सहा महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवत एका महिलेने तब्बल ३३.५५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विरारच्या बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरदेखील सबंधित महिलेवर गुन्हा नोंद करण्याऐवजी पोलिसांनी पीडित व्यक्तीलाच चौकशीसाठी नोटीस बजावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. फसवणूक करणाऱ्या महिलेवर तातडीने कारवाई करून बुडवलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी पोलिसांकडे केली आहे. राजेंद्र महादेव सावंत (रा. फ्लॅट क्र. ६०२, अचेनिक्स बिल्डिंग क्र. २३, लक्ष्मी हाऊसिंग, मॅक्स मॉलजवळ, विरार-पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांची ओळख सुमारे सहा वर्षांपूर्वी वैशाली दामणे या महिलेची झाली. त्या "लोनचे काम" करतात अशी ओळख देत त्यांनी सावंत यांचा विश्वास संपादन केला. पुढे त्यांनी एक "प्रोजेक्ट" असल्याचे सांगत एक कोटी रुपये गुंतवल्यास सहा महिन्यांत रक्कम डबल होईल असे आकर्षक आश्वासन दिले.
सावंत यांनी एकरकमी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर, वैशाली यांनी “इतर तीन–चार लोकांकडून पैसे गोळा करा” असा सल्ला दिला. या आधीही त्यांच्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते आणि पैसे परत मिळाले असल्याने सावंत यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार गोळा केलेली ३३.५५ लाखांची रक्कम सावंत यांनी वैशाली दामणे यांच्याकडे गुंतवणुकीसाठी दिली.मात्र गुंतवणुकीनंतरही वैशाली दामणे यांनी ठरलेली रक्कम परत केली नाही. नंतर त्यांनी सावंत यांना ३९ लाख ८१ हजार रुपये व नुकसानभरपाई म्हणून ७० हजार रुपये असे मिळून ४० लाख १५ हजार १६० रुपयांचे धनादेश दिले. मात्र हे सर्व धनादेश बाऊन्स झाले, असे पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद आहे.मात्र तक्रारदार राजेंद्र सावंत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरदेखील सबंधित महिलेवर गुन्हा नोंद करण्याऐवजी पोलिसांनी पीडित व्यक्तीलाच चौकशीसाठी नोटीस बजावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. फसवणूक करणाऱ्या महिलेवर तातडीने कारवाई करून बुडवलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी पोलिसांकडे केली आहे.या प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या तपशीलांसह सविस्तर चौकशी सुरू असून, बोळींज पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.अत्यल्प कालावधीत पैसे “दुप्पट” करण्याचे बोगस आमिष दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याच्या घटना वाढत आहेत. या प्रकरणातही विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत मोठी रक्कम हातोहात उडविल्याची प्राथमिक माहिती आहे.या प्रकारच्या प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन सामाजिक क्षेत्रातून होत आहे.

0 टिप्पण्या