चिंचोली गावातील बुद्ध विहारात दीप प्रज्वलनाचा मान भटक्या विमुक्त जातीतील ' मरीआई मातेचा गाडा ' वाहणाऱ्या आणि पोटापाण्याच्या प्रश्नासाठी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवणारे लोकांना देण्यात आला. पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भटकंती करत चिंचोली गावात आलेल्या भटक्या विमुक्त समाजातील एक कुटुंब तात्पुरत्या स्वरूपात गावात दाखल झाले. याची खबर गावाकऱ्यांना मिळाली. भारतीय बौद्ध महासभेचे संघटक यांनी त्यांच्याशी संपर्क साधतं त्यांना रोज संध्याकाळी होणाऱ्या बुद्ध वंदणेकारिता आमंत्रित केले. त्यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती आणि समस्याचा पाढा वाचला.
कुटुंब प्रमुख साहेबराव जाधव सांगत होते की, " आमच्या समाजाची परिस्थिती फार बिकट आणि दयनीय आहे. आम्हाला ही वाटतं की आमची मुलं शिकावी, मोठे साहेब व्हावीत. पण, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी या गावाहून त्या गावात भटकंती करावी लागती. लोकं जे देतील त्याच्याने आमच्या पोटाची खळगी भरावी लागते. कधी कधी तर काहीच मिळत नाही,म्हणून उपाशीही झोपावं लागत."
कुटुंबातील सदस्य संदीप सांगत होते की, "आम्ही मुळ सोलापूरचे. घरकुल योजनेतून घर मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या भटकंतीमुळे आमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही. ही अनुष्का आता चौथीला आहे. सध्या ती आमच्यासोबत फिरत आहे. शासन - प्रशासनाने आमची भटकंती थांबावली पाहिजे. समाजाचा चांगला नेता, कार्यकर्ता भेटला पाहिजे. म्हणजे आमच्यावर होणाऱ्या अन्याला वाचा फुटेल. शासनाने आमच्यावर होणाऱ्या अन्याय - अत्याचाराची गंभीर दखल घ्यावी व आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे. नेत्यांचा फक्त आमच्या मतांवर डोळा असतो."
संध्याकाळी गावातील बुद्ध विहारात या कुटूंबाच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संघटक सिताराम लव्हांडे यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. मिळालेल्या मान सन्मानाबद्दल जाधव कुटुंबाने सर्वांचे आभार मानले. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील अतिशय खास, ऊर्जादायक आणि सुखद धक्का देणारा दिवस ठरला. ही घटना आचार्यकारक आणि अनपेक्षित असल्याचे त्यांनी म्हंटले. यावेळी जाधव कुटुंबातील साहेबराव जाधव, राजू जाधव, छाया, मंगल, संदीप, रेखा, अनुष्का हे उपस्थित होते. तर, गावातील भारतीय बौद्ध महासभा (ग्राम शाखा) चिंचोलीचे प्रमुख कार्यकर्ते गौरव उघडे, नितीन लव्हांडे, सुभाष लव्हांडे, गेणभाऊ उघडे, बाळू लव्हांडे आदींनी सूक्तपठनात सहभाग नोंदविला.

0 टिप्पण्या