Trending

6/recent/ticker-posts

खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे ठामपा आयुक्तांचे आदेश

खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेशठाणे


जेष्ठ सनदी अधिकारी  विजय सिंघल यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेवून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केपर्यत शिथील करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या आस्थापना वगळून इतर सर्व खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.


       नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने महापालिका भवनात येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी टाळण्यासाठी मुख्यालय तसेच प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना अत्यावश्यक कामे वगळता प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील अनावश्यक गर्दी कमी होण्यासाठी महापालिकेत बाहेरून ट्रेन, बसने येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित न राहता आवश्यकतेनुसार घरातूनच काम करावे असे सांगतानाच महापालिका कार्यालयातील तातडीचे कामकाज चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून दररोज ५० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.


       सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले निवासी पत्ते, ईमेल आयडी, मोबाइल आणि निवास दूरध्वनी क्रमांक आपापल्या विभाग कार्यालयांना उपलब्ध करुन द्यावेत. तसेच, संपर्क पत्यावर ते उपलब्ध राहतील याची प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यास त्यांनी त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहणार आहे. त्याचबरोबर परिवहन सेवेच्या बसमधून प्रवासी वाहतूक करताना उभे राहून प्रवास करणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. उभे राहून प्रवास करण्यास  मज्जाव करणे तसेच प्रत्येक बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी बसेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.


     कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने कासारवडवली येथे निर्माण केलेल्या 40 खाटांच्या अलगीकरण कक्षासह दाखल होणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध आवश्यक सोयीसुविधाचाही त्यांनी आढावा घेतला. महापालिका क्षेत्रात ‛कोरोना' व्हायरसचा संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागासह सर्व विभागास दिले. यावेळी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. 


Post a Comment

0 Comments