(प्रजासत्ताक जनता ) - 'तो'ही अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होता; पण सुटकेऐवजी थेट व्हॉईसरॉयला ठार केलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीषकुमार व अशा हजारो खऱ्या, सच्च्या, देशभक्त क्रांतिकारीपैकी एक होता तो... हा होता शेर अली आफ्रिदी! फेब्रुवारी 1872 मध्ये भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड मेयो अंदमान भेटीवर आला होता. गव्हर्नर जनरल उर्फ व्हाईसरॉय हा भारताचा ब्रिटीश काळात प्रमुख असायचा. म्हणजे आजच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानाला जेवढे अधिकार आहेत त्याहून ही जास्त अधिकार व्हाईसरॉयला असायचे. लॉर्ड मेयो हा अतिशय तरुण असताना या पदावर आला होता.
मेयोच्या काळात अनेक सुधारणा सुरु झाल्या होत्या. भारताची पहिली जनगणना त्यानेच करवून आणली. रेल्वेच जाळ पसरवल. मेयो कॉलेजची स्थापना केली. काही जलसिंचनाच्या योजना सुरु केल्या. याचा अर्थ तो आपला हितचिंतक होता असे नाही तर भारतातून जास्तीत जास्त कर, लुट, उद्योगासाठीचा कच्चा माल गोळा करून आपल्या मायदेशी कसा पाठवता येईल याचेच त्याचे प्रयत्न सुरु होते. असा हा व्हाईसरॉय लॉर्ड मेयो भारत दौऱ्यावर होता. त्यात अंदमानमधील जेल व तिथल्या कैद्यांची परिस्थिती पाहण्यासाठी पोर्ट ब्लेअरची भेट सुद्धा आखण्यात आली. सुरक्षिततेसाठी सोबत 12 बॉडीगार्ड होते. तरीही मेयोच्या पोटात चाकू खुपसला गेला. घाव वर्मी लागला. भारताचा व्हाईसरॉय त्याच्या कडक सिक्युरिटीमध्ये असताना काही क्षणात यमसदनी धाडला गेला होता आणि हे केलं होतं शेर अली आफ्रिदीने. या कृत्यानंतर पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न न करता तो तिथेच थांबून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं.
अटकेनंतर जेलच्या फोटोग्राफ्ररनां त्याने हसत हसत पोज दिली. ब्रिटीश सरकार हादरून गेले.
अंदमान मधल्या जेलमध्ये असलेले त्याचे सहकारी सांगत होते की, “शेर अली अफरीदी कहता था कि अंग्रेज देश से तभी भागेंगे जब उनके सबसे बड़े अधिकारी को मारा जाएगा और वायसराय ही सबसे बड़ा अधिकारी था। “ त्याने या घटनेच्या आदल्याच दिवशी आपल्या न्हाव्याच्या कामातून जो काही भत्ता जमा केलेला त्यातून मिठाई खरेदी करून अख्ख्या जेलमध्ये वाटलेली. शेर अली एकटाच होता आणि त्याने एकट्यानेच हे क्रांतीकार्य पार पाडले.एका महिन्यात त्याला फाशी झाली. काही वर्षांनी अशी घटना घडू नये म्हणून अंदमानात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असलेला नवा सेल्युलर जेल बांधण्यास सुरवात झाली. भारतात अनेक क्रांतिकारी होऊन गेले. प्रत्येकाचे उद्दिष्ट होते की आपल्या देशावर अन्याय करणाऱ्या ब्रिटीशांचा सर्वोच्च प्रतिनिधी असणाऱ्या व्हाईसरॉयला ठार करून इंग्लंडला हादरवून सोडायचे. पण कोणाला हे शक्य झाले नाही फक्त शेर अली आफ्रिदीला सोडून.
आपल्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी थेट व्हाईसरॉयला ठार मारणाऱ्या आणि त्यानंतर हसत हसत फाशीवर जाणाऱ्या पराक्रमी शेर अली आफ्रिदीच नाव इतिहासाच्या पानात कधी आढळत नाही किंवा अंदमान मध्ये त्याचे कोणतेही स्मारक नाही हे आपल्या देशाच दुर्दैव म्हटल पाहिजे.
0 टिप्पण्या