आदिवासी विकास महामंडळाच्या भाताने भरलेल्या गोण्या खाजगी गोदामात
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील धक्कादायक प्रकार
भाताच्या तब्बल २०५ गोण्या व तांदूळ, कणी, गहूच्या 42 गोण्या, या धान्याचा साठाही सील
शहापूर
आदिवासी विकास महामंडळाच्या भाताने भरलेल्या छापील बारदानाच्या गोण्या खाजगी गोदामात आढळून आल्या. सरकारी धान्याचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहापुर तालुक्यात किन्हवली येथे समोर आला आहे. आदिवासी विकास महामंडळाचे संचालक मधुकर काटे यांनी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे एका खाजगी गोदमावर धाड टाकली असता भाताच्या तब्बल २०५ गोण्या व तांदूळ, कणी, गहू च्या 42 गोण्या या धान्याचा साठाही आढळून आला आहे. या गोदामाला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी डामसे यांनी सील ठोकले आहे. याबाबत महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संबंधीत चौकशीवर संशय निर्माण झाला आहे.
गोदामातून या भाताच्या गोण्या अन्य ठिकाणी हलविण्यात आल्या असून तेथील गहू, तांदूळ हे धान्य खाजगी व्यापाऱ्याचे की रेशन दुकानातील आहे. याचा उलगडा होण्याकरीता धान्याचे नमुने महसूल पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार चौधरी यांनी तपासणीकरिता पाठविले आहे. पुढिल कार्यवाही होईपर्यंत सील केलेले गोडाऊन जैसे थे राहील असे आदेश देण्यात आले आहेत. परंतू सदरचा मुद्देमाल गहु, तांदूळ पूरवठा विभागाचा की अन्य कुठला हे गुलदस्त्यातच राहिल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात चौकशीचे कारण पुढे करून कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून बारदानाची खरेदी केली जाते. हे बारदान महामंडळाच्या गोदामात उपलब्ध असणे आवश्यक असताना भाताने भरलेले बारदान तालुक्यातील किन्हवली येथील शांताराम सासे यांच्या गोदामात आढळून आले आहेत. याची माहिती मिळताच आदिवासी विकास महामंडळाचे संचालक मधुकर काटे यांनी या गोदामावर धाड टाकली. त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोदामातील छापील बारदानात भरलेल्या भाताच्या तब्बल २०५ गोण्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तेथून हलविल्या आहेत. मात्र शहापुरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांनी चौकशीचे कारण पुढे करून माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे खाजगी गोदामात आढळून आलेल्या बेकायदेशीर बारदान प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
वस्तुतः धाड टाकल्यानंतर गोदामात तांदूळ, गहू हे धान्य आढळून आल्याने महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक रात्री उशिरा संपर्क साधण्यात आला. रात्री साडेनऊच्या सुमारास मंडळ अधिकारी शंकर डामसे यांनी गोदामातील धान्याच्या गोण्यांची मोजणी करून गोदामाला सील ठोकले आहे. याबाबत महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी देवाजी चौधरी यांनी गोदामातील धान्याची पडताळणी करण्यात आल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल असे सांगून गोदामाला पुन्हा सील ठोकले आहे.
0 टिप्पण्या