मागील अनेक वर्षापासून कागदोपत्री असलेला “ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या मेट्रोच्या बांधकामाला अधिकृत सुरुवात होणार असून, या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या मेट्रोच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. ठाणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून, येथील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून हा रिंग मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मेट्रो लाईन 2029 पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल आणि त्या वेळेस दररोज सुमारे 6.47 लाख प्रवासी या मेट्रो सेवांचा लाभ घेतील. पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ठाणे स्टेशन ते नवीन ठाणे रेल्वे स्थानक (मनोरुग्णालयाजवळील) या भूमिगत मार्गाच्या सुमारे दीड किमी परिसरात १३२ इमारती आहेत. या इमारतींच्या खालून मेट्रोचा बोगदा जाणार असल्याने त्यांच्या पायाभूत रचनेची माहिती आता महा मेट्रोने मागवली आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 29 किलोमीटर लांबीचा मेट्रो कॉरिडॉर उभारला जाणार आहे. हा मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, बाळकुम आणि ठाणे जंक्शन अशा ठाण्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांना जोडेल. या भागांना मेट्रोने जोडल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल तसेच शहरातील रस्त्यांवरील ताण कमी होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, एकूण अंदाजे 12,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. हा मार्ग उल्हास नदीपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विस्तारित असणार आहे.ठाणे रिंग मेट्रो मार्गावर एकूण 22 स्थानकं प्रस्तावित आहेत. त्यापैकी 20 स्थानकं उन्नत (एलिवेटेड) तर 2 स्थानकं भूमिगत (अंडरग्राऊंड) असतील. ठाणे जंक्शन, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, नवीन ठाणे, गांधी नगर, नीळकंठ टर्मिनल, रैला देवी, शिवाई नगर, काशिनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, विजय नगरी, वाघबिळ, डोंगरीपाडा, मनोरमानगर, पाटीलपाडा, आझादनगर बस डेपो, वॉटर फ्रंट, बाळकुम नाका, शिवाजी चौक, राबोडी, कोलशेत इंडस्ट्रिअल एरिया आणि बाळकुमपाडा. या पैकी ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे ही दोन स्थानकं भूमिगत असतील, तर उर्वरित 20 स्थानकं उन्नत स्वरूपात उभारली जातील.
२९ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पातील तब्बल ३ किमी मार्ग हा भूमिगत असणार आहे. या भूमिगत मार्गावरील १३२ इमारतींचे बांधकाम नकाशे तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महामेट्रोकडून ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. मेट्रोचे बोगदे आणि स्थानके जमिनीखाली असल्याने परिसरातील इमारतींच्या पायाभूत रचनेचा अभ्यास आवश्यक आहे. शहर विकास विभागाचे अधिकारी देवेंद्र नेर यांनी सांगितले की, या इमारतींचे स्ट्रक्चरल नकाशे महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जातील. दररोज ७.६१ लाख प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) मार्फत राबवला जात असून १२,२०० कोटींचा हा प्रकल्प केंद्र सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये मंजूर केला आहे.
केंद्र सरकारकडून सुरुवातीला तीन डब्यांच्या मेट्रोचा प्रस्ताव होता. मात्र, ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा डब्यांची मेट्रो आवश्यक असल्याचे मत मांडले आणि अखेर केंद्राने हा प्रस्ताव मान्य केला आहे. महा मेट्रोनुसार, ठाणे मेट्रो हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक पर्याय ठरणार आहे. यामुळे वाहतूककोंडी कमी होईल, इंधन बचत होईल आणि प्रदूषणात घट होईल, असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधी केंद्र व राज्य सरकारांसह द्विपक्षीय वित्तीय संस्थांकडून मिळणार असून, स्थानकांच्या नामकरण हक्कांद्वारे व मालमत्तेच्या मुद्रीकरणाद्वारेही निधी उभारणी होणार आहे. अंतर्गत मेट्रोच्या कामाला डोंगरीपाडा ते बाळकुम या मार्गावर सुरुवात होणार आहे. या कामाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ठाणे ते भिवंडी दरम्यान प्रवास करणाऱ्यांना पीक अवरमध्ये अर्धा ते पाऊण तास प्रवास करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे अक्षरशः हाल होतात. याच समस्येवर तोडगा म्हणून MMRDA ने एक नवा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. वसई खाडीवरून सहा पदरी उड्डाणपूल बांधून ठाणे आणि भिवंडीला थेट जोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हा पूल तयार झाल्यावर प्रवास अवघ्या 5 ते 7 मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा पूल ठाण्यातील कोळशेत येथून सुरू होऊन भिवंडीतील काल्हेर पर्यंत जाणार आहे. वसई खाडीवर उभारला जाणारा हा पूल सुमारे 2.2 किमी लांबीचा असून, प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 430 कोटी रुपये इतका असेल. सहा पदरी असलेल्या या पुलामुळे सध्या 45 मिनिटांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे. गुरुवारी MMRDA ने या प्रकल्पाची निविदा जाहीर केली असून, पुढील तीन वर्षांत पूल पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

0 टिप्पण्या