ही तर हिटलरशाही - कमलनाथ
बंगळुरू
भाजप सोबत जाणाऱ्या आमदारांना बंगळूरमध्ये भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजय यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये कमलनाथ सरकारच्या काही मंत्र्यांचा देखील समावेश आहे. हॉटेल परिसरात पोहोचताच कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. याचा विरोध करताना काँग्रेस नेते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते. त्यानंतर कानडी पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. या नेत्यांना तेथून अमरुताहल्ली पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यावर भडकलेले दिग्विजय सिंह यांनी पोलिस स्टेशनमध्येच उपोषण करणार असल्याचे सांगितले. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या प्रकरणाला हिटलरशाही असे म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ''पोलिस आम्हाला आमदारांची भेट घेऊ देत नाही. मी मध्य प्रदेशातून राज्यसभेचा उमेदवार आहे. 26 तारखेला निवडणूक होणार आहे. आमच्या आमदारांना या हॉटेलात ओलीस धरण्यात आले आहे. ते आमच्याशी बोलू इच्छितात, पण त्या लोकांनी आमदारांचे मोबाईल सुद्धा जप्त केले. हॉटेलमध्ये भाजप नेते अरविंद भदौरिया यांच्यासह काही गुंड आहेत. आमदारांच्या जीवाला धोका आहे. माझ्याकडे काही बॉम्ब किंवा बंदूक नव्हती. तरीही पोलिसांनी मला अडवले. मी केवळ आमदारांची भेट घेऊ इच्छितो, यात त्यांना काय त्रास होतो."
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, ''बंगळुरूमध्ये भाजपची सत्ता आहे. पोलिस देखील त्यांच्याच आदेशांचे पालन करत आहेत. मला तर भाजपच्या सरकारमध्ये सुद्धा पोलिसांची भीती वाटत नाही. पण, भाजप नेत्यांना कोणती भीती आहे. ते स्वतःच्याच पोलिसांना घाबरतात का? मी या ठिकाणी गांधीवादी पद्धतीने आपल्या आमदारांची भेट घेण्यासाठी आलोय. त्यांची लवकरच भेट होईल अशी अपेक्षा करतो. 5 आमदारांशी माझे बोलणे झाले. त्यांनी आपल्याला ओलीस ठेवल्याचे सांगितले आहे. हॉटेलात पोलिसांचा 24 तास पहारा आहे. आमदारांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे.
0 टिप्पण्या