एका जुन्या नेत्याची........
मार्केटिंग न झालेली आठवण...
साधारण पंचेचाळीस वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला. ठाणे शहरात कळव्याला लागून असलेल्या एका रस्त्यावरून लग्नाची वरात चालली होती. साध्यासुध्या कपड्यातल्या, कळकट-मळकट वस्तीतल्या लोकांची वरात होती ती. नवरा-नवरीही चालतच चालले होते. ढोलकीच्या तालात, आपल्याच नादात ती वरात चालली होती. मागून ठाण्यातल्या एका मोठ्या नेत्याची कार आली. वरातीतल्या लोकांनी त्या कारला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला. कार पुढे गेली. त्या नेत्याने आपल्या कारमधून त्या साध्यासुध्या कपड्यातल्या माणसांची ती वरात पाहिली. कारमध्ये त्या नेत्यासोबत असलेल्यांपैकी एकाने त्या नेत्याला म्हटलं, "साहेब, आपण छान कारमधून चाललोय...आणि हे नवरा-नवरी त्यांच्या आयुष्यातला इतका मंगल क्षण असताना चालत चालले आहेत!"
त्या नेत्याने हे शब्द ऐकले मात्र, पुढच्याच क्षणी आपली ती कार त्या नेत्याने वरातीच्या पुढे थांबवली. कारमधल्या आपल्यासोबतच्या माणसांना खाली उतरण्याचं फर्मान सोडलं...आणि ते त्या वरातीत घुसून नवरा-नवरीजवळ पोहोचले. ते ठाण्यातले प्रसिध्द नेते असल्यामुळे त्यांना न ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी त्या नवरा-नवरीला आपल्या कारमध्ये बसायला सांगितलं. ते नवरा-नवरी ओशाळतच कारमध्ये बसले. त्या नेत्याने वरातीतल्या माणसांना त्यांचे थांबलेले ढोल-ताशे वाजवायला सांगितले...आणि आपली गाडी स्वतः ड्राईव्ह करत त्यांच्या वागळे इस्टेटकडल्या घरापर्यंत नेली. तेव्हा त्या नेत्याचं मोठं नाव होतं. त्यामुळे त्यांना इतरही कामं असण्याची शक्यता होती. पण ती सगळी कामं बाजूला ठेवून ते आपल्या शहरातल्या एका गोरगरीब माणसाच्या वरातीत नुसते सामीलच झाले नाहीत तर ते त्या वरातीचे सारथी झाले. त्यांचे दीड-दोन तास त्यात गेले, पण एका गोरगरीबाच्या लग्नाचा लाखमोलाचा आनंद त्यांनी घेतला.
...ते नेते होते ठाण्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष मारोतराव शिंदे. गाडग्यामडक्याचा संसार करणा-या लोकांच्या अनोळखी वरातीत सारथ्य करणारा मारोतराव शिंदेंसारखा नेता नक्कीच दुर्मिळ.
रूग्णवाहिकेचे ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पाहून, तीव्र प्रसववेदना होणा-या गरोदर महिलेला स्वतः ड्रायव्हिंग करून रुग्णालयात नेल्याचीही आठवण ठाण्यातले लोक मारोतराव शिंदेंबद्दल सांगतात. शहरातल्या लोकांच्या सुखात आणि दुःखात असं जातीने सामील होणा-या मारोतराव शिंदेंचा तो काळ खरंच निराळा होता. बॅनर-फ्लेक्स लावण्याचा नव्हता. मार्केटिंगचा तर अजिबातच नव्हता. आजही त्यांच्या ह्या आठवणींचं मार्केटिंग करण्याचा उद्देश असण्याचं कारण नाही. मारोतराव शिंदे नावाचा नेता हा आतून मनस्वी माणूस कसा होता इतकंच फक्त हे सांगण्यामागचा उद्देश आहे, बस्!
0 टिप्पण्या