संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे हरिग्राम रस्त्याची दुरुस्ती
पनवेल:
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करताना ठेकेदाराने नियम खुंटीला टांगल्याने अवघ्या चार-पाच महिन्यात रस्त्याला भेगा पडल्या. कामाच्या सुमार दर्जाबाबत पनवेल संघर्ष समितीने सपाटा लावून त्या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. रस्ता दुरुस्तीकरणामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रायगड जिल्हा नियोजन समितीने सुशिक्षित बेरोजगार अभियंता योजनेद्वारे अलिबाग-पोयनाड येथील ठेकेदाराला पनवेल तालुक्यातील हरिग्राम गावाच्या रस्त्याच्या काही भागाच्या कॉंक्रिटीकरणाचे तब्बल 17 लाखाचे काम दिले होते. त्या ठेकेदाराने ते काम येथील एका स्थानिक ठेकेदाराला करण्यास सांगितले. त्यांनी ते कॉंक्रिटीकरण केलेही. जिल्हा परिषद बांधकाम खात्याने थोडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तो झाला. नव्या कोऱ्या रस्त्याला काही दिवसात मोठ्या भेगा पडल्या. काही ठिकाणी रस्ता खचलाही.याबाबत हरिग्राम गावातील भोळेश्वर म्हात्रे यांनी याविरोधात आवाज उठवला. पंचायत समितीमधील जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना हे निदर्शनास आणून दिले. मात्र कुणीही दाद दिली नाही. कारण ठेकेदारासोबतअसलेले अर्थपूर्ण व्यवहार.
अखेर त्यांनी काही दिवसांपूर्वी पनवेल संघर्ष समितीला याबाबत सांगितले. समितीचे कांतिलाल कडू यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेताच ठेकेदाराने हरिग्राम रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. आता यामुळे दुचाकीस्वारांचा अपघाताचा धोका टळला आहे. रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे दुचाकीचे चाक अडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागत होते. इतर वाहनांचीही भयानक अवस्था झाली होती. रस्त्याच्या दुरूस्तीनंतर नागरिकांनी पनवेल संघर्ष समितीचे कांतीलाल कडू, भोळेश्वर म्हात्रे यांना धन्यवाद दिले.
0 टिप्पण्या