Top Post Ad

नागरिकता कायदा दुरुस्ती अंमलबजावणी रेटलीच तर कागज नही दिखाएंगे

ठाणे:    


भारतीय संविधानाने राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाची राजेशाही आणि संस्थानिकांची मनमानी संपवून देशातील जनतेला समान हक्क देत विषमतेतून मुक्तीची वाट दाखवली आहे. त्यामुळे संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रक्षणासाठी, युवा रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाने न्याय दिला तर ठीकच नाहीतर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार, नागरिकता दुरुस्ती कायदा हा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने, त्या विरुद्ध "कागज नहीं दिखाएंगे" हा सत्याग्रहही युवक करतील, असा खणखणीत इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला. गेले महिनाभर ठाण्यातील विविध लोकवस्त्यांत झालेल्या क्रांतीजोती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोपाच्या पंधराव्या पुष्पात, "संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क" या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ठाण्यातील विविध महाविद्यालयातील आणि संघटनातील युवकांनी गर्दी केली होती. या टॉक शोच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. 
            नागरिकतेसंदर्भांत झालेल्या चर्चेत हे युवा म्हणाले कि, देशात जो राहतो तो या देशाचा नागरिक. त्याच्याकडून नाहक पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी, आदीं साठी जिकिरीचे ठरू शकते. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही तर आपापापल्या जबाबदाऱ्या नेकीने पार पडणे, भ्रष्टाचार, अन्याय न करणे हे खरे भारतीयत्व आहे. इतका महत्वाचा नागरिकता कायदा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करतांना, त्यावर संसदेत आणि संसदे बाहेर साधक बाधक चर्चा होणे अत्यावश्यक होते. मात्र  घिसाडघाईने हा कायदा रेटल्यामुळे सरकारच्या हेतूंबाबत रास्त शंका निर्माण होते आहे. युवकांचे चांगले शिक्षण घेण्याचा, शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार मिळवण्याचा हक्क विद्यमान सरकारने डावलला असून त्याविरुद्ध युवक आंदोलित आहेत. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे , विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरुस्ती आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नागरिक नोंदणी (NCR) आणि जनसंख्या नोंदणी (NPR) हेही अनावश्यक असल्याचे मत आसामच्या विशिष्ट परिस्थितीचा दाखल देत युवकांनी मांडले. प्रथमेश्वर उंबरे, कपिल खंडागळे, जुही शहा, रिंकल भोईर, यश माडगावकर, सोनु गुप्ता, सर्वेश अकोलकर आणि नीरज आठवले या विद्यार्थी - युवकांनी टॉक शो मध्ये आपली मते मांडली.   
          देश स्वतंत्र झाला त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्टीत पाकिस्तानात जाण्यास नकार देऊन भारतीय मुसलमानांनी आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध केलेली आहे. सध्यस्थितीत, नागरिकता दुरुस्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनू न देणे ही हिंन्दू धर्मात जन्मलेल्या नागरिकांची जबाबदारी आहे, अशा शब्दात संजय मंगला गोपाळ यांनी उपस्थितांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. या कार्यक्रमात विषय तज्ज्ञ या नात्याने उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या तयारीने आणि तडफदार रीतीने केलेल्या मांडणीबद्दल सर्वांचे कौतुक केले. कायद्याने वागा चळवळीचे राज आसरोंडकर म्हणाले कि, देशात विविध धर्म जाती, बोली भाषा, वेगवगळ्या संस्कृती, प्रादेशिक वैविध्यातून देश घडला आहे. संविधानाने देशातील सर्वाना एका सूत्रात बांधले आहे. संविधानाने जसे धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे तसेच विवेकवादी बनण्याची दिशाही अधोरेखित केली आहे. संविधान, नागरिकता आदी मुद्द्यांवर संवाद प्रक्रीया सुरु ठेवूया. प्रत्येकाला स्वत:चे मत असायला हवे. त्या बरोबरच दुसऱ्यांचे मत ऐकण्याचे सामर्थ्यही असायला पाहिजे. आपले मत दुरुस्त करण्याची तयारी देखील असली पाहिजे. या टॉक शोमुळे ही मूल्येही रुजवली गेली आहेत. 
प्रसिद्ध लेखक आणि संविधान अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, संविधान हा एक संकल्प आहे. एका लांब प्रक्रियेतून संविधानाची निर्मीती झाली आहे. वंशपरंपरेने नाही तर लोकानी निवडून दिलेल्या ३९९ संविधान सभेतील प्रतिनिधींनी देशभरातील विविधता लक्षात घेऊन हजारो सुचनांच्या माध्यमातून प्रदीर्घ चर्चा आणि वाद यातून संविधान निर्माण झाले आहे. हा देश भारतीयांचा आहे, इथल्या सर्व धर्मीय माणसांचा आहे. नागरिकता कायद्यातील दुरुस्ती (CAA) हे तत्व म्हणून संविधानाच्या भूमिकेविरोधी आहे. त्याविरुद्ध मत मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य संविधानानेच दिलेले आहे. 
प्रसिद्ध लघुपटकार डॉ. संतोष पाठारे म्हणाले की, विद्यार्थ्यानी या प्रश्नावर पालकांशी संवाद साधला पाहिजे. युवकांच्या जडणघडणीसाठी "एक ओपिनियन फोरम " बनवावा असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
           कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, प्रा. वृषाली विनायक, उत्तम जोगदंड, उन्मेष बागवे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेजल सावंत या युवतीने केले तर शेवटी उपस्थितांनी सुशांत जगताप या युवकाच्या मागे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक हर्षलता कदम, सह संयोजक सुनील दिवेकर, लतिका सु. मो., अजय भोसले, आणि कार्यकर्ते दुर्गा माळी, प्रणव त्रिवेदी, नेहाली जैन आदींनी विशेष मेहनत घेतली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com