरे!आज समुद्राचा सातबारा नाही म्हणून मच्छिमार बांधवांना पुनर्वसन नाकारणाऱ्या सिडकोच्या साडेबाविस टक्के धोरणास जाळूनच मी 17 फेब्रुवारीस सुरुवात केलीय! ती आधुनिक रुपातली देखणी मनुस्मृती च आहे! जोपर्यंत समुद्रावरच्या प्रकल्पग्रस्त मच्छिमार बांधवांना विमानताळातच  नाही तर कोस्टल रोड, शिव स्मारक प्रकल्प, शिवडी न्हावा सी लिंक, विविध बंदर प्रकल्प यात न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढूया! आज मातृसत्ताक केरुमाता बौद्ध लेणी हा कोलीय वंशाच्या सगरपुत्राचा सर्वात जुना पुरावा आहे! त्यासाठी समाजाने लढले पाहिजे! या लढाईत उच्च जाती, सत्ताधारी आपले शत्रू म्हणून उभ्या ठाकल्यात. मी त्यांना कळकळीची विनंती करतोय, आज कोरोना मुळे धर्म जात पंथ,स्त्री पुरुष हे भेद संपुन साक्षात मृत्य समोर उभा आहे! आपण कागदी पुरावा नाही, परंतु विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या समुद्रा पासून विस्थापित होणा-या  मच्छिमारांना न्याय मिळावा हे साध्या डोळ्यांना दिसणारे सत्य आहे! ते स्वीकारू या!मातृसत्ताक केरुमाता बौद्ध लेण्यांचा हा मानवी, निसर्ग न्याय आणि तर्क, बुद्धिनिष्ठ न्याय आहे! यातच घरपट्ट्या नसलेल्या सिद्धार्थनगर, धनगर वस्तीस ही न्याय मिळेल! भावांनो आंबेडकरी समूह, संघटनांनी या लढ्यासाठी  पाठींबा पत्रे आणि ऐतिहासिक सहभाग दिलाय!त्यातील अनेकजण पुनर्वसनाचे लाभार्थीपण  नाहींत! आपण सर्व धर्म, जात, पंथ, राजकीय पक्षभेद विसरून पाठींब्याची पत्रे  दया!मच्छिमार, भूमिहीन, समस्त मागासवर्गीय यांना विविध प्रकल्पामध्ये न्याय मिळावा यासाठी लोकसभा आणि विधानसभा येथे नवे कायदे तयार करण्याचे प्रस्ताव आपण लोकप्रतिनिधी आणि न्यायालयासमोर ठेवूया!माझे म्हणणे आपणास पटत असेल तर प्रतिसाद द्या! पाठींबा पत्र लिहून!  


राजाराम पाटील   शेतकरी प्रबोधिनी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com