Top Post Ad

*गर्दीचे पुनर्वसन*




*गर्दीचे पुनर्वसन*


              - प्रेमरत्न चौकेकर



काल दिल्ली आनंद विहार बस डेपो मध्ये प्रचंड गर्दी झाली. 15-20 हजार लोक जमा झाले. हे लोक करोनाच्या भितीने देशभर लागू झालेल्या Lockdown मुळे शहर सोडून आपापल्या गावी पायीच चालत निघाले होते. कुणी तरी म्हणाले की आनंद विहार बस डेपो मधून सरकारने बस सोडल्या आहेत. या अफवेमुळे सगळेजण त्या दिशेने निघाले..
हा जनसागर गेल्या शंभर दिडशे वर्षांपासून गावागावातून देशाच्या कानाकोप-यातून शहरांत आलेला आहे. मूळात गावच्या मोकळ्या स्वच्छ हवेची आणि ऐसपैस पणाची नैसर्गिक ओढ असलेली ही माणसं! त्या जन्मदात्या आणि पोसणा-या मातीच्या अतूट भावनिक नात्याने खूप खोलवर जखडलेली ही माणसं. फक्त जगण्यासाठी मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई अशा मोठ्या शहरात आलेली.... नाईलाजानेच! गावागावात खेड्याखेड्यात जातींच्या अभेद्य भिंती! जातीने निर्माण केलेल्या जातजाणिवा, जात्याभिमान, जात्यंधता, जातीयता, भेदाभेद, अस्पृश्यता, उच्च नीचता या सर्व जळजळीत वास्तवामुळे निर्माण झालेला जातीसंघर्ष आणि भांडवलदारधार्जिण्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेला वर्ग संघर्ष यांच्या दुहेरी कात्रीत सापडून पार उध्वस्त झालेला हा जमाव! शहरातील बिनचेह-याच्या गर्दीत आपले अस्तित्व शोधत जगत राहीला !
हि गर्दी अनेक कारणांमुळे होरपळत राहिली. धर्माधर्मातील दंगली असोत, जातीजातींमधल्या दंगली असोत, भाषेच्या अभिमानातून घडविलेल्या भाषक दंगली असोत, प्रांतवादातून घडविलेल्या दंगली असोत; या सर्व घटनांचा भयंकर त्रास शहरांच्या गलिच्छ, अस्वच्छ, आरोग्यहीन अशा वेशीबाहेरच्या वस्तीत राहणा-या या लोकांना नेहमीच होत असतो.
अशा धोकादायक परिस्थितीत जीवन संघर्षात पराभूत झालेली ही माणसे शहर सोडून आपापल्या गावी जायला निघतात. एकाच आशेवर की होईल पुन्हा नीट सगळं. मग येऊ पुन्हा एकदा.. जगण्यासाठी!
गेल्या सत्तर वर्षात देशाची प्रगती झाली नाही असं कोण म्हणेल? मग या प्रगतीचे झाले काय? नक्की विकास झाला कुणाचा?
हे प्रश्न गंभीर पणे आज आपल्या समोर उभे राहिले आहेत.
बैलगाडी गेली ; बसगाडी आली, ट्रेन आली, विमान आलं, मेट्रो आली. प्रगती झाली ना! छोट्याशा टप-या गेल्या, पंचतारांकित हाॅटेल्स आली. दुकानं खुजी करणारे माॅल आले. अठरापगड जातींचे सतराशे साठ उद्योग गेले. कार्पोरेट उदयोगसमूह आले. झोपडपट्टया जाऊन माणसांसाठीचे खास गगनचुंबी कबूतरखाने उभे राहिले आहेत. विकास झालाच नाही असं कोण म्हणेल?
परंतु या सर्व धनदांडगेकेंद्रीत विकासामध्ये त्या सर्वजातधर्मीय कोट्यवधी वंचित पिडीत दलितांचं काय?
आतापर्यंतच्या कोणत्या सरकारने या गर्दीचा गंभीरपणे विचार केला आहे? तसा तो केला असता तर आज दिल्लीच्या आनंद विहार बस डेपो मध्ये हजारोंचा ऊपाशी दिशाहीन लाचार अगतिक जमाव दिसलाच नसता ! येणा-या जवळच्या काळात ही गर्दी देशभर आक्राळविक्राळ रूप धारण करणार आहे.
ज्या करोनामुळे lockdown करावं लागलं त्या करोनाचा अशा प्रकारच्या गर्दीमुळे जास्त प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदिप्रणित Social Distancing चं काय झालं? सामाजिक दुरावा तर या देशाचे वैशिष्ट्य आहे. पण Physical Distancing म्हणजे शारिरीक सुरक्षित अंतर अशा गर्दीत कसे काय राहू शकते? टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, ऊर बडवून आणि प्रार्थना करून, होम हवन करून हा प्रश्न सुटणार नाही. पण हा असला मूर्खपणा आपल्या देशात चालतो.
या गंभीर प्रसंगी युद्ध सदृश्य परिस्थिती मध्ये या देशाला लुटणा-या शासन प्रशासनाकडून फारशा अपेक्षा करता येत नाहीत. परंतु या देशातल्या संविधानप्रणित सर्वसमावेशक कल्याणकारी राष्ट्राची स्पष्ट जाणीव असणा-या बुद्धीवंतानी यावर साक्षेपी विचार मंथन करून या सातत्याने वेशीवर टांगलेल्या करोडो पराभूत लोकांच्या गर्दीच्या कायमस्वरूपी सन्मानपूर्वक पुनर्वसनाच्या व्यवस्थापनाचे उपाय शोधून या देशातील लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट करायला हवीत! तसेच आवश्यक असल्यास त्यासाठी संसदेमध्ये जाऊन सत्ता हाती घ्यावी लागेल! अन्यथा आजची ही लाचार अगतिक गर्दी दिल्लीच्या आनंद विहारच्या बस डेपोकडे न वळता शस्त्र सज्ज होऊन संसदेवर व पर्यायाने भारतीय लोकशाहीवर रक्तरंजित हल्ला बोल करील! त्यावेळीे प्रस्थापित जातीवर्णव्यवस्थापक व त्यांचे आश्रित चमचे भांडवलदार यांचे पोलिसीराज आणि मिलिटरीराज यांची कोणतीच पर्वा करण्याच्या मानसिकतेत ही गर्दी असणार नाही हे जगभरच्या घटनांच्या निरीक्षणाने स्पष्ट होते हे सर्वच संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे!




 


 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com