Top Post Ad

ही लढाई आंबेडकर विरुध्द गोळवलकर- जितेंद्र आव्हाड 

एनआरसी आणि सीएएच्या विरोधात ठाण्यात मूक मोर्चा 



ठाणे-  
ठाणे शहरात कुल जमात तंजीम, ठाणे या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरु झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जीत करण्यात आला. या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे , राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते.
 मनुस्मृतीमधील जाती व्यवस्थेने पंच्यान्नव टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाण्याचा अधिकारच नाकारला. त्यांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करीत भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या कायद्यांच्या आडून मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून जाती भेदात बांधलेल्या समाजाला मुक्त केले. ज्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली; त्या दिवशी आमच्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. त्यामुळेच ही लढाई आंबेडकर विरुध्द गोळवलकर अशी आहे. गोळवलकर यांचे विचारधन पुस्तक हे भाजप आणि आरएसएसचा पाया असल्याने मोदी-शहा ही विचारधारा देशावर थोपवण्याच्या प्रयत्नात आहेत. आसाममध्ये नागरिकत्व कायद्यांतर्गत पकडलेल्या अठरा लाखापैकी चौदा लाख लोक तर हिंदू आहेत. या सर्व हिंदूंना मुक्त करण्याचे आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहोत. त्यांच्या सुटकेपर्यंत उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे; भागवतांनाही आम्ही तसे आव्हान देत आहोत, असे डॉ. आव्हाड म्हणाले.
 आम्ही हिंसेचे समर्थन करीत नाही. पण, उद्या काही लोक अफवा पसरवतील; पण, तुम्ही तुमचा सयंम ढळू देऊ नका.  त्यांनी मारलेल्या गोळ्या आपण छातीवर झेलू, त्यांनी मारलेले दगड हातात पकडू अन् त्या दगडांनीच त्यांच्या विचारधारेची कबर बांधू;  आज संविधानच धोक्यात असल्याने जय भिम चा नारा देऊन संघर्ष करावा लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच जितेंद्र आव्हाड उभा राहिला असल्याने भाजप सरकारच्या मुलभूत अधिकार नाकारण्याच्या धोरणाविरुध्द शेवटपर्यंत संघर्ष करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.  
यावेळी, बी. जी. कोळसे- पाटील यांनी, “ समतेच्या शोधात धर्मांतरे झाली आहेत. बुद्धानंतर समता शिकवणारा धर्म हा इस्लाम आहे, असे विवेकानंद यांनीच सांगितले आहे. मात्र, आंबेडकरवाद्यांच्या सोबत मुस्लीम न आल्यामुळेच क्रांती झाली नाही, असे सांगून  हा देश आमच्या बापाचा आहे. आम्ही सीएए आणि एनसीआर मानणार नाही, असे ठणकावले. तर, आनंद परांजपे यांनी, सीएए आणि एनसीआरच्या विरोधात लढण्याची शपथ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही कधीच सहन करणार नाही. हा केवळ संविधानावरील हल्ला नाही तर भारतावरील हल्ला आहे. अन् त्या विरोधात संघर्ष केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.  
संविधान बचाव महासभेला तिरंगी ध्वज घेऊन मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नोंदणी कायदा मुलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याने संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे आता जात, भेद, धर्म विसरुन जयभिम चा नारा देण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर जयभिमच्या घोषणांनी परिसर दणाणला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com