न्यायालयाचा आदर ठेऊन सदानंद महाराज आश्रमाला सहकार्य करू - वन विभाग मंत्री संजय राठोड
ठाणे
वसई तालुक्यात तुंगारेश्वर डोंगरावर बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. सन १९७१ सालापासून श्री सदानंद महाराज या डोंगरावर वास्तव्य करीत असून पालघर व ठाणे जिल्ह्यात त्यांचे हजारो भक्त आहेत. या आश्रमाची जमीन आश्रमाच्या नावावर अधिकृतपणे करण्याची भक्तांची मागणी आजवर प्रलंबित आहे. याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याचे वन विभागाचे मंत्री संजय डी.राठोड यांनी आश्रमाची सर्व माहिती आधी जाणून घेतली. सदानंद महाराज आश्रमाच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गेल्यावर्षी एक आदेश दिला होता. एकूणच न्यायालयाने दिलेला आदेश व न्यायालयाचा आदर ठेऊन व विधी विभागाचा कायदेविषयक सल्ला घेऊन त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने आश्रमाला जे सहकार्य करता येईल ते करू. त्यासाठी राज्य शासनाच्या विधी विभागाचे अभिप्राय घेऊ , आश्रमाला आवश्यक ते सहकार्य लवकर केले जाईल , असे वनमंत्र्यांनी सांगितले. आश्रम संस्था करीत असलेले कार्य व सदानंद महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे , असेही राठोड म्हणाले.
या तुंगारेश्वर डोंगरावर आश्रमाचे अस्तित्व १९७१ सालापासून आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आश्रमासाठी ६९ गुंठे जमीन १९८३ साली दिली होती. या ६९ गुंठे जागेचा ताबा , जागेचा नकाशा सर्वे करून आश्रमाला देण्यात आला होता. या आश्रमाला पारोळ ग्रामपंचायतीची घरपट्टीही लागली होती. गेल्यावर्षी आश्रम व येथील बांधकाम तोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. येथील काही बांधकाम तुटले. मात्र बाबांचा आश्रम व मंदिर कायम राहिले. येथील आश्रमाची ही ६९ गुंठे जमीन आश्रमाच्या नावावर अधिकृतपणे करण्यात यावी , अशी भक्तांची मागणी आहे. ही जमीन रीतसर अधिकृतपणे आश्रमाच्या नावावर करावी म्हणून वन विभागाकडे अनेक प्रस्ताव दिले. मात्र हे प्रस्ताव लालफितीत अडकून पडले असल्याने महाराजांच्या भक्तांची ही मागणी अद्यापही पुर्ण होऊ शकलेली नाही.
मंत्रालयात वन मंत्री संजय राठोड यांच्या दालनात तुंगारेश्वर डोंगरावरील बाल योगी श्री सदानंद महाराज आश्रम विषया संदर्भात झालेल्या बैठकीस वनविभागाचे प्रधान सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, आमदार शांताराम मोरे,आमदार बालाजी किणीकर ,पालघर जिल्हाधिकारी कैलाश शिंदे,वन अधिकारी अहमद अन्वर, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्ष नेता प्रविण पाटील,नगरसेवक राजू भोईर, तारा घरत , कमलेश भोईर उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती ठाकरे , आश्रम संस्थेचे गुरुनाथ भोईर , यशवंत वायले , चिंतामण माळी , मनीष दवे हेही उपस्थित होते. यावेळी आश्रमाच्या जमिनीचा मुद्दा काय आहे , त्याची पार्श्वभूमी काय आहे व हजारो भक्तांच्या भावना , आश्रमाचे सामाजिक - धार्मिक कार्य काय आहे याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्र्यांना दिली.
0 टिप्पण्या