इंदुरीकर महाराजांना विरोध का
इंदुरीकर महाराजांना विरोध का तर फक्त ते महिलांविषयी बोलतात म्हणून नाही. अर्थात तोही मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नाहीच. पण महत्वाचा विषय हा की इंदुरीकर ज्या पद्धतीने कट्टर हिंदुत्वाचं, सनातनी विचारांचं स्लो पॉयझन समजात पसरवत आहेत त्याला आळा बसला पाहिजे. म्हणून थोडं लिहावं वाटलं. मी आतापर्यंत इंदुरीकरांचे प्रकाशित झालेले जवळपास सर्वच किर्तनं ऐकलेत. तेही खूप बारकाईने. त्यांच्यावर असलेला सनातनी विचारांचा असर (ज्याला ते वारकरी संप्रदयाचा म्हणतात) ठळक दिसून येतो. ते त्याला वारकरी संप्रदायाचा विचार म्हणत असले तरी मूळ वारकरी संप्रदाय हा सनातनी विचारांनी हायजॅक केला आहे हे आतपर्यंतच्या बऱ्याच किर्तनकारांच्या आणि नवीन वारकरी मंडळींच्या विचारसरणीतून लक्षात येतं.
एका किर्तनात इंदुरीकर महाराज म्हणतात, "तुकाराम महाराज विमानात बसून वैकुंठाला गेले. काही शहाणे म्हणतात त्यांचा खून झाला. मला असं म्हणायचं आहे. तुकाराम आमचा बाप आहे. आमचं आम्ही पाहून घेऊ खून झाला की काय झालं. तुम्हाला आमच्यात लुडबुड करायची काय गरज आहे? या जास्त शिकलेल्या औलादींनी धर्म बुडवला महाराज. हे स्वतः काही करत नाही न दुसऱ्यालाही करून देत नाहीत." आता ज्या पद्धतीने इंदुरीकर तुकाराम महाराजांच्या मृत्यूबद्दल संभ्रम निर्माण करतात, ती हुबेहूब संघाची आणि सनातनवल्यांची खेळी आहे. आशा अनेक भोंदू धर्मग्रंथांचं उदाहरण देऊन ते हसता हसता स्लो पॉयझनचा डोस पाजून देतात. तो कळत नाही पण परिणामकारक नक्कीच आहे. आशाच एका कीर्तनात ते दावणीला पांढऱ्या रंगाचं जनावर असू नये वगैरे अशा काही यशस्वी होण्याच्या युक्त्या सांगतात. ते स्वतः बीएस्सी झालेले असतानाही त्यांच्यावर या पौराणिक पाखंडांचा पगडा आहे, हे लक्षण डोक्यात कट्टर सनातनी विचार रुजल्याचं आहे. त्यांच्या व्हायरल फोटोवरून कळतंय की त्यांच्या स्वतःच्या दावणीला पांढऱ्या रंगाची जनावरं आहेत. पण त्या कट्टर धार्मिक विचारांची एकदा लागण झाली की माणूस सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकतो. त्यांच्या कीर्तनातून कधीच महात्मा फुले, आंबेडकर, शाहू मात्र महाराज यांचं उदाहरण दिलं जात नाही. शिवाजी महाराजांचं उदाहरण देण्यामागेही त्यांना हिंदुत्ववाद्यांच्या पंक्तीत बसवण्याचा उद्देश आहे, हे स्पष्ट जाणवतं.
इंदुरीकर हे आर्थिक, सामाजिक, आणि वैचारिक प्रगती थांबलेल्या कृषक समाजाचं प्रतिनिधित्व करतात. हा कुणबी (ओबीसी आणि मराठा) समाज वैचारिक मागासलेपणात सध्या सर्वात पुढे आहे. एकेकाळी या समजाच्या वर असलेला ब्राह्मण समाज वैयक्तिक जीवनात सर्व सामाजिक बदल स्वीकारून आधुनिक झाला आहे. तर यांनी खालचा समजलेला दलित समाज या सगळ्यांतून वेगळी वाट काढत नेटाने एका नवीन सामाजिक स्थित्यंतर घडवून आणतोय. पण हा कुणबी (ओबीसी-मराठा) समाज या दोघांच्या तुलनेत जुन्या कालबाह्य झालेल्या आणि दांभिक रूढी परंपरा अभिमानाने कवटाळून बसला आहे. सनातनी आणि मनुवाद्यांसाठी हा समाज सोपी शिकार ठरला. त्यासाठी त्यांनी वारकरी संप्रदायाचा आधार घेतला आणि इंदुरीकरसारख्यांच्या माध्यमातून ते अंमलबजावणी करतात. उदा. खानदान तपासणे, संस्कृती, धर्म, स्त्रीचं स्थान, प्रत्येक गावात सप्ताह करा इत्यादी बाबींचा त्यांच्या कीर्तनात हळूच होणारा या उल्लेख हे त्याचं प्रतीक आहे. त्याला जोडून मग काहीतरी दारू पिऊ नये, नाचू नये, आईवडिलांचा सांभाळ, कार्यकर्ता होऊ नये, जमीन विकू नये या बेसिक गोष्टी सांगतात. ज्या की त्यांनी सांगितल्या आणि नाही सांगितल्या तरी फरक पडत नसतो. त्यांच्या समर्थकांसाठी हा उपदेश महत्वाचा वाटतोय. यावरून त्यांच्या घरात, शाळेत आणि आजूबाजूच्या वातावरणात या मूल्यशिक्षणाचा अभाव असल्याचं दिसून येतं. उद्या तुमच्या सगळ्यांचे चोरी, खून, बलात्कार वगैरे करू नका, हे सांगण्यासाठीसुद्धा विशेष वर्ग घ्यावे लागतील असं दिसतंय. अन्यथा तुम्ही घातक आहात.
इंदुरीकर 2000 सालापासून सतत कीर्तन करत असल्याचं सांगतात. सतत आणि दररोज तीन. मग प्रश्न हा आहे की हा माणूस वाचन, चिंतन, मनन, सामाजिक अभ्यास हे केव्हा करत असेल? कोणत्याही वक्त्याला बोलण्याआधी या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं. त्याबाबतीत इंदुरीकर बिलकुल उदासीन दिसतात. पोथी, गाथा, धर्मग्रंथ यापलीकडे त्यांचा काही साहित्याशी संबंध आल्याचं जाणवत नाही. जोरदार विनोदबुद्धीच्या (विवादित) जोरावर त्यांचा खेळ सुरू आहे. धार्मिक आणि मागास रुढीवादी परंपरांनी बुरसटलेल्या ओबीसी आणि मराठा समाजाला आर्थिक आणि सामजिकदृष्ट्या पुढारलेला समाज दुरून वाकुल्या दाखवतो.मग त्या समाजाची बरोबरी करण्यात अपयशी झालेल्या या कुणबी ( मराठा-ओबीसी) समजाला त्यांच्याच बुरसटलेल्या परंपरांमध्ये ऑर्गझम शोधून देण्याचं काम इंदुरीकर करतात. म्हणून ते लोकांना प्रिय आहेत.
इंदुरीकर जेव्हा तुकारामांच्या वैकुंठगमनाच्या भम्पक कथेचं समर्थन करतात तेव्हा ते आक्रमकपणे आधुनिक पुरोगामी विचारांच्या लोकांवर हल्ला चढवतात. पुरोगामी किंवा विज्ञानवादी विचारांचं वावडं असणारा व्यक्ती नकळत सनातनची बाधा झालेला असतो. हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी विदेशी शक्ती या पुरोगाम्यांना वाढीस लावत आहेत हा यांचा शेवटचा प्रतिवादही ठरलेला आहे. अफाट विनोदबुद्धीला तर्कसंगत, विज्ञानवादी, आधुनिक विचारांची जोड देऊन कीर्तनं केली तर नक्कीच इंदुरीकर हे संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज या आधुनिक संतांच्या पंक्तीत बसण्याचं भाग्य कमावू शकतात. आणि त्यांना डोक्यावर घेणाऱ्या समाजाला आज तेच देणं अपेक्षित आहे. दुर्दैवाने इंदुरीकर त्यांच्या क्षमतेचा चुकीच्या पध्दतीने वापर करतायेत. शेवटी एव्हढंच म्हणता येईल की इंदुरीकर यांनी थोडा ब्रेक घेऊन निदान महात्मा फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शाहू महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज आणि त्या तोडीचे सर्व समाजसुधारक एकदा वाचून काढावेत. त्यानंतर जे नवीन इंदुरीकर महाराज असतील ते ग्रामीण, कुणबी नव्हे संपूर्ण मराठी माणसाला बदलवून टाकणारा चेहरा असेल. अन्यथा समाज कीर्तनाकडे वळण्याएवजी इतर गोष्टीत कामाशी काम करत राहिला तर ते बरं राहील. कारण जे कामाचं आहे ते स्वीकारावं अन जे नाही ते सोडून द्यावं हा नियम अल्पशिक्षित मॉबपुढे लागू होत नाही. व्हायरस ही नकळत सेव्ह होणारी बाब आहे. त्यावर लक्ष ठेवणं हे जागरूक आणि सुशिक्षित समाजाचं कर्तव्य आहे.
Somnath Kannar
0 टिप्पण्या