महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं आणखी एक संकट
मुंबई
देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या संकटाचा प्रभाव वाढत असतानाच महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं आणखी एक संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राजस्थानमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 26 मार्च इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होईल, परंतु मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील असा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यातील होणाऱ्या या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये या आवाहनाला धुडकावत नागरिक घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अशातच आता महाराष्ट्रावर आणखी एका संकटाचं सावट आहे.
0 टिप्पण्या