88 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचे सर्वत्र कौतूक
मुंबई,
गेट वे ऑफ इंडिया इथून अलिबागला जाणाऱ्या बोटीला मोठा अपघात झाला. या बोटीतून 88 प्रवासी प्रवास करत होते. मांडव्याला जाताना अचानक जेडीच्या काहीअंतर आधी ही बोट बुडायला लागली. मच्छीमार आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे या बोटीतील प्रवाशांचा जीव वाचला आहे. सद् गुरु कृपा बोट बुडत असताना मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान दाखवत बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. देवदूत पोलीस आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असंही प्रवाशांनी म्हटलं आहे.
मुंबईतील गेटवरून शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास सुटलेल्या बोटीला अपघात झाला आहे.ही बोट मांडवाजवळ बुडायला लागल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बोटीमधून 88प्रवासी प्रवास करत होते.सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस कर्मचारी आणि कोस्टगार्डच्या मदतीनं सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.ही दुर्घटना इतकी भीषण होती की बोट बुडायला लागली होती. एका बाजुला झुकलेल्या बोटीत पाणी घुसल्यानं प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली होती.ही बोट मुंबईहून अलिबागला सकाळी 9 वाजता निघाली होती. मात्र अचानक मांडव्याच्या दिशेनं निघालेली असतानाच बोटीला अपघात झाला.सुरुवातील तिथल्या काही मच्छमारांना या बोटीवर काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी तातडीनं धाव घेत बोटीवरील प्रवाशांना धीर देऊन सुखरुप बाहेर काढलं आहे. बोटीचा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे. मात्र मच्छीमार आणि पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडू शकला असता.
मांडवा (अलिबाग) जवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटींतील महिला व बालकांसह 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील जवानांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. या जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि त्यासाठीच्या प्रसंगावधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षा दलाच्या या कार्यक्षमतेला दाद दिली आहे.
0 टिप्पण्या