डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संधीसाधूपणे वापरणाऱ्याना खुले आव्हान......
" कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही, यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही.
-- डॉ बाबासाहेब आंबेडकर ...
25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान संमत करताना अर्थात स्विकार करतानाच्या पूर्व संध्येला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी , संविधान सभेत केलेल्या महान भाषणाच्या शेवटच्या परिच्छेदातील सर्व भारतीयांना केलेलं आवाहन. याच आवाहनाचा बेमालूम वापर, दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवतांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू- मुस्लिमांसह सर्व भारतीयांच्या एकतेविषयी मांडलेला हा विचार भागवतांनी सर्व माध्यमांवर मांडायाला सुरूवात केली. सरसंघचालकाने मांडलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचारसर्व स्तरात पोहचेल हि काळजी माध्यमांनी घेतली.इमाने-ईतबारे दिलेली जबाबदारी पार पाडून भागवतांच्या भाषणातील हा मुद्दा सर्वत्र प्रचारित करण्यात आला....
भागवतांच्या या भूमिकेने अनेकांना असं वाटलं की भागवतांना दिल्ली दंगलीचा पश्चातप झाला असावा. त्याचं पापक्षालन म्हणून भागवत दंगलीची जबाबदारी स्वतः वर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांशी प्रामाणिकता दाखवत असावेत. अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आम्ही खूप मानतो, त्यांच्या विचारांवर आमची अटळ श्रद्धा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न यामागे आहेच. पण वस्तुस्थिती या उलट आहे, त्यामुळे समजून न घेता फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणून आनंदाच्या डोहात बुडण्याची अजिबात गरज नाही. शेवटी डॉ आंबेडकरांच्या विचारांप्रमाणेच संघाला जावे लागेल असं म्हणून ऊर बडवून घेण्याच्या भ्रमात कुणी राहु नये. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचारां विरोधात आम्ही काम करतोय आणि भारताचं संविधान संपवून आम्ही यशस्वी होऊ. हाच हेतू वरिल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगण्यामागे मोहन भागवतांचा आहे. पण त्याकरिता डॉ आंबेडकरांचं मूळ भाषण पूर्णपणे खोलात जाऊन वाचावे लागेल. त्याशिवाय भागवत हे सोयी प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समाजात मांडतात आणि त्या विचारांना नष्ट करणारा कार्यक्रम चालवितात हे कळणार नाही. त्यांच्या समर्थनामागे, असहमतीचा विध्वंसक विचार आहे हे 25 नोव्हेंबर 1949 चं संविधान सभेतील भाषण वाचल्यावर लक्षात येईल. काय आहे या महान वैचारिक भाषणाचा सारांश ? संविधान सभेतील तत्कालीन सर्व सभासद जीव कानात ओतून का ऐकत होते? सभागृहात ना गोंधळ ना सभागृहा बाहेर या भाषणावर टिका. 17 डिसेंबर 1946 ला अवघ्या 10 मिनिटाचं पहिलं संविधान सभेतलं भाषण व 25 नोव्हेंबर 1949 ला 55 मिनिटांचं अंतिम संविधान सभेतलं भाषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मनामनात जात- धर्म -पंथ, लिंग भेद व सिमाविखंडीत देशाला दिशादर्शन करून एकतेच्या वाटेवरा आणणाऱ्या या दोन भाषणातील 2 वर्षे 11महिने 17 दिवसांचा कालावधी म्हणजे आपलं संविधान होय. अर्थात अजून 19 भाषणे त्यांनी या दरम्यान दिली तर 27 भाषणे कायदेतज्ञ म्हणून व 8 भाषणे केवळ कायदयावर अशी 56 भाषणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. हि भाषणे म्हणजे भारताचा जगाला आकर्षित करणारा व दिशा देणारा ऐतिहासिक दस्ताऐवाजच!.. पण दरिद्री मानसिकता व कपाळ करंटेंना याचं काहीच महत्त्व वाटत नाही. बरं यातल्या केवळ दोन भाषणांचा उल्लेख करून, दोन्ही भाषणातल्या शेवटच्या परिच्छेदाचा वापर भागवतांनी केलाय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या या विचारांच्या मागचा व पुढचा आशय मांडणं भागवतांनी टाळलंय. कारण मागचा व पुढचा आशय मांडला तर rss ची निर्मिती हा आजच्या संविधानिक देशाचा मोठा धोका ठरतो म्हणून हेतूपुरस्सर टाळण्यात आलंय.वास्तविक दोन्ही भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदू- मुस्लिमांसह सर्व धर्मिय घटकांची एकता कशी होईल यावर मांडणी करतात. त्यांच्या संसदेतील पहिल्या भाषणावेळी भारत-पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी होती. वेगवेगळ्या विचारधारा व धर्मियांच्या संघटना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या भाषणाचं शीर्षक
" अनूकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासुन परावृत करू शकणार नाही"" असा आहे.
या 10 मिनिटांच्या भाषणात डॉ आंबेडकर नवीन संविधान निर्मिती,, हिंदू-मुस्लिमांसह सर्व धर्मिय एकता व शेवटच्या परिच्छेदात बळाच्या वापरा विषयी भाष्य करतात. हिंदू- मुस्लिम समस्येला बळाचा वापर करून सोडविण्याला त्यांचा नकार होता. " बळाचा"वापर करून मुस्लिम समाजाला शरणागती पत्करायला लावण्यास डॉ आंबेडकरांना मान्य नव्हतं. सार्वभौम अधिकाराचा वापर शहाणपणाने करून, आपल्या आचरणाने देशातील सर्व घटकांना सोबत नेण्याच्या या मार्गाचा अवलंब करावा असं त्यांचं म्हणणं होतं. एकतेकडे जाण्याचा या शिवाय दुसरा मार्ग नाही असं डॉ बाबासाहेब आंबेडकर या भाषणाचा शेवट करताना म्हणतात.म्हणूनच मुस्लिमांसह सर्व समाज घटक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व त्यांनी दिलेलं संविधान हातात घेऊन न्याय मागत आहेत. त्यांनी कदाचित पूर्ण आंबेडकर वाचले नसतील पण त्यांना जाती- धर्माच्या पलिकडे जाऊन मानवी हक्कांची चिरकाळ सनद देणारे हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमचे " मसिहा "आहेत अशी बुद्धि अल्ला-येशू, देव, निसर्गाने आंदोलनकर्त्या न्याय मागणाऱ्यांना दिली असंच म्हणावे लागेल.
दिल्लीतील हल्ले हा बळाच्या वापराचा प्रकार असून तथाकथित सरकारच्या वतीने संवादाचा अभाव ठेवून हिंसक कारवायांना बळ दिलं गेलं. लोकशाही मार्गाचा अवलंब करून, सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यांक विरोधात बहुसंख्यांकांनी विरोध करणं हि कृती संविधानाची प्रतारणा करणारी तर आहेच पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणात दिलेल्या धोक्याच्या भाकीताचं वर्तमानात घडलेलं वास्तववादी रूप आहे.त्यामुळेच भागवतांनी मागचा- पुढचा आशय न मांडता,त्यांच्या प्रतिक्रांतीला पुरक वाटणारा विचार मांडुन संभ्रम निर्माण करण्याचं संघीय तंत्र वापरलं.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या भाषणाचं शीर्षक-
"राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. "
या भाषणाच्या शेवटच्या परिच्छेदातून, मागचा- पुढचा आशय वगळून, मोहन भागवतांनी चलाखीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडला. या शिर्षकातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा प्रत्यय येतो. दुसरं आजचं संघ/ भाजपची वाटचाल या शीर्षका प्रमाणे चाललीय हे सांगायला कुठल्याही तत्त्ववेत्त्याची गरज नाही. संघ/ भाजप स्वतः ची तत्त्वप्रणाली देशापेक्षा मोठी मानतेय, संविधाना पेक्षा मोठी मानतेय म्हणून तर देशात अराजक परिस्थिती निर्माण झालीय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अंमला नंतरचे धोके,या भाषणात सांगितलेले. संविधाना समोरचे हेच धोके संघ/ भाजपमुळे वाढलेत. या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानमय वाटचालीचे सुतोवाच केलेले. संविधानावर होत आसलेल्या टिकेवर, अमेरिका, कॕनडा, अॉस्ट्रेलिया या देशांच्या संविधानाचे विश्लेषण करून आपले संविधान कसे गुणात्मक योग्य असल्याचे तत्कालीन बुद्धिमान सभागृहास पटवून दिले. भारतीयांनी मिळविलेलं स्वातंत्र्य आणि स्विकारलेली गणतंत्र पद्धती या विषयी मतप्रदर्शन करून,पुन्हा आक्रमणाने व जनतेच्या उदासिनतेने नष्ट होऊ नये याकरिता अस्वस्थता दर्शविली. जनतेने मिळविलेलं स्वातंत्र्य पुन्हा घालवू नये म्हणून रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यत आपल्या स्वातंत्र्याच्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. राजकीय जीवनात समता राहिल परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहिल हे त्यांनी मांडलेलं मत आजही खरंच ठरतंय.भाजप सरकारच्या काळात ते अधिक गडद झालंय. बंधूत्वाच्या समान भावने विषयी त्यांचं भाकीत आज दिल्ली हिंसाचाराने प्रत्ययास आलंय. हा देश जो पर्यत जातीचं अस्तित्व संपुष्टात आणणार नाही तो पर्यत हा देश "राष्ट्र "म्हणता येणार नाही."हि भूमिका डॉ आंबेडकरांनी मांडलेली. हिंदू राष्ट्राचा" उदघोष करणाऱ्या rss संघटनेच्या प्रमुखांनी किती जाती- भेद निर्मूलनाचं काम केलं. चातुर्वर्ण व्यवस्था संपुष्टात आणण्याकरिता कोणता कार्यक्रम राबविला. याउलट गोळवळकरांची संविधान विरोधी विचारधारा पोसणारा त्यांचा कार्यक्रम आहे.
जॉन स्टुअर्ट मिल व डॕनियल ओ" कॉनेल यांनी लोकशाही संवर्धना करिता सांगितलेल्या व्यक्ती व भक्ती पुजेला तिलांजली दिली तरच लोकशाहीची वृद्धि होते अन्यथा लोकशाहीचा डोलरा कोसळतो हे विवेचनही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणात केलेलं. राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती पुजा अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लोकशाही टिकवून उत्तरोत्तर लोकशाहीचा विकास होण्याकरिता मांडलेल्या विचारांच्या विरोधात संघ/ भाजपचं काम अव्याहतपणे चालू आहे. लोकशाही मूल्यांचा वापर करून, हुकूमशाही प्रस्थापित करणारं अंतिम उद्दिष्ट संघ/ भाजपचं असल्याने उपरोधिकपणे मोहन भागवतांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडलेत. दिल्लीत झालेल्या हल्ल्या बाबत हळहळ व्यक्त न करता, चिथावणीखोर भाषा वापरून रक्तपात घडविणाऱ्यां हल्लेखोरांवर कारवाईचं कोणतंही वक्तव्य भागवतांनी केलेलं नाही. देशात दशका नू दशके जे वाईट घडवलं गेलं आणि आज जे दिल्लीत घडवलं जातंय. त्याचा दोष जर आपला असेल तर त्यावर कारवाई व्हायला नको का? इंग्रज, ट्रंम्प अथवा कुणीही बाहेरचं या विषयी हस्तक्षेप करणार नाही हि खात्री बाळगून , वाईट करणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहीत करत राहयचं ? गगनचुंबी इमारती, महल व झोपडपट्टया यां मध्ये तुम्ही भिंती उभ्या करणार असाल तर ट्रंम्पसारख्या बाहेरच्यांना भारतात येऊनही काहीच दिसणार नाही. तेव्हा मोहन भागवतांची भूमिका दांभिकतेची असून गर्वाचा दर्प त्यात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संधीसाधूपणे वापरणाऱ्या मोहन भागवतांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी माझ्याशी चर्चेला बसावं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार समाजा समोर मांडता ते संपविण्याचं कटकारस्थान, नियोजनबद्ध कार्यक्रम त्या मागे तुमचा असतो हे मी सिद्ध करून दाखवेन....
--- विशाल हिवाळे
( संविधान प्रचारक व अभ्यासक)
9022488113
0 टिप्पण्या