अपुऱ्या प्रवासवाहनांचे शासकीय कर्मचाऱ्यांपुढे संकट
मुंबई
कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. लॉक डाऊननंतर मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून बेस्ट तसेच इतर एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र ही सेवा अतिशय अपुरी असल्याचे दिसत आहे. विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्या कामाचा गौरव करण्याकरिता देशभरातून टाळ्या वाजवल्या गेल्या. त्यांच्या समस्यांबाबत मात्र शासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे.
कल्याण बस स्थानकाबाहेर मुंबईत जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसेसची व्यवस्था आहे. मात्र शुक्रवारी 12 वाजता मुंबईकडे जाणाऱ्या कल्याणच्या मुख्य बस स्टॉपवर गोंधळ सुरू होता. नायर रुग्णालयाच्या काही महिला कर्मचाऱ्यांना घेऊन न जाता बस रवाना झाली होती. कल्याणच्या वेगवेगळ्या भागातून पायपीट करत कर्मचारी बस स्टॉपवर येतात. मात्र काहींनी बस भरलेली नसताना आधीच नेल्याचे या महिलांनी सांगितले. बस स्टॉपवरून के.ई.एम रुग्णालय,जे जे रुग्णालय,टाटा रुग्णालय आदी ठिकाणी परिचारिकांसह इतर कर्मचारी रोज जातात. मात्र त्यांची संख्या आणि उपलब्ध बसेस यांमध्ये फार तफावत आहे. बस चुकल्यास दुसऱ्या बसमध्येही त्यांना घेतले जात नाही.
साडेबाराच्या दरम्यान मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम संपवून घरी परतत होते. कल्याणला या बसमधील काही कर्मचारी उतरले. उर्वरीत कर्मचारी बदलापूरपर्यंतच्या मार्गावरील होते. या बसमध्ये प्रवासी अक्षरशकोंबलेले होते. 50 पेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये होते. त्यात काही उभे होते. एकीकडे गर्दी करू नका, असे सर्वसामान्यांना सांगितले जाते. मात्र कोरोनाच्या नियमांचे अनावधानाने असे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली येथून कर्मचारी दररोज असेच अडचणींचा सामना करत मुंबईत कार्यालयात पोहोचतात आणि गर्दीत घरी येतात. वांद्रे, प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ, वडाळा येथील आगाराच्या बस कल्याण, डोंबिवली परिसरात येतात. अनेकांना मुंबईत कार्यालयात पोहोचण्यासाठी दोन तीन वेळा बस बदलावी लागते. मात्र आम्ही अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर जाणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुपारी एक वाजता नायर रुग्णालयात पोहोचण्यासाठी 20-25 कर्मचारी एक वाजेच्या बसची वाट पाहत होते. मात्र दीड वाजेपर्यंत वडाळा आगाराची बस आलेली नव्हती.
0 टिप्पण्या