Top Post Ad

छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विरोधक ?

होय मी मर्द मराठा शिवाजी राजेंचा मावळा आहे. 
मला सार्थ आभिमान आहे या मातीत जन्मल्याचा .

ज्यांनी राजांना आयुष्यभर विरोध केला त्याच पंथातील काही विकृत कथित लेखकांनी (इतिहासकार म्हणण्याची त्यांची पात्रता नाही) महाराजांना सदैव मुस्लिमविरोधी असल्याचे भासवून त्यांचे चरित्र संकुचित आणि मलीन करण्याचा पर्यत् कित्येक शतकापासून चालविला आहे. मात्र बहुजन समाज जागा झाला असून त्याच्या भुलथापांना बळी पडणार नाही .उलट त्यांचे भ्याड कृत्याचा पर्दाफाश  केल्याशिवाय राहणार नाही. 

शिवाजी राजांचे खरे विरोधक कोण?

मुस्लिमांना शिवाजी राजांचे एकमेव आणि सर्वात मोठे शत्रू म्हणून सादर केले जाते. शिवाजी राजांच्या चरित्राला असा रंग दिला जातो की ‘मुस्लिमद्वेष’ त्यांच्या चारित्र्याच्या केंद्रस्थानी जाऊन बसतो. शिवाजी राजांच्या स्वराज्याचा मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणून मुस्लिमांना सादर केले जाते. परंतु आपल्याला इतिहासात याउलट चित्र पहावयास भेटते.

शिवाजी राजांना मुस्लिम शासकांपेक्षा घरच्यांचाच जास्त विरोध होता. मुस्लिम शासकांचा विरोध सत्तासंघर्षामुळे होणारा विरोध होता. परंतु शिवाजी राजांना होणारा स्वकीयांचा विरोध हा द्वेष, मत्सर, ईर्षा, छळ आणि कपट यांमुळे होता. शिवाजी राजांना स्वकीयांच्या दगाबाजीचा सामना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत करावा लागला. प्रबोधनकार ठाकरे लिहितात, “महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महत्कार्यात विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी-गरुडाच्या काळजात घुसले, तितक्या तितक्या बाणांचा पिसारा स्वकीयांच्या पंखाचाच होता. दारच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीच्या अर्ध्याअधिक हिमतीचा होम करावा लागला.” [१]

रियासतकार सरदेसाई आपल्या ‘मराठी रियासत’ या ग्रंथात म्हणतात, “विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू-मुसलमानांतील युद्ध नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठे सरदार घराणीही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभपासून कमी-जास्त प्रमाणात शिवाजीच्या विरोधात होते.” [२]

आपल्या हितविरोधामुळेच शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, डबीर, मोरे, बादल सावंत, सुर्वे खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठे हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले आणि मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंदही विरोधी होते. आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव, राधोजी माने हेसुद्धा विरोधी होते. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर उत्तरेकडील हिंदू सरदार असणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे हे मराठे सरदार सुद्धा होते आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकराव भोसले, जिवाजीराव भोसले, परसोजीराजे भोसले ही भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची नात्याची होती. शाहिस्तेखानच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव हेही होते. ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची. पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेने लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप पुण्याच्या लालमहाला शेजारीच राहत. स्वराज्याच्या छत्रछायेत राहूनसुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजीराजापेक्षा शाहिस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय, असे हे हिंदू. अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा. [३]

चंद्रराव मोरे आणि बाजी घोरपडे हे शिवाजी राजांचे शत्रू होते. जावळीचा चंद्रराव मोरे तर शिवाजी राजांची उपेक्षा करायचा. असली राजे तर आम्ही आहोत म्हणून शिवाजी राजांना हीन लेखायचा. शिवाजी राजांनी त्याला आणि त्याच्या खानदानाला मृत्युच्या तोंडी देऊन जावळीवर विजय प्राप्त केला होता. विजापूर सत्तेचा आश्रित सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसलेच्या विरोधात देखील शिवाजी राजांनी तलवार उचलली होती. इतकेच काय तर पोटचा पुत्र संभाजी शत्रूला जाऊन मिळाला असल्याची बातमी मिळाली असता त्यालाही ठार करण्याचा आदेश शिवाजी राजांनी दिला होता. [४] यावरून शिवाजी राजांना असणारा अंतर्गत विरोध वारंवार समोर येतो. शिवाजी राजांचे खरे शत्रू मुस्लिम शाह्यांत नव्हे तर स्वकीयांत दडून बसले होते.

औरंगजेबाच्या वतीने जेव्हा मिर्जा राजा जयसिंग शिवाजी राजांवर चाल करून आला तेव्हा शिवाजी राजे पराभूत व्हावेत म्हणून कोटीचंडी यज्ञ केले गेले. या यज्ञासाठी त्या काळी २ कोटी रुपये खर्च आला. चारशे पंडितांनी सलग तीन महिने या यज्ञासाठी अथक परिश्रम घेतले. या यज्ञात शिवाजी राजेंच्या पराभवासाठी देवतांना साकडे घालण्यात आले. प्रश्न निर्माण होतो की जेव्हा शिवाजी मुस्लिमविरोधक होते आणि मुस्लिम राज्य बुडवायला चालले होते तर मग स्वकीयांनी आपलाच माणूस पराभूत व्हावा म्हणून हे यज्ञ का केले? हिंदू धर्म पराभूत व्हावा अशी त्यांची इच्छा होती का? यज्ञ करण्याचे कारण स्पष्ट आहे. शिवाजी राजे मुस्लिम शाही बुडविण्यासाठी नव्हे तर स्वराज्य स्थापनेसाठी लढत होते. त्यांच्या मुस्लिम शासकांशी असलेला संघर्ष धार्मिक नव्हे तर राजकीय स्वरूपाचा होता.

प्राध्यापक नरहर कुरुंदकर म्हणतात, त्यांना आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती, तर त्यांच्या सोयरसंबंधातील माणसे होती. घोरपडे, निंबाळकर, जाधव, सावंत, सुर्वे असे अनेक वतनदार नेहमीच त्यांच्याविरुद्ध राहिले. [५] शिवाजी राजांचे राज्य आले तर आपली वतनदारी जाईल, या भीतीने अनेक रक्ताची माणसे शिवाजी राजांच्या विरोधात उठल्याचे दिसते.

#जय शिवाजी जय जिजाऊ.
जमीर काझी ,मुंबई

----------------------------------------
संदर्भ:
१.  ठाकरे प्रबोधनकार, दगलबाज शिवाजी, पृ.१७
२.  पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.३६-३७
३.  पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.३७-३८
४.  देशमुख मा. म., शिवशाही, पृ.५०
५.  कुरुंदकर नरहर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, पृ.१५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com