Top Post Ad

नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादीला बंडखोरीची धास्ती

नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादीला बंडखोरीची धास्ती



नवी मुंबई :
नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलमधील दुसऱ्या आठवडय़ात पार पडण्याची शक्यता आहे. ही निवडणूक राज्यातील भाजप आणि गणेश नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर दुसरीकडे ‘मविआ’नेही नवी मुंबई ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना केली आहे.  ‘मविआ’च्या नेत्यांनी जानेवारीत एक मनोमीलन मेळावा घेऊन रणशिंग फुकले होते. त्याला भाजपने राज्यस्तरीय परिषद घेऊन उत्तर दिले. पालिका निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागू झालेली नाही. तरीही ‘मविआ’ आणि भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रम उरकून घेतले जात आहेत.  त्याच वेळी शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. १११ प्रभागांतील एक हजार उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चित्र या पक्षात आहे. त्यामुळे बंडखोरीची लागण मोठय़ा प्रमाणात होणार हे स्पष्ट दिसून येत आहे.
 ऐरोली उपनगर हा शिवसेनेचा गड मानला जात आहे. ऐरोलीतूनच जाहीर बंडखोरीला सुरुवात झाली आहे. या गडातील एका सुभेदाराचे भाजपमधील नेत्यांशी बैठका सुरू आहेत. भाजप सरकारच्या काळात या नेत्याची भाजपच्या नेत्यांची ऊठबस वाढली होती. त्याचे बक्षीसही या नेत्याला मिळाले आहे. त्यामुळे एक पाय शिवसेनेत एक पाय भाजपमध्ये असे या नेत्याचे असल्याचे दिसून येते.  एम. के. मढवी यांचा शिवसेनेतील शिरकाव आणि नेत्यांशी जवळीक अनेक शिवसैनिकांना रुचलेली नाही. त्यामुळे अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जाण्याच्या स्थितीत आहेत. शिवसेनेच्या पदाचा रीतसर राजीनामा देणे सुरू झाले आहे.  शिवसेनेत या नेत्याला सध्या अडगळीत टाकण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही या नेत्याची बैठक होऊन पालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे ऐन मतदानाच्या आधी हा नेता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदल्यात त्याच्या सूनेला महापौर करण्याचा शब्द देण्यात आला आहे. नवी मुंबईच्या ऐरोली भागात अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी शेवटच्या क्षणात घडण्याची शक्यता असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी पक्ष नेतृत्व ‘एकला चलो रे’चे नारे देऊ लागले आहेत.
 शिवसेना आणि राष्ट्रवादीला जास्त प्रभागांची अपेक्षा आहे. ‘मविआ’ तुटण्यास हे कारण निमित्त होऊ शकते. नवी मुंबईत काँग्रेसला अधिक जागांसाठी हट्ट धरता येईल, अशी स्थिती आहे. सध्या काँग्रेसचे सात नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. नवी मुंबईत ‘मविआ’ विरुद्ध भाजप असा सामना झाला तर भाजपचे काही खरे नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या उलट भाजपच्या नेत्यांना ही ‘मविआ’ व्हावी असे वाटत आहे. यामुळे शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होऊन त्याचा फायदा भाजपला होणार आहे. मनसे भाजपकडे मोठय़ा आशेने नजर लावून आहे. भाजपने सोबत घेतले, तर चार-पाच जास्त जागा येतील अन्यथा एक वा दोन जागांवर या वेळी मनसे खाते खोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com